राहुल द्रविडला का केलं जातंय ट्रोल? जाडेजाचं द्विशतक न होताच डाव घोषित करण्यामागचे हे आहे धक्कादायक कारण..

0

मोहालीच्या मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यामधील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस अष्टपैलू रवींद्र जडेजाने गाजवला. रवींद्र जडेजाने उत्कृष्ट फलंदाजी करत, नाबाद १७५ धावांची खेळी केली. रवींद्र जडेजा आज आपल्या करिअरचं पहिलं-वहिलं द्विशतक साजरं करेल, असं वाटत असतानाच, कॅप्टन रोहित शर्माने भारताचा डाव घोषित केला. आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र रोहित शर्माने असं अचानक का केलं?

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीमधील हा शंभरावा कसोटी सामना असल्याने, या कसोटी सामन्याला मोठे महत्त्व प्राप्त झाल्याचं पाहायला मिळाले आहे. विराट कोहलीचा सन्मान म्हणून, बीसीसीआयने देखील 50% प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना पार पाडायचा निर्णय घेतला. कोणत्याही खेळूडासाठी शंभर कसोटी सामने म्हणजे हा खूप मोठा गौरव आहे. आतापर्यंत केवळ बारा भारतीय खेळाडूंना हा गौरव प्राप्त झाला आहे. एकीकडे विराट कोहलीमुळे या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र दुसरीकडे त्याचाच अंडर नाईन्टींनचा साथीदार रवींद्र जडेजाने कमाल करत हा कसोटी सामना आपल्या नावावर केला.

रोहित शर्माने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्मा आणि मयंक अग्रवालने ठीकठाक सुरुवात केली. रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर, चेतेश्वर पुजाराची जागा घेणाऱ्या हनुमा विहारीने मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत अर्धशतक साजरे केले. सगळ्यांना विराट कोहली फलंदाजीला कधी येतोय, याचीच उत्सुकता लागून राहिल्याचं पाहायला मिळालं. अगरवाल बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानावर येताच प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यानी विराटचं स्वागत केले. विराट कोहलीने देखील उत्कृष्ट फलंदाजी करत आपलं अर्धशतक पूर्ण केले.

ठराविक अंतराने भारताचे गडी बाद होत गेल्यानंतर, रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंतने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऋषभ पंतने पुन्हा एकदा आपल्या बॅटचा जलवा दाखवत 97 चेंडूत 96 धावांची खेळी केली. आज दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली तेव्हा, रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा डावाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेत, भन्नाट नाबाद 175 धावांची खेळी केली.

रवींद्र जडेजा लवकरच आपलं द्विशतक साजरं करेल, असं वाटत असतानाच कॅप्टन रोहित शर्माने भारताचा डाव ८बाद ५७४ धावांवर घोषित केला. रोहित शर्माने रवींद्र जडेजाचे द्विशतक न होताच डाव घोषित केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. मात्र या निर्णयापाठीमागे राहुल द्रविडच असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. राहुल द्रविडच्या नावाची चर्चा रंगण्याचे कारण म्हणजे, यापूर्वी राहुल द्रविडने कॅप्टन असताना २०००४ला मुलतानमध्ये पाकिस्तान विरुद्ध सचिन तेंडुलकर १९४ धावांवर खेळत असताना आपला डाव घोषित केला होता.

सचिन तेंडुलकरचे द्विशतक न होता राहुल द्रविडने डाव घोषित केल्यामुळे त्यावेळी देखील द्रविडला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा राहुल द्रविडने इतिहासाची पुनरावृत्ती केल्याचं बोललं जात आहे. आणि त्यामुळेच पुन्हा एकदा राहुल द्रविड यानेच रवींद्र जडेजाचं द्विशतक होऊ दिलं नसल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र यात काहीही तथ्य नसून, मी कॅप्टन म्हणून खेळाडूंच्या वैयक्तिक विक्रमाला नाही तर, संघाच्या हिताचा विचार करतो, असं दाखवण्याचा हा रोहित शर्माने केलेला प्रयत्न असल्याचं, अनेकांकडून बोलण्यात येत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.