पिंपळगाव ग्रामपंचायतीकडून “लोकन्यायालय आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन

इंद्रपाल कांबळे,मांडवी प्रतिनिधी-

मांडवी पासून दहा किलोमीटर अंतरावर पिंपळगाव ग्रामपंचायतच्या वतीने काल १० तारखेला “लोक न्यायालय आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन केले होते. असा उपक्रम राबवणारी पिंपळगाव ग्रामपंचायत ही इतिहासातली पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

लोकन्यायालयाद्वारे कायदेविषयक साक्षरता शिबिर या उपक्रमाअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा हा उपक्रम असून पिंपळगाव ग्रामपंचायतद्वारे हा उपक्रम राबवण्यात आला. फक्त उपक्रम राबवण्यातच आला नाही,तर या उपक्रमात एकूण साठ प्रकरणांपैकी तब्बल १९ प्रकरणे निकालीही लावण्यात आली‌.

मांडवी परिसरातील ग्रामीण भागात पिंपळगाव ग्रामपंचायतीने “लोकन्यायालय आपल्या दारी” हा उपक्रम प्रथमच राबविल्यामुळे या ग्रामपंचायतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राबवण्यात आलेल्या या लोकन्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून निवृत्त न्यायाधीश कमलाताई वडगावकर या अध्यक्ष म्हणून होत्या. न्यायाधीश कमलताई वडगावकर यांनी विचार मांडत असताना असे सांगितले की,लोक न्यायालय आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या, या कार्यक्रमा अंतर्गत लोक न्यायालयाला विशेष अधिकार देण्यात आलेले असून यात फेरयाचिका म्हणून येथे निकाली निघालेली प्रकरणे परत न्यायालयात नेता येणार नाहीत. हे या न्यायालयाचे विशेष अधिकार आहेत असे न्यायमूर्तीं यांनी सांगितले.

लोकन्यायालयाचे महत्त्व सांगत त्यांनी न्यायदान,पैसा,वेळ या गोष्टींची बचत त्याच्यामुळे गरीब आणि गरजू जनतेला याचा सरळ फायदा होतो,असे सांगत आपले विचार संपवले.

यावेळी अनेक वकील मान्यवरांनी आपले विचार मांडत असताना, “न्यायालय आपल्या दारी” या कार्यक्रमांमधून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा,व बालमजूर, ज्येष्ठ नागरिक कायदा, असे महत्त्व पटवून देण्यात आले. वकिल डी.जे काळे यांनी प्रस्तावना मांडीत असताना, सर्वसामान्यांना कायद्याची ओळख व्हावी. विधी साक्षरता व्हावी. सर्वांना सर्वोच्च न्यायालयाचे विचार समजावेत. वाद-विवाद मिटावेत,असे या कार्यक्रमाचा उद्देश आहे. असं डीजे काळे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

तालुका विधी सेवा संघ समिती किनवट,यांच्यातर्फे फिरते लोकन्यायालय या विषयावर हा उपक्रम राबविण्यात आला असून, किनवट वकील संघ व पिंपळगाव ग्रामपंचायत व विकास कुडमते, आदी मान्यवरांनी यासाठी परिश्रम घेत हा कार्यक्रम पार पाडण्यात यशस्वी भूमिका बजावली.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.