Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘असा’ करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..
Pawar gram samriddhi Yojana: शेती पूरक व्यवसाय करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra government) सुरू केलेली, ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’ एक प्रकारे पर्वणी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. 3 फेब्रुवारी 2021ला या योजनेसंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला. आणि तेव्हापासून महाराष्ट्रात ही योजना लागू करण्यात आली. आता सर्वप्रथम आपण शरद पवार ग्रामसमृद्धी योजना नक्की काय आहे? हे पाहूया…
काय आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजना एकत्रित करत, “शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. 3 फेब्रुवारी 2021ला या योजनेसंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला. या योजनेतून “शेळीपालनासाठी शेड बांधणे, कुकुट पालनासाठी शेड बांधणे, गाय-म्हैस पालनासाठी पक्का गोठा बांधणे, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग” या चार वैयक्तिक योजनांसाठी राज्य शासनाकडून या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येणार आहे. या चारही वैयक्तिक योजनांसाठी लाभार्थ्यांना वेगवेगळं अनुदान देण्यात येणार आहे.
आता आपण कोणत्या योजनेसाठी किती अनुदान मिळणार हे पाहूया.
गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधण्यासाठी तब्बल 77,188 रुपये अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला दोन ते सहा गुणांसाठी एक गोठा बांधणं आवश्यक आहे. जर तुम्ही सहाच्या पटीने म्हणजेच 12 गुरांसाठी गोठा बांधणार असाल तर, यासाठी तुम्हाला दुप्पट अनुदान मिळणार आहे. जर तुम्हाला तिप्पट अनुदान मिळवायचे असेल, तर तुम्हाला अठरा गाई/म्हैस सांभाळणे आवश्यक आहे.
शेळीपालन शेड
राज्य सरकारने ज्या चार वैयक्तिक योजनांना अनुदान देण्याच निर्णय घेतला आहे, त्यामध्ये शेळी पालन योजना शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त मानली जात आहे. शेळी पालन शेड उभारणी करता, राज्य सरकार 10 शेळ्यांचे शेड बांधण्यासाठी, 49,284 रुपये अनुदान देत आहे. जर तुम्ही दहाच्या पटीने शेळ्या वाढवणार असाल, तर तुम्हाला दुप्पट आणि तिप्पट अनुदान मिळणार आहे. म्हणजे तुम्ही वीस शेळ्या करणार असाल, तर तुम्हाला दुप्पट आणि तीस शेळ्या करणार असाल, तर तिप्पट अनुदान मिळणार आहे.
कुक्कुटपालन शेड बांधकाम
शेळी पालन याप्रमाणेच, अलीकडच्या काळात कुक्कुटपालन हा व्यवसाय देखील उपयुक्त ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जर तुम्ही 100 पक्षांकरता शेठ बांधणार असाल, तर तुम्हाला शासन 49, 760 रुपये अनुदान देत असतं. तसेच जर तुमच्याकडे दीडशेपेक्षा जास्त पक्षी असतील, तर शासन तुम्हाला दोन पट अनुदान देणार आहे.
शेड बांधायचे अगोदरच तुमच्याकडे 100 पक्षी असणं गरजेचे नाही, जर तुम्ही शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामीनांसह योजनेची मागणी केल्यास, आणि ती संबंधित यंत्रणेकडून मंजूर झाल्यास, शेडचं संपूर्ण बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 100 पक्षी आणले तरी चालणार आहे.
भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
आपल्या शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्याकरीता शेतकऱ्यांना 10,537 रुपये अनुदान शासनाकडून मिळणार आहे. असा या चारही कामांसाठी बांधकाम किती लांबी, रुंदी, जमिनीचे क्षेत्रफळ किती असावं? यासंदर्भात तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर त्या संदर्भातली सविस्तर माहिती, शासन निर्णयात सविस्तर दिलेली आहे. आता आपण अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती पाहूया…
कसा करायचा कर्ज
वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करायचा आहे. “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र अंतर्गत, वैयक्तिक लाभाच्या योजना” असं या फॉर्मचं नाव असणार आहे. सर्वप्रथम तुम्ही सरपंच, ग्रामसेवक यांच्यापैकी कोणाकडे अर्ज करताय, त्यांच्या नावासमोर बरोबरची खूण करणं आवश्यक आहे. तसेच ग्रामपंचायतचं नाव, तालुका, जिल्हा टाकायचं आहे. तसेच उजवीकडे दिनांक टाकल्यानंतर फोटो चिकटवणं आवश्यक आहे.
इथपर्यंत तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरल्यानंतर, खाली अर्जदाराचं नाव टाकायचं आहे. पत्ता तसेच तालुका, जिल्हा सोबत मोबाईल क्रमांक देखील टाकणं आवश्यक आहे. आता तुम्ही कोणत्या वैयक्तिक योजनेसाठी अर्ज करणार आहात, त्या समोर तुम्हाला बरोबर अशी खूण करणं आवश्यक आहे.
आता तुम्ही शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करत असल्याने, आपण पाहिलेल्या वरील चार पैकी एका योजनेवर बरोबर अशी खून करणे आवश्यक आहे. आता बरोबर अशी खूण करताना, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ती म्हणजे एका अर्जावर तुम्ही एकाच योजनेसाठी अनुदान मागू शकता. वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.
इथपर्यंत व्यवस्थित अर्ज भरल्यानंतर, तुम्ही कोणत्या प्रवर्गात आहात, या संदर्भातील सविस्तर माहिती लिहावी लागणार आहे. अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील कुटुंब, महिलाप्रधान कुटुंब, भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, 2008च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी, वरील पैकी तुम्ही कोणत्या प्रकारात मोडत आहात, त्या प्रकारासमोर बरोबर अशी खूण करणं आवश्यक आहे. तुम्ही जो प्रकार निवडला आहे, त्याबाबत असणाऱ्या कागदपत्रांचे पुरावे देखील जोडणे आवश्यक आहे.
आता तुम्हाला या अर्जावर लाभार्थ्यांच्या नावे जमीन आहे का, हा पर्याय दिसेल. त्या पर्यायासमोर तुम्हाला जमीन असेल तर, हो म्हणावं लागेल. तुमच्या नावे असणारा सातबारा आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुना-९ या अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे. या सोबतच तुम्हाला रहिवासी दाखला, अर्जदाराच्या कुटुंब मधील 18 वर्षावरील सर्व पुरुष, आणि ‘स्त्री’ एकूण सदस्यांची संख्या देखील, लिहिणं आवश्यक आहे. या अर्जाच्या शेवटी तुम्हाला स्वयंघोषणापत्र लिहून द्यावं लागणार आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे ‘जॉब कार्ड’ असणं बंधनकारक असणार आहे. या अर्जासोबत तुम्हाला मनरेगाचं जॉब कार्ड, 8-अ, सातबारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8-अचा उतारा जोडावा लागणार आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ग्रामसभेचा ठराव देखील द्यावा लागणार आहे. तुम्हाला सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचं एक शिफारस पत्र देणं बंधनकारक आहे. या शिफारसीमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकांकडून सदर लाभार्थी हा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे, असं सांगण्यात येईल.
वरील सर्व प्रोसेस झाल्यानंतर, तुमच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येईल. पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यानुसार, तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल. ज्यात तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे की नाही, ते नमूद केलेले असेल.
हे देखील वाचा प्रधानमंत्री आवास योजना: घरबसल्या तुमच्या मोबाईलवर अशी पहा घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी..
ई-केवायसी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; अन्यथा पीएम किसान हप्ता होईल बंद
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम