कविता! माझं चिकणं चिकणं बाळ


माझं चिकणं चिकणं बाळ
माझं चिकणं चिकणं बाळ ||धृ||
आई जाते शाळेला
डॅडी जाति ऑफिसला
टाटा करता येई रडुला
भिजुन जाती गाल ||१||
माझं चिकणं चिकणं बाळ||

गणरायाला वंदन करतो
ए, बी, सी, डी …गिरऊ लागतो
बॅग शाळेची पाठी घेतो
ऐटित चाले चाल ||२||
माझं चिकणं चिकणं बाळ||

किती पसारा खेळ खेळता
क्रिकेटची आवड बघता
चेंडू मागे पळता पळता
आमुचे होती हाल ||३||
माझं चिकणं चिकणं बाळ||

घरभर गाड्या तऱ्हे त॒ऱ्हेच्या
रिमोट धरतो समोर टिव्हीच्या
मोबाईल कानावर त्याच्या
करी कुणाला कॉल ||४||
माझं चिकणं चिकणं बाळ||

ताई सांगे गंमती जमती
दादा संगे दंगा मस्ती
काका मावशी कौतुक करती
सर्वांचा लडिवाळ ||५||
माझं चिकणं चिकणं बाळ||

गंध फुले देवांस वाहतो
हवनी बसता स्वाहा बोलतो
ग्रंथ वाचता मध्येच येतो
कधी नाचुनी ताल ||६||
माझं चिकणं चिकणं बाळ||

माळ जपाची गळा घालितो
हळूच विण्याची तार ओढितो
स्वामी नामाचा गजर करतो
वाजवूनीया टाळ||७||
माझं चिकणं चिकणं बाळ||

बाळ हट्ट हे बालपणीचे
दिवस सुखाचे आजी आजोबांचे
हे तर देणे भगवंताचे
गोकुळीचा हा लाल ||८||
माझं चिकणं चिकणं बाळ||

– सन्निधा निलेश पणदेरे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.