आपली त्वचा उलणे/फुटते कारण..
.
हिवाळा हा खरे तर सुख देणारा ऋतू. पण या दिवसांमध्ये
तापमान एकदम कमी होऊ लागल्यावर त्वचा आणि ओठ फुटतात, टाचांना भेगा पडतात, केस कोरडे पडणे या गोष्टी होत असतात. आपण थंडीपासून स्वतला वाचवण्यासाठी उबदार कपडे घालत असतो , तशीच त्वचेचीही काळजी घेणे गरजेचे आहे.
थंडीत त्वचेतला वात वाढतो आणि त्यातील ओलावा कमी होत असतो. त्याचसोबत स्निग्धपणा कमी होत असतो. कोरड्या पडलेल्या त्वचेमुळे दिवसा आणि रात्रीही त्वचेला स्पर्श केल्यावर ती रखरखीत आणि ओबडधोबड जाणवते. त्वचा आणखीनच कोरडी पडली तर त्याची सालपटे निघतात, खासकरून टाचांना भेगा पडतात, काहींची त्वचा खूप कोरडी आणि कडक होते व ती खवल्यांसारखी दिसत असते.
सध्या दिवस हिवाळ्याचे आहेत. वातावरण बदलत आहे .तसे पाहायला गेलो तर थंडीची चाहूल लागायला हवी होती. पण अद्याप आपण कडक उन्हाचा सामना करत आहोत. पहाटेच्या वेळी कमी प्रमाणात थंडी जाणवत आहे. पण या हवामानाच्या बदलांचा सगळ्यात जास्त व वाईट परिणाम होतो तो आपल्या त्वचेवर. या हवामान बदलाच्या काळात आणि येणाऱ्या नव्या ऋतु मध्ये त्वचेला सगळ्यात जास्त आवश्यकता असेल ती ओलाव्याची. या काळात त्वचा कोरडी पडते, रुक्ष होते. यामुळे आपल्याला त्रास होतो. पण त्वचा नक्की कोरडी का पडते याबाबत जाणून घेऊ.
आपली त्वचा हे एक आपल्या शरीराचे संरक्षणात्मक आवरण आहे. या कवचाचे दोन भाग पडतात. ते म्हणजे अंत:त्वचा आणि बाह्यत्वचा असे दोन भाग असतात. बाह्यत्वचेमध्ये पेशींचे एकावर एक असे अनेक थर अस-तात. हे थर जिवाणू पासून व विषाणू पासून होणाऱ्या संक्रमणाला थांबवत असतात. इतर रोग संक्रमण होऊ नये यासाठी सुरक्षाकवच म्हणून काम करतात. सर्वात आतील थर नेहमी नव्याने तयार होत असतो, बाहेरील थर मृत होतो. अंत:त्वचेमध्ये मेदाम्लांचा थर असतो, या थरात तैलग्रंथी आणि घर्म ग्रंथी असतात. तैलग्रंथीमध्ये सिबम स्रवले जाते, हे सिबम केसांच्या बीजकोषाला तेल पुरवत असतात. या केसाच्या बीजकोषातून केसाची निर्मिती होते, केस आणि तेल/सिबम ग्रंथीच्या नलिकेतून त्वचेवर येत असतात. त्यामुळे त्वचा मऊ राहत असते. घर्मग्रंथीमध्ये घाम स्रवला जातो, घामामध्ये युरिया,अमिनो आम्ले, पाणी, उष्णता असते, त्यामुळे शरीरातील तापमान व क्षार मेन्टेन रहात असते.
थंडीमध्ये त्वचेतील सर्वात बाहेरील पेशींचा थर मृत होतो आणि झडून जातो, त्वचेला रखरखीतपणा येत असतो, त्याला आपण त्वचा फुटली असे म्हणतो. तसेच वातावरणातील तापमान व हवेतील आद्र्रता कमी झाल्यामुळे त्वचेमधून ओलसरपणा बाहेर टाकला जातो, तैलग्रंथींचे कार्य मंदावते आणि त्यामुळे त्वचा कोरडी पडत असते.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम