Jai Bhim: ‘जय भीम’ चित्रपटाची सत्य घटना माहिती आहे का? माणुसकीला काळीमा फासणारी घटना वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

0

‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या ‘जय भीम’ (Jai Bhim) या चित्रपटाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. या चित्रपटाला कमालीचा प्रतिसाद मिळत असून, या चित्रपटाचे सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळत आहे. तमिळ चित्रपटाचा सुपरस्टार सूर्या याची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असला तरी हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत आहे. तमिळनाडूमध्ये 1993 साली, ‘मुदान्नी’ नावाच्या छोट्याशा गावात ‘कुरवा’ या आदिवासी जमातीतल्या “राजकन्नू आणि पार्वती” यांची ही कहाणी आहे.

समाजात पीडितांना ही व्यवस्था किती उघडं नागडं करु शकते. स्वतःच्या फायद्यासाठी पिडीतांना, पिडत, चिरडत राहणाऱ्या या व्यवस्थेविरोधात एका महिलेने उभा केलेल्या लढ्याचं चित्रिकरण या (Jai Bhim) चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटात सूर्या, प्रकाश राज यांसारखे अनेक सुपरस्टार काम करत आहेच. मात्र या चित्रपटाचं कथानक एवढं भयंकर आहे की, या चित्रपटात कोणी काम केलंय, हे लोकांच्या लक्षातही येत नाही. लोकांच्या लक्षात पीडित राजकन्नूची पत्नी सेनगाई आणि वकिलांची भूमिका साकारणारे चंद्रू हीच नावे लक्षात राहतात. या कथानकाचं हे यश म्हणावं लागेल.

जय भीम’ (Jai Bhim) या चित्रपटाची खरी कहानी काय आहे?

तामिळनाडूमध्ये मुदान्नी नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावात ‘कुरवा या आदिवासी’ जमातीची चार कुटुंबे देखील राहत होती. 1993 साली घडलेली ही दुर्दैवी घटना आहे. चार कुटुंबाबरोबरच ‘राजकन्नू आणि त्याची पत्नी पार्वती’ (चित्रपटातलं नाव सेनगाई) असं एक आदिवासी कुटुंबही राहत होतं. आनंदात नांदत असणाऱ्या या कुटुंबाच्या घरी एके दिवशी पोलीस आले. तुझ्या नवऱ्याने दीड लाख रुपयांचे दागिने चोरले आहेत, कुठे आहे तुझा नवरा? पोलिसांनी राजकन्नूच्या पत्नीला विचारल्यानंतर तिला धक्काच बसला.

राजकन्नू घरी नसल्यामुळे पोलिस राजकन्नूची पत्नी,दोन मुलं, त्याची बहीण आणि भावाला उचलून पोलीस स्टेशनला घेऊन गेले. ‘कम्मापूरम’ पोलीस ठाण्यात या पाच जणांना ठेवण्यात आलं. राजकन्नू कुठे आहे? अशी विचारणा करण्यात आली. एवढंच नाही तर चोरी त्यानेच केली असल्याचे देखील पोलिस सांगत होते. त्याचा पत्ता द्या, तुम्हाला सोडतो. असं पोलीस वारंवार म्हणतं होते. राजकन्नूची पत्नी तो कामाला गेला आहे, असं सतत म्हणत होती. मात्र पोलीस ऐकायला तयार नव्हते. पोलीसांनी पार्वती (सेनगाई)ला बेदम मारहाण केली.

पार्वती (सेनगाई)ला दोन्हीं पोरांना देखील पोलिसांनी मारहाण केली. त्या पाचही जणांना पोलिसांनी रात्रभर पोलिस स्टेशनमध्ये ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस अधिकारी आणि काही कर्मचारी बाहेर निघून गेले. दुपारी चारच्या सुमारास राजकन्नूला घेऊन पोलीस पोलीस स्टेशनमध्ये आले. यानंतर राजकन्नूची पत्नी आणि त्या चार जणांना घरी सोडण्यात आले.

या प्रकरणात पुढे मुख्य आरोपी म्हणून समोर आलेल्या पोलीस अधिकारी ‘अॅंथनी स्वामी’ने पार्वती (सेनगाई)ला उद्या येताना सकाळी मटणाचा डबा आणायला सांगितला. मटणाचा डबा घेऊन पार्वती (सेनगाई) दुपारी साधारण एक वाजता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर तिच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने पाहिले, आपल्या नवऱ्याला पूर्ण ‘नागडं’ करून खिडकीला बांधलं आहे. त्याच्या उघड्या अंगावर काठीने मारहाण झाली असल्याने त्याचं उघडं शरीर काळं-निळं पडल्याचं तिला दिसलं.

मोठ्या हिमतीने तिने पोलिसांना विचारलं, असं का करत आहे? यावर पोलिसांनी तिला देखील मारहाण केली. आणि या संदर्भात कुठेही काही बोलू नको असं ठणकावलं. आपल्या नवऱ्याच्या शरीरातून रक्त येत आहे, हे पाहून ती हतबल झाली होती. कसंबसं तिने त्याला जेवण चारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने,त्याला जेवण देखील करता येत नव्हतं. शेजारच्या एका व्यक्तीने त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या तोंडून पाणी देखील बाहेर आलं.

पार्वती आपल्या नवऱ्याला इतकं गुरा-ढोरांसारखं का मारलं? असं विचारत होती, मात्र पोलिसांनी तिचं म्हणणं ऐकून न घेता, तिला गाडीत बसवून तिच्या घरी पाठवून दिलं. पार्वती संध्याकाळी सहाच्या दरम्यान घरी पोहोचली. गावात पोहोचल्यानंतर तिला गावातील काही लोकांनी तुझा नवरा ‘राजकन्नू’ पोलीस स्टेशन मधून पळून गेला असल्याची माहिती, पोलिसांनी दिली आहे. असं तिला सांगण्यात आलं. तीन वाजता तो बेशुद्ध अवस्थेत असताना पोलिस स्टेशन मधून तो पळून कसा काय जाईल? यावर तिचा विश्वास बसेना.

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी 22 मार्च, 1993 ला जवळच्या ‘मीनसुरीटी’ हद्दीत एक मृतदेह सापडला,असं सांगण्यात आलं. या मृतदेहावर प्रचंड मारहाणीच्या खुणा होत्या. या मृतदेहाला बेवारस घोषित करण्यात आलं. आणि इथून पुढे खऱ्या अर्थाने ‘राजकन्नू’च्या न्यायाचा लढा त्याची पत्नी ‘पार्वती’ने लढायला सुरुवात केली.

राजकन्नूचा मृत्यू हा पोलिसांच्या पोलिस कस्टडीमध्ये गुरा ढोरांसारख्या मारहाणीमुळेच झाला होता. मात्र पोलीस तो फरार असल्याचं सांगत होते. आपल्या नवऱ्याच्या शोधात ती रात्रंदिवस भटकत होती. अनेक उच्च अधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचली. मात्र या लढयात ती एकटीच होती. एके दिवशी तिला समजलं, चेन्नईमध्ये एक प्रसिद्ध वकील आहेत,जे मानवाधिकाराची प्रकरणे असतील तर मोफत केस लढतात. या वकिलाकडे तिने न्यायाची भीक मागितली.

हे तेच वकिल होते, जे पुढे ‘जस्टीस चंद्रू’ नावाने ओळखू लागले. ‘जय भीम’ या चित्रपटात सुर्याची भूमिका जस्टिस चंद्रू यांच्याच्य व्यक्तीरेखेवर साकारली आहे. जस्टीस चंद्रू यांनी पार्वतीला न्याय मिळवून देण्यासाठी आपला लढा सुरू केला. ‘जस्टीस चंद्रू’ यांनी मद्रास हायकोर्टात ‘हिबीयस कॉर्पस’ची याचिका दाखल केली. ‘हिबीयस कॉर्पस’ म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर, सरकारी यंत्रणांच्या ताब्यात असलेला माणूस कोर्टासमोर हजर करावा यासाठी तयार झालेली यंत्रणा.

या याचिकेमुळे पोलिसांचे धाबे दणाणले, ज्या मृतदेहाची बेवारस म्हणून नोंद झाली होती, त्या मृतदेहाचे फोटो त्याच्या पत्नीला दाखवण्यात आले. पत्नीने हा मृतदेह आपल्या नवऱ्याचा असल्याचे सांगितल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी सीबीआयद्वारे करण्यात यावी, अशी सूचना मद्रास कोर्टाने दिली. पार्वतीला नुकसान भरपाई मिळावी असा देखील आदेश, मद्रास कोर्टाने दिला. मात्र तिच्या नवऱ्याचा मृत्यू पोलिसांच्या कस्टडीमध्ये पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे झाला नाही, असाही निकाल मद्रास कोर्टाने दिल्याने पार्वतीचं समाधान झाले नाही.

पार्वतीने पुन्हा ही केस सेशन कोर्टात दाखल केली. मात्र इथे देखील ज्या पाच पोलिस अधिकाऱ्यांवर मारहाण विनयभंगची केस होती,त्यांना निर्दोष सांगण्यात आले. मात्र त्यांनंतर ही केस संपूर्ण देशभर गाजली. राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेत चौकशी समिती देखील नेमली. ही केस पुन्हा मद्रास हायकोर्टत गेली. १९९३ ला झालेल्या या निंदनीय प्रकरणात पार्वतीला २००६ ला न्याय मिळाला. २००६ला मद्रास हायकोर्टाने निकाल देताना पोलिसांना ‘राजकन्नू’ची हत्या पोलिसांनीच केली असल्याचा निकाल दिला. दोन पोलीसांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली.

याच सत्य घटनेवर आधारित बनवण्यात आला ‘जय भीम’

राजकन्नू आणि त्याची पत्नी पार्वती या आदिवासी कुटुंबा सोबत घडलेल्या सत्य घटनेवर बेतलेला “जय भीम” हा सिनेमा बनवण्यात आला आहे. या सत्य घटनेवर आधारित बनवण्यात आलेली कहानी पडद्यावर जशीच्या तशी दिग्दर्शकाने रेखाटण्यात यश मिळवले आहे. जय-भीम सिनेमा पाहताना, हा सिनेमा आहे याचा विसर पडतो, हे या सिनेमाचं यश म्हणावे लागेल. आदिवासी कुटुंबावर होणारा अन्याय पाहून अनेक वेळा डोळ्यातून येणाऱ्या पाण्याला आपण रोखू शकत नाही. शिवाय हा चित्रपट पाहताना ही परिस्थिती आपण जगतोय, याचा भास होतो, हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य. चित्रपट हा फक्त मनोरंजनासाठी पाहायचा असतो, ही धारणा “जय भीम” या चित्रपटाने टराटरा फाडून काढली आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अन्यायाविरुद्ध लढताना पोलीस कायदा हातात घेतात, हे या चित्रपटात दाखवलं आहे. मात्र अन्यायाविरुद्ध पोलीस कायदा हातात घेतात,असं कुठेही होत नसतं. मात्र स्वतःच्या फायद्यासाठी दलितांना आदिवाशांना खोट्या केसेसमध्ये अडवल्याची अनेक उदाहरणे नक्की आहेत. सगळ्यात मोठी फिल्म इंडस्ट्री म्हणून बॉलीवूडकडे पाहिलं जातं. मात्र अशा प्रकारच्या संवेदनशील विषयावर बॉलीवूड कधीही भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. अशा प्रकारचे चित्रपट बनवणं तर खूप लांबची गोष्ट आहे. बॉलीवूडच्या सगळ्याच दिग्दर्शक, निर्मात्यांना आणि अभिनेत्यांना शरमेने खाली मान घालायला लावणारा हा चित्रपट नक्की पाहावा.

हेही वाचा – The story of a helpless woman: जेव्हा एखाद्या स्त्रीला दारुड्या नवऱ्यामुळे एसटीमधून बाहेर काढलं जातं तेव्हा, तिची झालेली केविलवाणी अवस्था.. 

Kapil Sharma: या कारणामुळे कपिल शर्माने आत्महत्याचा प्रयत्न केलता, वेळेत पोहचून बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने वाचवले होते प्राण 

Supriya Sule:माझ्यासारखी वाईट बाई कोणी नाही,घरात घुसून ठोकून काढेन; यशवंतरावांचे विचार वेशीला टांगत सुप्रिया सुळेंचं वादग्रस्त विधान 

WhatsApp चे हे नवीन फीचर तुमच्या आहे खूप फायद्याचे, यामुळे तुमचे काम होणार सोपं 

TATA: एलोन मस्क यांनी रतन टाटा यांना विद्वान आणि सज्जन म्हटले होते, जाणून घ्या कारण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.