फलटणचे पाणी चोरणाऱ्यांना फलटणकर मतदान करणार नाहीत : खासदार नाईक निंबाळकर

फलटणकरांचे हक्काचे पाणी चोरून दुसरीकडे पळवणाऱ्या पक्षातील उमेदवाराला आमचे स्वाभिमानी फलटणकर मतदान करणार नाहीत,असे विधान माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी विंचुर्णी याठिकाणी पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारांचा प्रचार करताना केले.

खासदार रणजितिंह निंबाळकर भारतीय जनता पार्टीचे पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्राम देशमुख व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारादरम्यान विंचुर्णी तालुका फलटण या ठिकाणी भाजप पदाधिकारी बैठकीत बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

‌या बैठकीला भाजपा आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर, माळशिरसचे रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार मदनदादा भोसले, आमदार राम सातपुते, पृथ्वीराज देशमुख, शेखर चरेगावकर, विक्रम पावसकर, यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाचे अनेक आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

राज्याचे विरोधी पक्षनेते व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणकरांच्या वाट्याचे नीरा देवधर चे पाणी फलटण तालुक्याला देण्याचे आश्वासन पूर्ण केले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांचे सरकार येताच पुन्हा फलटणकरांच्या पाठीत खंजीर खुपसून फलटणकरांच्या हक्काचे पाणी बारामतीला पळवले. असा आरोप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.

फलटणकरांचे हक्काचे पाणी पळवून नेणाऱ्या पक्षातील नेत्यांना स्वाभिमानी फलटणकर मतदान करणार नाहीत असे विधान माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले व भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना पसंती क्रमांक एकचे मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे निंबाळकर यांनी आव्हान केले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.