रोहित शर्मा’नंतर ‘हा’ सलामीवीर देखील दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील निर्धारित षटकांची मालिका नुकतीच संपल्यानंतर आता प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती कसोटी मालिकेची. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या दोन संघांमध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार असली तरी, दोन्ही संघांना आपापल्या खेळाडूंच्या दुखापतीची अडचण सतावत आहे.
वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 2-1 असा पराभव करत मालिका आपल्या नावावर केली,तर भारताने ऑस्ट्रेलियाचा टी-20 मालिकेत 2-1 असा पराभव केला. निर्धारित षटकांच्या मालिकेनंतर बहुप्रतीक्षित असणारी कसोटी मालिका प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघासाठी कठीण जाणार असल्याचं बोललं जातंय. पहिल्या कसोटीनंतर कॅप्टन विराट कोहली मायदेशी परतणार आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर कसोटी गोलंदाजांची मदार खांद्यावर असणारा इशांत शर्मा देखील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवण्यात येणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर देखील दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचे वृत्त असून ऑस्ट्रेलियासाठी हा एक चिंतेचा विषय असणार आहे
प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघासाठी कसोटी मालिका खूप कठीण जाणार हे निश्चित असतानाच पहिल्या कसोटीत डेव्हिड वॉर्नरची अनुपस्थिती हा ऑस्ट्रेलिया संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. दुबईमध्ये झालेल्या आयपीएल,त्यानंतर नुकत्याच झालेल्या निर्धारित षटकांच्या मालिकेत दाखवलेल्या फॉर्मचा विचार केला तर ऑस्ट्रेलियासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय. डेव्हिड वॉर्नर हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय असला तरी दुसऱ्या कसोटीनंतर तो ऑस्ट्रेलिया संघात अवेलेबल असल्याने,त्यांच्यासाठी ही एक सकारात्मक बाब आहे.
एडेलेटच्या ओवल मैदानावर डे नाईट कसोटी सामन्यापासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया प्रमाणे भारतीय संघाला डे नाईट पिंक बॉल कसोटी खेळण्याचा अनुभव नसल्याने,या सामन्यापूर्वी दोन सराव सामने देखील खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये एक पिंक बॉल म्हणजेच डे नाईट सामनाही होणार आहे. यामुळे पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाला पुरेशी तयारी करण्याची संधी मिळणार असल्याने ही एक जमेची बाजू मानली जात आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.