‘पिंपरी’ ग्रामपंचायत निवडणूक;’हनुमंत शिंदे’का ठरले ‘किंग’मेकर?

0

माळशिरस तालुक्यातील पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणूकीचा विचार केला तर, खूपच आश्चर्यकारक घटना घडल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे. कधी कोणाचं पारडं जड होईल? हे कोणालाही सांगता येत नसून,अजूनही पिंपरी ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीचा सस्पेन्स कायम असल्याचे दिसून येत आहे.

एकनाथ कर्चे आणि राजेश कर्चे यांच्या गटातील दोन सदस्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर पिंपरी ग्रामपंचायत सरपंच निवडणूक खऱ्या अर्थाने चर्चेत आली.

या याचिकेची सुनावणी करताना न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांना 18 फेब्रुवारी पर्यंत या प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या निकालानंतर खऱ्या अर्थाने एकनाथ कर्चे यांच्या गटाच्या हालचाली सुरू झाल्याचे गावातील स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

एकनाथ कर्चे यांच्या गटातील, दोन सदस्यांविरोधात भक्कम पुरावे ‘वादींकडे’ असल्यामुळे, निकाल हा आपल्याच बाजूने लागणार हा विश्वास ‘राणबादेव लोणारबाबा भोजलिंग ग्रामविकास पॅनल’ यांना आल्यानंतर पाच सदस्यांची मोट बांधत सर्वसामान्यांच्या मनातली ग्रामपंचायत आपण स्थापन करू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

वार्ड क्रमांक 3 मधून विजय झाल्यानंतर हनुमंत शिंदे यांच्या पत्नी संगिता हनुमंत शिंदे ह्या लगेच एकनाथ कर्चे यांच्या गटाला मिळाल्या. मात्र या गटाला मिळत असताना,त्यांनी सत्तास्थापनेत माझाही कुठेतरी विचार व्हावा. अशी आपली इच्छाही बोलून दाखवली. परंतु या गटाकडे पिंपरी ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करण्याएवढे संख्याबळ असल्यामुळे हनुमंत शिंदे यांचा हवा तसा सन्मान केला गेला नाही. अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली.

‘राणबादेव लोणारबाबा भोजलिंग ग्रामविकास पॅनलचे’ प्रमुख आणि ‘शिंदे’ यांनी,आपण सर्वजण सोबत असलो तर, ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता येऊ शकते. हा विश्वास सगळ्यांनी एकामेकांना दिला. आणि सगळ्यांनी मिळून भोजलिंगाची शपथ घेत,पुढची दिशा ठरवण्याचे स्पष्ट केले. एकनाथ कर्चे यांच्या गटातील दोन सदस्यांच्या अपात्रतेविषयी ‘शिंदे’ यांना पूर्ण जाणीव असल्याने,त्याचबरोबर या प्रक्रियेत ‘शिंदे’ यांचा मोठा वाटा असल्याने ‘ते’ कुठेही जाणार नाहीत,याची सर्वांनाच खात्री पटली. असं वार्ड क्रमांक तीन मधील स्थानिकांकडून सांगण्यात आलं.

त्याचबरोबर ‘शिंदे’ यांनी ‘राणबादेव लोणारबाबा भोजलिंग ग्रामविकास’ पॅनल सोबत जाऊनच सत्ता स्थापन करावी,अशी प्रबळ इच्छा वार्ड क्रं३ मधील बहुतांश मतदारांची होती. कारण वार्ड क्रं३ च्या जनतेने एकनाथ कर्चे यांचा पॅनल’ नाकारला होता. आणि पुन्हा जर ‘शिंदे’ एकनाथ कर्चे यांच्याशीच हातमिळवणी करत असतील,तर आम्ही ते कदापी सहन करणार नाही. असा स्पष्ट इशारा देखील जनतेने दिल्याची माहिती आहे.

‘शिंदे’ यांनी देखील जनतेची भावना समजून घेऊन ‘राणबादेव लोणारबाबा भोजलिंग’ सोबत मिळायचे ठरवले. त्याचबरोबर काहीही झालं तरी,या पॅनल सोबतच सत्ता स्थापन करायची. आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही,असा निश्चय केला. मात्र राजकारणात काहीही घडू शकतं. हे पुन्हा एकदा पिंपरी गावातील मतदारांनी अनुभवलं.

एकनाथ कर्चे यांच्या गटाने, आश्वासन,त्याचबरोबर विविध मार्ग अवलंबून ‘शिंदे’ यांना आपल्या गटात खेचून आणण्यात यश मिळवले. आणि पुन्हा एकदा एकनाथ कर्चे गट,’शिंदे’ यांच्या मदतीने पिंपरी ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करेल,हे जवळपास निश्चित झाले. ‘शिंदे’ यांनी एकनाथ कर्चे गटाला मिळून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असला तरी, ‘शिंदे’ यांना एवढं महत्व किंवा ‘किंगमेकर’ बनण्याची संधी ही ‘राणबादेव लोणारबाबा भोजलिंग’ पॅनलमुळेच मिळाली आहे,हे ‘शिंदे’ यांनी कदापिही विसरू नये,असं वार्ड क्रमांक तीन मधील मतदारांनी सांगितलं.

त्याचबरोबर ‘शिंदे’ यांना, राणबादेव लोणारबाबा भोजलिंग पॅनलमुळेच महत्व आले आहे. जर एकनाथ कर्चे यांच्या गटातील दोन सदस्यांविरोधात याचिका दाखल केली नसती तर,’शिंदे’ यांना कोणी विचारलं असतं का?असा सवालही वार्ड क्रमांक तीन मधील मतदारांनी विचारला आहे.

वार्ड क्रमांक तीन मधील मतदार पुढे असंही म्हणाले,जर शिंदे यांनी वार्ड क्रमांक तीन मधील सदस्यांसोबत पिंपरी ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन नाही केली तर,त्यांना आम्ही चांगलाच धडा शिकवू. अजूनही वेळ गेलेली नसून, शिंदे यांनी वेळेत परत येऊन,ज्या पद्धतीने सुरुवातीला भोजलिंगाच्या साक्षीने ठरलं होतं, त्याचीच अंमलबजावणी करावी. राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर मुल्य,तत्व याबरोबरच जनतेच्या मनात काय आहे? याचाही विचार करणं खूप गरजेचे आहे. असं वार्ड क्रमांक तीन मधील मतदार अधिक तीव्रतेने बोलताना दिसून आले.

पिंपरी ग्रामपंचायत सरपंच निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून,शिंदे यांची पुन्हा घरवापसी होणार का? हा प्रश्न सध्या खूप चर्चेत असून,येणाऱ्या काळात पिंपरी ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता येणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.