सदाभाऊ खोत यांची नाराजी दूर करण्यात चंद्रकांत पाटलांना यश
राज्यात पदवीधर निवडणुकीचे बिगुल वाजले असून ही निवडणूक आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. अनेक विभागात वेगवेगळ्या पक्षांनी आपली ताकद पणाला लावण्यास सुरुवात केली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यावर्षी खूपच जोरदार होण्याची चिन्हे आहेत. सध्या पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही या निवडणुकीत जोर लावल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपकडून पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र त्यांची उमेदवारी जाहीर करताना मित्र पक्षांना विश्वासात घेतलं नसल्याने मित्रपक्षांमध्ये नाराजी होती. रयत क्रांतीचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांनीही आपला उमेदवार जाहीर केला होता. मात्र काल चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांची भेट घेऊन नाराजी दूर केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांची नाराजी दूर करत रयत क्रांतीचे उमेदवार एन डी चौगुले यांना या निवडणुकीतून माघारी घेण्यात यश मिळवले आहे. रयत क्रांती संघटना आता भाजपच्या संग्राम देशमुख यांना पाठिंबा देणार असून आता ही निवडणूक खूपच रंजक झालेली आहे.
रयत क्रांतीने या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवल्याने, त्याचा थेट फायदा महाविकास आघाडी सरकारला होऊन भाजपला याचा तोटा होऊ शकतो. याविषयी सकारात्मक चर्चा सदाभाऊ खोत आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये झाली. आणि शेवटी चंद्रकांत पाटील याना सदाभाऊ खोत यांची नाराजी दूर करण्यात यश आलं.
पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक आता थेट राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये होणार आहे. ही निवडणूक खूपच अटीतटीची होणार असून, या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे अद्याप सांगता येणे कठीण झालं आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम