Satara: ‘हे’ फक्त छत्रपतींचा वारसा असणाऱ्या राजधानी साताऱ्यात होऊ शकतं; ‘शाहरुख’ यांचं होतंय सर्व स्तरातून कौतुक

0

सातारा प्रतिनिधी: छत्रपतीचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या राजधानी साताऱ्याची भुरळ अनेकांना पडल्याचे आपण नेहमी पाहतो. कास पठाराचे सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून पर्यटन येत असतात. सातारकरांची बोलण्याची एक वेगळी शैली असल्याने याचीही भूरळ अनेकांना पडते. सातारकर बोलताना उद्धट वाटत असला तरी, आतून तो खूप प्रेमळ आणि मवाळ असल्याचेही दिसून येतं. आपल्या ईमानाशी प्रामाणिक असणाऱ्यांची मोठी संख्या साताऱ्यात आपल्याला पाहायला मिळते. काल सातारामध्ये घडलेली एक घटना आपण पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला सातारकरांचा अभिमान तर वाटेलच मात्र तुम्ही कौतुक करताना थकणारही नाही.

साताऱ्याच्या शाहरुख बागबान या रिक्षाचालकाच्या ‘गूगल’पेवर एका तरुणीने पस्तीस हजार पाठले होते. हे पैसे नजरचुकीने आल्याचे समजल्यानंतर, ‘शाहरुख बागवान’ यांनी ३५ हजार परत करत माणुसकीचे दर्शन घडवले आहे. ‘शाहरुख बागबान’ या रिक्षाचालकाचे आता सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांनी साताऱ्याची मान उंचवण्याचं बोललं जातंय.

माळशिरस तालुक्यातील नातेपुते या गावच्या ‘पूनम ढोबळे’ या तरुणीने दिवाळी जवळ आल्यामुळे, आपल्या आईच्या ‘गूगल’पेवर ३५ हजार रुपये पाठवले. संध्याकाळी ती जेव्हा ऑफिसमधून घरी गेली तेव्हा पाठवलेले पैसे आईच्या गूगलपेवर आले की नाही याची खात्री केली. मात्र आईने पैसे आले नसल्याचे सांगितले. तिने लगेच ‘गूगल’पे चेक केले, आणि तिला धक्काच बसला.

काही महिन्यांपूर्वी नोकरीनिमित्त पुनम सातारा या ठिकाणी राहत होती. कधी काळी तिने शाहरुख बागबान या रिक्षाचालकाच्या रिक्षामधून प्रवास केला होता. या रिक्षाचे भाडे ‘तिने’ गुगलपेद्वारे पेड केले होते. आणि यामुळेच तिची पैसे पाठवण्यात गफलत झाली. पुनमच्या आईचे नाव ‘सुरेखा’ आहे. पैसे पाठवताना चुकून तिने सुरेखा ऐवजी शाहरुख हे नाव सेलेक्ट केलं, आणि ऑफिसच्या घाई गडबडीत पैसेही सेंड केले.

संध्याकाळी पूनम जेव्हा ती घरी आली, तेव्हा तिला समजलं आपण पाठवलेले पैसे आपल्या आईच्या नावावर न जाता आपण एकदा प्रवास केलेल्या रिक्षाचालक ‘शाहरुख बागबान’ या व्यक्तीच्या नावे गेले आहेत. ही फार मोठी चूक पूनमच्या लक्षात आल्यानंतर, तिला धक्काच बसला. तिने घाबरत घाबरत शाहरुख या रिक्षाचालकांना फोन लावला. आणि झालेली चूक सांगितली.

शाहरुख बागबान या रिक्षाचालकांनी मी लगेच चेक करून सांगतो असे सांगितल. पैसे आले असल्याचे त्यांनी पुनमला सांगितले. मी दिवसभर कामात असल्यामुळे मोबाईल चेक केला नाही, अन्यथा मीच कॉल करून सांगितले असते. असं म्हणत काहीही काळजी करू नका असं सांगितलं. आणि शाहरुख बागबान या रिक्षाचालकांनी पूनामच्या ‘गूगल’पेवर लगेच ३५ हजार रुपये पाठवले. आता शाहरुख या रिक्षावाल्संयाला पूर्ण साताऱ्यातून कौतुकाचे फोन येत आहेत.

तुम्ही तुमच्या आईला पस्तीस हजार रुपये पाठवले, याचे महत्त्व मला माहिती आहे. कारण माझी आई आजारी असते, तिच्यासाठी मी कशी ॲडजस्टमेंट करतो, याची मला जाणीव आहे. पैशाचे महत्त्व मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे इतरांच्या पैशावर नजर ठेवणे, हे माझ्याकडून कधीही होऊ शकत नाही. असं शाहरुख बागवान यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना सांगितले.

कोरोनाच्या काळात आपण पाहतोय, अनेक जण बेरोजगार झाले. अनेकांचे धंदे बुडाले, यात सगळ्यात मोठा फटका रिक्षाचालकांना बसला. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. कोरोनाच्या काळात रिक्षा चालकांचासमोर जगण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. अशा परिस्थितीत एखाद्याच्या अकाउंटवर जर पैसे आले तर, तो परत करेल की नाही? हे ठामपणे सांगता येणार नाही. बहुतेकदा तो परत करणारही नाही. असे अनेक प्रसंगही आपल्यासमोर आहेत. शाहरुख बागवान या रिक्षाचालकाचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा. त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे संपूर्ण सातारकराची मान अभिमानाने उंचावली आहे. आज त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.