Maharashtra Budget 2022: शेतकऱ्यांसाठी २३ हजार कोटींची तरतूद; वाचा कोणत्या योजनेतून काय काय मिळणार
आज महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२/२३चा अर्थसंकल्प सादर केला. (Maharashtra Budget 2022) मुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला ‘पंचसुत्री’ असे नाव देण्यात आले असून, हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन घेऊन येणारा ठरणार असल्याचं बोललं जातंय. शेती, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग अशी पंचसूत्री अर्थमंत्री अजित पवारांनी मांडली. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय देण्यात आलं आहे, याविषयीच आपण जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांसाठी विशेष असा अर्थसंकल्प
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवारांनी आज अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून सादर केल्याचं पाहायला मिळत आहे. या अर्थ संकल्पनात शेतकऱ्यांसाठी विविध योजनेत मोठ्या निधीची तरतूद केली आहे. त्याचबरोबर हे वर्षं महिला शेतकरी आणि मजूर वर्ष म्हणून, देखील साजरं करण्यात येणार आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पात ५० हजारांचे अनुदान देणार असल्याची तरतूद, देखील राज्यशासने केली आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान
शेती, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग अशी विकासाची पंचसूत्री मांडताना अजित पवार यांनी शेती आणि शेतीशी संलग्न असणाऱ्या क्षेत्रांसाठी तब्बल २३ हजार आठशे ८८ कोटींची तरतूद केली आहे. यात नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देखील देण्याची तरतूद अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात केली आहे. या अनुदानाचा लाभ तब्बल २० लाख शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी दोन वर्षांमध्ये १० हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
या कर्जदार शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी
अजित पवार यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, तब्बल 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. जो शेतकरी भूविकास बँकेचा कर्जदार असेल, केवळ अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. जवळपास ही कर्जमाफी एक हजार कोटी रुपयांची असणार आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केलेली ही तरतूद खूप मोठी मानली जात असून, याचा खूप मोठा फायदा कर्जदार शेतकऱ्यांना आगामी काळात होणार आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र
सादर केलेल्या अर्थसंकल्पात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ‘वसमत’ याठिकाणी बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्राची स्थापन करण्यात येणार आहे. या संशोधन केंद्राचा फायदा हळद उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. हळद पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी या केंद्रात संशोधन करण्यात येईल. त्यासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात व्याज सवलत योजनेअंतर्गत ४३ लाख १२ हजार शेतकऱ्यांसाठी तब्बल ९११ कोटी रुपये खर्चिले जाणार आहेत.
विदर्भ-मराठवाड्यासाठी मोठी तरतूद
इतर भागातल्या शेतकऱ्यांपेक्षा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे तूर, कापूस, सोयाबीन या पिकांचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणून या शेतकऱ्यांचं उत्पन्न, प्रगतिशील बागायतदार शेतकऱ्यांच्या बरोबर घेऊन येण्यासाठी या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही एक हजार कोटी रुपयांचा निधी कृती योजनेअंतर्गत खर्चला जाणार आहे, त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातला शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
या योजनेत शेततळ्यांचा समावेश
मागील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला शेततळे योजनेतून 50 टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता या सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 75 टक्यांची वाढ केली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजनेत आता शेततळ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासते, अशा शेतकऱ्यांसाठी आता शेततळ्यात पाणी साठवून त्याचा योग्य वापर करता येणार असल्याने, हा देखील निर्णय ऐतिहासिक मानला जातोय.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांची बळकटी
राज्यात 306 कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्वात आहेत. या कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या बळकटीसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी घेण्यात आलेल्या कर्जाच्या 100% व्याजाची परतफेड करण्यात येणार असल्याची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. येणाऱ्या दोन वर्षात याकरिता तब्बल १० हजार कोटी रुपये खर्चले जाणार आहेत. येणाऱ्या रब्बी तसेच खरीप हंगामाकरिता, दोन वर्षात २ कोटी ३३ लाख ६० हजार क्विंटल धानाची खरेदी केली जाणार आहे. याकरिता ६ हजार ९५२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
फळबाग लागवडीचे लक्ष्य
फळबाग लागवड योजनेसाठी देखील या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. रोजगार हमी, आणि फलोत्पादनासाठी एकूण 2, हजार 294 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. फळबाग लागडवीच्या सुधारित धोरणाकरता द्राक्षे, ड्रॅगन फ्रूट, अशा अनेक पिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर यावर्षी एक लाख हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे लक्ष असणार आहे.
सहकार, पणन, वस्त्रोद्योगास भरीव मदत
वस्त्रोद्योग, सहकार, पणन, या विभागांना तब्बल १ हजार ५१२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. येणाऱ्या दोन वर्षात मृदा आणि जलसंधारणाची कामे देखील मोठ्या प्रमाणात केली जाणार आहेत. या कामांसाठी ४७७४ कोटी रुपयांचा निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी या योजनेअंतर्गत काम करण्यात येणार असून, त्यासाठी भरीव निधी उपलब्ध देखील करण्यात आला आहे.
हे देखील वाचा गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूषखबर; या कारणामुळे काही दिवसांतच गव्हाच्या किमती गगनाला भिडणार....
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम