Online Fraud: अशी होतेय ऑनलाईन फसवणूक, एकदा वाचा नाहीतर ‘नेहल साठवलेले गाठोळे बया..’

0

Online Fraud: दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. जसा काळ बदलत आहे त्याप्रमाणे सायबर गुन्हेगारांनी देखील आपल्या फसवणुकीच्या प्रकारामध्ये बदल केला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्य तसेच धनाढ्य लोकांना गंडा घातला जात आहे. (Online Fraud) बऱ्याचदा पोलिसांकडे तक्रार देऊन देखील हाती काही लागत नाही. कधी कधी गुन्हेगार हे परदेशातून गंडा घालत असतात. त्यामुळे यंत्रणेला त्या ठिकाणी पोहोचणे शक्य होत नाही.

हे सगळं घडत असेल तरीदेखील याला पर्याय आहे. आपण सतर्क राहून अशा फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकतो. आपण कशाप्रकारे लोकांची फसवणूक होत आहे, हे सविस्तर जाणून घेऊया. हा लेख वाचण्यास थोडा वेळ लागला तरी देखील तुमच्या खूप फायदेशीर आहे. तुम्ही कशा प्रकारे स्वतःला वाचवू शकता हे सविस्तर जाणून घेऊया.

सायबर गुन्हेगार भल्या मोठ्या फिल्म प्रोडक्शन हाऊसच्या नावाचा वापर करून तरुण मुलांना व मुलींना त्यांच्या जाळ्यात ओढत आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Film Industry) काम मिळवून देण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू असे आश्वासन देतात. त्यानंतर फोटोशूट, ड्रेसिंगसाठी खर्च द्यावा लागेल अशा पद्धतीने पैशांची मागणी केली जाते. एकदा त्यांची मागणी पूर्ण केली की ते अजून लुटण्याचा पद्धतशीर डाव आखतात. विशेष बाब म्हणजे बऱ्याचदा अशा गुन्ह्यातील आरोपी समोर येत नाहीत.

बँकिंग फ्रॉड: अशा प्रकारच्या गुन्ह्यात आरोपी फोन किंवा एसएमएस करून बँकेची केवायसी पूर्ण करायची आहे, असे सांगतात. आपण बँकेतून बोलत असल्याचे देखील पटवून सांगतात. ज्यावेळी केवायसी लिंक उघडली जाते, त्यावेळी डुप्लिकेट लिंक ओपन होते. याठिकाणी तुम्ही तुमच्या बँक खात्या संदर्भात माहिती भरल्यानंतर सायबर गुन्हेगारांना आपोआप तुमचा डाटा मिळतो. वास्तविक पाहता बँकेचा कुठलाही अधिकारी तुम्हाला तुमचा ओटीपी फोनवरून मागत नाही. ज्या लोकांना टेक्नॉलॉजी बाबत प्रगल्भ असे ज्ञान नाही, अशा लोकांनी बँकेत जाऊन आपले काम करून घ्यावे.

बक्षिसांच्या आमिषाने फसवणूक:
तुमच्या मोबाईलवर ॲमेझॉनकडून, जिओ, टाटा यांसारख्या कंपन्यांच्या नावे बक्षीस मिळाल्याचे सांगितले जाते किंवा त्या संदर्भात लिंक व्हाट्सअप किंवा मेसेज द्वारे येत असतात. परंतु आपण लगेच अशा लिंक वर क्लिक करू नये किंवा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची माहिती भरू नये. माणसाचा लोभी स्वभावच माणसाचे नुकसान करत असतो. त्यामुळे खात्री केल्याशिवाय लिंकवर क्लिक करून माहिती भरू नये.

Olx सारख्या खरेदी विक्री वेबसाईटवर एखादी मोटर सायकल किंवा चार चाकी एकदम स्वस्तात दाखवत असते. साहजिकच एवढ्या स्वस्तात वाहन मिळत असल्याने आपण लगेच संपर्क करतो. या मध्ये गैर असे काही नाही. परंतु अशा लोकांना संपर्क केल्यानंतर ते अगोदर काही रक्कम पाठवण्यास सांगतात. बऱ्याचदा बाजारभावाच्या तुलनेने खूप कमी पैशांमध्ये वस्तू मिळत असल्याने बरेच लोक पैसे पाठवतात स्वतःची फसवणूक करून घेतात. तुमची वस्तू विकत असताना देखील तुमची फसवणूक होऊ शकते.  अशाप्रकारच्या फसवणुकीपासून सावध रहा.

बऱ्याचदा तुम्हाला संपर्क करणारी व्यक्ती आपण भारतीय सैन्य दलात असल्याचे सांगत असते. त्यांच्याकडे तसे खोटे ओळखपत्र देखील असते. साहजिकच सैन्य दलातील व्यक्ती म्हटल्यानंतर आपल्याला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. ते आपली फसवणूक करणार नाहीत, असे आपल्याला वाटत असते. समोरून सायबर गुन्हेगार QR कोड स्कॅन करण्यासाठी पाठवतो. QR कोड स्कॅन केल्यानंतर खात्यामधून मोठी रक्कम जाऊ शकते. एखादी वस्तू आपल्याला विकायची असेल तर समोरची व्यक्ती अकाउंट खात्रीसाठी मी अगोदर रू. १ पाठवत असल्याचे सांगून QR कोड पाठवतो. आपण स्कॅन करतो आणि रू. १ जमा झाल्यावर आपल्याला त्यांच्याबाबत खात्री वाटते. आपण त्यांनी पाठवलेला दुसरा कोडदेखील स्कॅन करतो आणि आपल्या बँक अकाऊंटमधून अजूनच रक्कम काढून घेतली जाते. त्यामुळे असा व्यवहार करताना QR कोड वापरू नका आणि प्रत्यक्ष भेटून व्यवहार करणे योग्य राहते.

एका थाळीवर एक फ्री थाळी फसवणूक: एका थाळीवर एक फ्री थाळी अशी ऑफर आपल्याला दिली जाते. आपल्याला सोशल मीडियाच्या किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवर गेल्यानंतर जाहिरातीच्या माध्यमातून समोर येत असते. या थाळीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला माहिती भरायला लावली जाते. त्यामध्ये बँक खात्या संदर्भात देखील माहिती मागितली जाते. त्यानंतर आपल्याला फ्री थाळी मिळाली असल्याचा मेसेज येतो. त्यासाठी ओटीपी मागितला जातो. अशा प्रकारच्या फसवणुकी मधून लोकांनी 30 40 लाख रुपये देखील गमावले आहेत. त्यामुळे मोफत किती महागात पडू शकते याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल.

बँकांचे (Bank), वाईन शॉपस् (Wine Shops), पिझ्झा कंपन्यांचे ‘कस्टमर केअर नंबर’ बदलून त्यावरून तुम्हाला संपर्क केला जातो. त्यावरून तुमची वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती मागवली जाते आणि बँकेचा ओटीपी मागवला जातो. तेथे तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूसाठी तुम्ही बिल भरता परंतु तरीदेखील ऑर्डरची डिलिव्हरी होत नाही. त्यामुळे कुठल्याही कंपनीचा कस्टमर केअर क्रमांक घेताना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन क्रमांक घ्या.

 

Screen Share fraud: ज्या लोकांना मोबाईल किंवा कम्प्युटर बाबत टेक्निकल ज्ञान नाही अशांना हवा असलेला व्यवहार करण्यास मी तुमची मदत करतो, असे सांगून स्क्रीन शेअर (Screen Share) नावाचे ॲप डाऊनलोड करायला सांगतात. त्यानंतर ते ज्या ठिकाणी असतील अशा ठिकाणावरून तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपचा गैरवापर करतात. तुमच्या कॉम्पुटर मधील माहितीचा गैरवापर केला जातो.

इन्शुरन्सच्या (Life Insurance) नावे फसवणूक: बऱ्याचदा मेल किंवा एसएमएस द्वारे इन्शुरन्स प्लॅन पाठवला जातो. यामध्ये तुम्हाला कमी पैशात उत्तम प्रतीचा इन्शुरन्स मिळत असल्याचे दाखवले जाते. बऱ्याचदा महिन्याला किंवा सहा महिन्यांनी पैसे भरायला सांगितले जाते. बऱ्याचदा वेगवेगळ्या खात्यांवर हे पैसे घेतले जातात. ज्यावेळी तुम्हाला इन्शुरन्स अप्लाय करायचा असतो, अशावेळी इन्शुरन्सचा लाभ मिळवण्यासाठी रक्कम भरण्यास सांगितले जाते. यामध्ये तुमची अजूनच फसवणूक होते. त्यामुळे खात्रीशीर इन्शुरन्स एजंट किंवा कंपनीकडून इन्शुरन्स प्लॅन घ्या.

परदेशी गिफ्टच्या नावे फसवणूक: अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मैत्री करून संपर्क वाढवला जातो. बऱ्याचदा विवाहित मुली, तसेच विधवा, घटस्फोट घेतलेल्या महिलांना टार्गेट केले जाते. सोशल मीडिया प्रोफाईल वरून याचा अंदाज लावला जातो. आपण परदेशातून तुला भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले जाते. परदेशातून आलेल्या वस्तूंवर कस्टम ड्युटी लागते. काही वेळेस रक्कम लाखांमध्ये देखील असते. अशावेळी त्यांना रक्कम भरायला भाग पाडले जाते. परंतु ही रक्कम घेणारी वेगळीच टोळी असते.

तसेच काही विवाह स्थळांच्या वेबसाईटवरून आपण तुझ्याशी लग्न करण्यासाठी इच्छुक असल्याचे परदेशातील तरुण सांगतो. त्यानंतर तरुणीला व्हाट्सअप तसेच मोबाईल वरून संपर्क साधत राहतो. आपले खरंच प्रेम असल्याचे सांगतात. त्यानंतर आपल्याकडील काही संपत्ती तुझ्या नावावर पाठवत आहोत असे सांगतात. त्यानंतर कस्टम विभागाकडून चेक आल्याचा फोन संबंधित तरुणीला किंवा स्त्रीला केला जातो. हे पैसे कुठून आणि कसे आले याबाबत माहिती द्या असे सांगून घाबरवले जाते. यातूनच पैशांची मागणी केली जाते.

कौन बनेगा करोडपती (Kaun Banega crorepati) याची लॉटरी लागली आहे असे सांगून काही रक्कम अगोदर भरायला लावली जाते. काही वेळेस ओटीपीची मागणी करतात. त्यानंतर मग सर्वकाही लुटून घेतात. बऱ्याचदा साड्या,दागिने, बॅग्स, वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू अत्यंत कमी किमतीत मिळत असल्याचे काही वेबसाईटवरून दाखवले जाते. त्या ठिकाणी कॅश ऑन डिलीव्हरी हा पर्याय नसतो. पैसे तत्काळ जमा केले तरच वस्तू मिळते आणि वस्तूची डिलिव्हरी होत नाही.

कर्जाच्या नावे फसवणूक (Loan Fraud):
यात बड्या फायनान्स कंपन्यांच्या नावांचा वापर केला जातो. ‘पंतप्रधान कर्ज निधी’ अशी खोटी योजना काढून त्याला पंतप्रधानांचा फोटो वापरून देखील लोकांची फसवणूक केली गेली आहे. ज्यांना कर्जाची रक्कम हवी असेल अशांना काही रक्कम अगोदरच जमा करायला सांगितली जाते. त्यानंतर हे लोक गायब होतात.

सेक्सटोर्शन: सध्या या फसवणुकीने अनेकांचा जीवदेखील घेतला आहे. बऱ्याचदा सोशल मिडीयावरून स्त्रीच्या नावे मेसेज येतो. हाय, हॅलो करत तुम्हाला नग्न स्त्रीचा व्हिडिओ कॉल येतो. त्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद दिला किंवा नाही दिला तरी तोडून मोडून व्हिडिओ तयार केला जातो. मग तुम्हाला पैशांची मागणी केली जाते. त्यासाठी अनोळखी व्यक्तीचा व्हिडिओ कॉल उचलायचा नाही. खात्री केल्याशिवाय मेसेजला रिप्लाय द्यायचा नाही. यावरील आमचा सविस्तर लेख वाचा:Facebook, WhatsApp वर अनोळखी महिलेशी, मुलींशी बोलताय हे एकदा वाचा, अशी होईल तुमची फसवणूक..

काही व्यक्तींच्या नावे त्यांचे फोटो वापरून तसेच महिती वापरून हुबेहूब खोटे फेसबुक खाते तयार केले जाते. त्यानंतर त्यांच्या मित्रांना अडचणीत असल्याने तत्काळ पैसे पाठवण्यास सांगितले जाते. तसेच बऱ्याच मुलींचे फोटो आणि व्हिडिओ मोर्फ करून पॉर्न साईटवर टाकले जातात. यासाठी आपले सोशल मीडिया खाते प्रायव्हेट असणे आणि ओळखीच्याच लोकांना खात्यांवर प्रवेश देणे हाच याला पर्याय आहे.

मायनर गर्ल्स फ्रॉड (Minor Girls Fraud):
हा एक सायबर फसवणुकीतील अत्यंत भयंकर प्रकार आहे. आजकाल बऱ्याच अल्पवयीन मुलामुलींची सोशल मीडियावर खाती आहेत. अशाच अल्पवयीन मुलींना टार्गेट करून एखाद्या मुलीच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. थोडी मैत्री झाल्यानंतर माझ्याकडे प्रायव्हेट पार्ट चा आकार वाढवायचे औषध आहे, परंतु त्यासाठी अगोदर तुझ्या प्रायव्हेट पार्टची साईज बघावी लागेल असे सांगून त्यांचा नग्न व्हिडीओ मागवला जातो.

त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केले जाते. अल्पवयीन मुलींना घाबरवून त्यांच्याकडून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा युजर आयडी तसेच पासवर्ड मिळवला जातो. त्यानंतर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या फ्रेंड लिस्टमधील मुलींना संपर्क केला जातो. त्यांच्याकडून देखील अशाच प्रकारे व्हिडिओ मिळवले जातात. त्यामुळे पालकांनी देखील आपल्या मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवायला हवे. ही माहिती तुम्ही वाचून झाल्यानंतर शेअर करायला विसरू नका. 

हेही वाचा: IND vs NZ free live streaming: Amazon prime, Free Dish व्यतिरीक्त इथे पाहा भारत न्यूझीलंड T20 मालिका फुकट..

Good News: घरगुती गॅस सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, आता ग्राहकांची..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का.. 

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Reliance Jio New Recharge Plans: जिओचे नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च; जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.