खरंच ‘न’ विचारता पाणीपुरी आणल्याने पत्नीने आत्महत्या केली? वाचा सविस्तर!

0

कोणाचा कशावरून वाद होईल आणि वादाचे कधी जिव-घेण्याप्रकारात रूपांतर होईल याचा काही नेम नाही. ‘न विचारता’ पाणीपुरी आणली म्हणून नवरा-बायकोमध्ये वाद झाला, आणि या वादातून बायकोनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २८अॉगस्टला पुण्यात आंबेगाव पठार,सिंहगड व्हीला परिसरात घडल्याचे समोर आले आहे.

पत्नीला न विचारता पती घरी पाणीपुरी घेऊन आला. न विचारता पाणीपुरी आणल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे नंतर मोठ्या भांडणात रूपांतर झाले,आणि पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव प्रतिक्षा सरवदे असून ती २३ वर्षांची आहे. विष प्राशन केल्यानंतर प्रतिक्षाला पती गहिनीनाथ सरवदे याने दवाखान्यात नेले,मात्र उपचारादरम्यान प्रतिक्षाला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आरोपी गहिनीनाथ सरवदे(वय ३३) याचे प्रतीक्षा हिच्याबरोबर चार वर्षापूर्वी लग्न झाले होते. तो मुळचा बुधले गल्ली,सोलापूर या ठिकाणचा रहिवासी आहे. मात्र पुण्यात खाजगी नोकरी करत असल्याने सध्या तो पुण्यात आपल्या पत्नीसह आंबेगाव पठार या ठिकाणी राहत होता.

लग्नानंतर आरोपी गहिनीनाथ सरवदे आणि त्याची पिडीत पत्नी प्रतिक्षा सरवदे या दोघांमध्ये पुण्याला सोबत घेउन जात नसल्याच्या कारणावरून वादही झाला होता. वाद झाल्यानंतर आरोपी गहिनीनाथ सरवदे याने आपल्या पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण देखील केली होती. दोघांना अडीच वर्षाचं एक मुलही असल्याची माहिती आहे.

आरोपी गहिनीनाथ सरवदे याला भारती विद्यापीठ पोलीसांनी अटक केली आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपावरून भारती विद्यापीठ पोलीसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून,पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे करत आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.