सहकार महर्षी म्हणून महाराष्ट्राला ओळख करून देणारे शंकरराव मोहिते-पाटील इंदिरा गांधींनाही भिडले होते…

0

शंकरराव मोहिते-पाटील यांनी राज्याला आपली सहकार महर्षी म्हणून नवी ओळख करून दिली. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हा अजूनही काही प्रमाणात दुष्काळग्रस्त तालुका म्हणूनच ओळखला जातो. मात्र इथल्या माळरानावर शंकरराव मोहिते-पाटील यांनी सहकाराचं जाळं विणण्याचे काम केलं. शिक्षण संस्था, सहकार संस्था, दूध संघ, सूतगिरणी, साखर कारखाना अशा अनेक सहकारी संस्थांमुळे तालुक्याला नवी ओळख मिळाली.

शंकराव मोहिते-पाटील यांनी सहकारी संस्था फक्त उभारल्याच नाहीत तर, त्या यशस्वी देखील केल्या. असंख्य सहकारी संस्था उभारल्यामुळे तालुक्यात मोहिते पाटलांना आपली ताकद कायम टिकवून ठेवता आली. सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र या जिल्ह्यात अकलूज हे गाव त्यांनी ‘हिरवंगार’ आणि टवटवीत करून दाखवलं. शंकरराव मोहिते-पाटील यांची सहकारी क्षेत्रात जेवढी वचक होती, तेवढीच वचक त्यांची जिल्ह्याच्या राजकारणातही होती.

शंकरराव मोहिते-पाटील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. राजकारण असो की समाजकारण मोहिते पाटलांना तालुक्यात पर्याय नव्हता. त्याकाळी इंदिरा गांधी देशाच्या सर्वोत्तम नेत्या म्हणून ओळखला जात होत्या. सगळ्यात पावरफुल नेत्या म्हणून, त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र इंदिरा गांधींना देखील त्याकाळी शंकरराव मोहिते-पाटील यांनी आव्हान दिल्याचं बोललं जातं.

1972 साली महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला होता. सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यात तर दुष्काळाची अधिक झळ पाहायला मिळत होती. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या मुलाची, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या लग्नाची चर्चा देशभर झाली. प्रचंड दुष्काळ असताना, भर उन्हाळ्यात आपल्या मुलाचं झालेलं लग्न देशभर गाजलं, याला कारणही तसंच होतं. लाखाहून अधिक माणसं या लग्नात जेवली.

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लोकांना ‘सरबत’ची सोय चक्क विहिरीत साखरेची पोती आणि लिंबू, बर्फाच्या लाद्या टाकून करण्यात आली. आजही त्या ऐतिहासिक ‘सरबता’ची चर्चा गावागावात होताना पाहायला मिळते. दुष्काळ असूनही एवढं मोठं लग्न केल्यामुळे, इंदिरा गांधींनी विधानसभेला त्यांचं तिकीट कापलं. इंदिरा गांधी यांनी आपले तिकीट कापले, ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही. हा त्यांना आपला अपमान वाटला. आणि म्हणून त्यांनी चक्क इंदिरा गांधी यांच्या विरोधात बंड पुकारले.

त्याकाळी काँग्रेसची देशात प्रचंड ताकद होती. आणि काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी यांचा दरारा होता. त्याकाळी इंदिरा गांधी यांच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवणं, ही सोपी गोष्ट नव्हती. मात्र हे धाडस शंकरराव मोहिते-पाटील यांनी केलं. ‘बाबुराव देशमुखांना’ त्यांनी अपक्ष निवडणूक लढवायला लावली, आणि निवडूनही आणले. काँग्रेस विरोधात निवडणूक लढवणं आणि जिंकणं हे त्याकाळी सोपं आव्हान नव्हतं मात्र ही किमया त्यांनी करून दाखवली होती.

हे वाचा_ “उत्तर प्रदेश आपल्या हातून गेलं…”; स्वतः मुख्यमंत्र्यांनीच केलं कबूल,व्हायरल व्हिडिओने भाजपात खळबळ

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.