Property Rights: वडिलांच्या संपत्तीवर मुलीच्या निधनानंतर जावई आणि नातवांचा हक्क; कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय
बऱ्याचदा संपत्तीवरून (Property Rights) भावंडात वाद झालेले पाहायला मिळतात. काही काही वाद तर न्यायालयातच सोडवावे लागतात. वडिलांची कितीही मोठी संपत्ती आली तरीदेखील पोरं आपल्या बापाचं ऐकत नसल्याचं पाहायला मिळतं. जसे की तुम्हाला माहित आहे, कायद्यानं मुलांएवढाच मुलीला देखील वडिलांच्या प्रॉपर्टीमध्धे हक्क दिलेला आहे. मात्र अनेक मुली आपल्या वाट्याची संपत्ती आपल्या भावंडांना देऊन टाकत असतात. ही परंपरा अजूनही चालत आली आहे. जेव्हा मुलीला देखील आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये हक्क हवा असतो, तेव्हा मग वाद होण्याची शक्यता निर्माण होते.
मुलींचा आपल्या पित्याच्या संपत्तीवरचा हक्क (Property Rights) हा विषय नेहमीच वादाचा विषय झाला आहे. पित्याच्या संपत्तीमध्ये मुलीला किती अधिकार द्यायचा याबाबत देखील विविध मतभेद असल्याचं पाहायला मिळते. काही लोकांच्या मतानुसार मुलींचा आपल्या पित्याच्या संपत्तीवरचा हक्क मुलांपेक्षा कमी आहे, तर काहींच्या मते मुलीला आपल्या पित्याच्या संपत्तीवर कसलाही अधिकार नाही, तर काही लोकांच्या मते, मुलीला देखील आपल्या पित्याच्या संपत्तीत मुलांएवढाच अधिकार असायला हवा. असं बोललं जातं. त्यामुळे हा विषय कायम वादात राहिलेला आहे.
परंतु आता मुलीचा मृत्यू झाला असेल, तर तिच्या वाट्याची जमीन कोणाला मिळेल? जर मुलीचा मृत्यू झाला तर, मग त्या संपत्तीवर कोणाचा अधिकार असेल? हा देखील प्रश्न उपस्थित होत असतो. याबाबत आपण जाणून घेणार आहोत, नेमकं प्रकरण काय आहे. त्याच झालं असं, आपल्या आईच्या मृत्यूनंतर मुलांना आपल्या आईच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये हक्क हवा होता. आपल्या मामाशी चर्चा केल्यानंतर मामांनी याला विरोध केला. मग हा चेंडू अखेर दिल्ली कोर्टात गेला.
मग मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांच्या संपत्तीवर नक्की कोणाचा हक्क असेल, या बाबतीत दिल्ली कोर्टात एक सुनावणी पार पडली. त्यामध्ये दिल्ली कोर्टाने याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. दिल्लीतील साकेत येथे नरेश कुमार लाकर यांच्या न्यायालयामध्ये गुरूवारी दि. ३१ मार्च रोजी याबाबत सुनावणी पार पडली. या प्रकरणाबाबत कोर्टनं सांगितलं की, मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या पित्याच्या मालमत्तेत मुलीचा पती आणि मुले यांना हक्क असेल. त्याचसोबत दिल्ली कोर्टाने पुढील आदेश येईपर्यंत संपत्तीची विक्री किंवा संपत्तीबाबत अन्य कोणताही अधिकार दुसऱ्या पक्षाला देण्यास स्थगिती दिली आहे.
मुलीच्या मृत्यूनंतर तिचा पती आणि मुलांना देखील संपत्तीवर समान अधिकार असणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांना आपल्या आजोबांच्या संपत्तीवर अधिकार आहे. त्याचसोबत जोपर्यंत संपत्तीत मुलीचा वाटा निश्चित होत नाही, तोपर्यंत दुसऱ्या पक्षाला या संपत्तीची विक्री करता येणार नाही. दिल्ली कोर्टाने या प्रकरणात म्हटले आहे की, याचिकाकरर्त्यांच्या आईचा या संपत्तीवर अधिकार होता. संपत्तीच्या एक तृतीयांश भागावर मुलीचा अधिकार होता असे कोर्टाने म्हटले आहे. त्याचसोबत पुढील सुनावणी पूर्वी संपत्तीचे मूल्यांकन करण्याचे आदेश सबंधित कार्यालयाला देण्यात आले आहेत.
वडिलांच्या संपत्तीवर मुलीला हक्क रहात नाही?
मुलीने जर स्वइच्छेने आपल्या हक्काचा त्याग केला तर अशावेळी मुलीला तिच्या वडिलांच्या संपत्तीत कसलाही वाटा मिळू शकत नाही. मग वडिलांची संपत्ती वंशपरंपरेने मिळालेली असेल किंवा वडिलांनी कमावलेली संपत्ती या दोन्हीमध्ये सुध्दा ही बाब लागू होते. जर मुलीच्या वडिलांनी स्वतःचं मृत्यूपत्र तयार करून आपली संपत्ती आपल्या मुलाच्या नावे केली असेल, तर अशा परिस्थितीत मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीवर कुठलाही हक्क रहात नाही. परंतु एक महत्वाची बाब म्हणजे, मुलीचे वडील त्यांना वंशपरंपरेने मिळालेली संपत्ती मृत्यूपत्र लिहून मुलांच्या नावे करू शकत नाहीत. वडिलांनी वंशपरंपरेने मिळालेल्या संपत्तीत मुलीलाही मुलाएवढाच अधिकार असतो.
समाजामध्ये संपत्तीच्या कायद्यातल्या या तरतुदींबद्दल जास्त माहिती नसल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे लग्नानंतर मुलींला तिच्या वडिलांच्या संपत्तीवर हक्क राहत नाही, असा गैरसमज काही लोकामध्ये असल्याच पाहायला मिळत.जर मुलीने आपल्या कुटुंबाच्या किंवा वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न केलं असेल किंवा काही चुकीचं काम केलं असेल, तरी देखील अशा परिस्थितीतही मुलीचा वडिलांच्या संपत्तीवरचा अधिकार रद्द होत नाही.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम