बाळूमामांच्या मेढ्यांनी १० गुंठे ‘गवार’ खाल्ली, आज त्याच रानात तब्बल दोन लाखाचे उत्पन्न मिळाले; काय म्हणतोय शेतकरी ऐका

0

माळशिरस| ‘लोकसंत’ म्हणून ओळख असणाऱ्या बाळूमामाच्या लोकप्रियतेत अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळते. खासकरून खेडेगावात आणि धनगर समाजात ‘बाळुमामा’ची प्रचंड भक्ती असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच आता बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका कमालीची लोकप्रिय झाल्याने, ‘बाळुमामां’च्या चमत्कारांची देखील ओळख अनेकांना झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ‘अदमापूर’ हे बाळूमामांचे समाधी स्थळ असून, या गावात बाळूमामाचं मोठं मंदिरही आहे. बेळगाव मधील ‘चिक्कोड’ या गावात सर्वसामान्य धनगर कुटुंबात जन्मलेल्या बाळूमामांनी पुढे अध्यात्मिक क्षेत्रात आपली ओळख लोकसंत म्हणून निर्माण केली. घरचा संसार सोडून बाळू मामांनी गोरगरिबांचे दुःख जाणून घेऊन सोडवण्याच काम केलं. समाजात सुरू असलेल्या अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यापासून लोकांना लांब ठेवत बाळूमामांनी अनेक चमत्कार केल्याचं बोललं जातं.

‘चिक्कोड’ या छोट्याशा गावात बाळूमामांचा जन्म ३ अॉक्टोंबर १८९२ साली झाल्याचंं बोललं जातं. तर त्यांनी ४ सप्टेंबर १९६६ ला अदमापूर येथे समाधी घेतली असंही सांगितलं जातं. बाळूमामाने सुरू केलेले, हे काम अजूनही सुरूच असल्याचं बोललं जातं. बाळूमामा देवस्थानकडे २०ते २२ हजार मेंढ्या असून, सोळा खांडव्यात त्या राज्यभर फिरत असतात. बाळूमामाच्या या मेंढ्यांचं देखील एक विशेष महात्म्य असल्याचं बोललं जातं.

राज्यभर बाळूमामांच्या फिरत असणाऱ्या या मेंढ्यांनी जर एखाद्याच्या शेतातलं उभं पिकं खाल्लं तर, किंवा त्या शेतात चरल्या तर, त्या शेतकऱ्याच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होते. असं लोकं सांगतात. याचे अनुभव देखील अनेक जण सांगताना पाहायला मिळतात. माळशिरस तालुक्यातील ‘पिंपरी’ या गावातील अशाच एका शेतकऱ्याने हा अनुभव ‘महाराष्ट्र लोकशाही’शी बोलताना सांगितला आहे.

‘शशिकांत कर्चे’ असं या शेतकऱ्याचं नाव असून, बाळूमामावर माझी प्रचंड भक्ती असल्याचं, हा शेतकरी सांगतो. गेल्या सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, मी शेतात १० गुंठे गवार लावली होती. गवारीचा ‘फड’ जवळजवळ संपत आला होता. मात्र आणखी दोन तोडे झाले असते. शेताच्याच कडेला माळरानावर बाळुमामाच्या मेंढ्या चरत होत्या. या मेंढ्या गवारीत घुसल्या, आणि गवार खाऊ लागल्या. बाळूमामावर माझी प्रचंड भक्ती असल्याने मी त्यांना हाकलून न लावता, चरू दिलं.

मला विश्वास होता, बाळुमामाच्या मनात असलं तर, यापेक्षा दुपटीने अधिक उत्पन्न मला मिळेल. १० गुंठे गवार बाळूमामाच्या मेंढ्यांनी खाल्ली तरी मला त्यावेळी दुःख झालं नाही,याउलट आनंदच वाटला. एक एकर क्षेत्रातील १० गुंठे गवार बाळूमामाच्या मेंढ्यांनी खाल्ली होती. या एका एकराच्या शेजारीच दुसऱ्या एका एकरात मी नंतर कांद्याची लागण केली. कांदा बहारदार आला, मात्र उत्पन्न निघायची वेळ आली, तेव्हा मात्र कांदा अक्षरशः खालून सडला होता. संपूर्ण एका एकरात चार ते पाच पिशव्यांपेक्षा जास्त कांदा निघाला नाही.

का कुणास ठाऊक पण मला पुन्हा कांद्याचंच पीक करावसं वाटलं. यावेळीस मात्र मी बाळूमामाच्या मेंढ्यांनी, ज्या शेतातील गवार खाल्ली होती, त्याच एका एकरात कांदा लागवड करण्याचा निर्णय घेतला. कांद्याची लागवड केली पीकही बहरदार आलं, आसपासच्या अनेक शेतकऱ्यांच्या कांद्यावर मोठ्या प्रमाणात रोग पडत होता. अचानक होणाऱ्या अवकाळी पावसामुळे देखील अनेकांच्या कांद्यात काही रस नसल्याचं दिसत होतं, मात्र माझ्या कांद्याची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती.

दोन महिन्यांपूर्वी ज्या एका एकरात मी अवघ्या चार ते पाच पिशव्या कांद्याचे उत्पन्न काढलं होतं. आज त्याच्याच शेजारी असणाऱ्या माझ्याच दुसऱ्या एका एकरात(ज्यात बाळूमामांच्या मेंढ्या चरल्या होत्या) जवळपास १६० ते १७० पिशव्या कांद्या निघतोय, आणि दर देखील चांगला सापडतोय. कांद्याची पहिलीच पट्टी जवळपास एक लाख रुपये आली. हा सगळा चमत्कार बाळूमामांनी केलाय,असं ‘शशिकांत कर्चे’ यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना सांगितले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.