माळशिरस नगरपंचायतीवर गंभीर आरोप, पाणी पुरवठा योजने संदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ
माळशिरस, प्रतिनिधी : माळशिरस नगरपंचायतीच्या कारभारावर माहिती अधिकार (RTI) संदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, युवक काँग्रेस माळशिरस शहराध्यक्ष युवराज वाघमोडे यांनी प्रशासनावर माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युवराज वाघमोडे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माळशिरस नगरपंचायतीकडे नगरपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा योजनांची संपूर्ण माहिती, पत्रव्यवहार, आराखडे, मोजमाप पुस्तिका, खर्चाचा तपशील तसेच कामांचे छायाचित्रे मागविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. संबंधित अर्जामध्ये 2023 पासून आजपर्यंतच्या कालावधीतील माहितीची मागणी करण्यात आली आहे.
मात्र, अर्जदाराच्या म्हणण्यानुसार, वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून, माहिती देण्यास नकारात्मक भूमिका घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
युवराज वाघमोडे यांनी याप्रकरणी नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत, “जर सर्व कामे नियमबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने झाली असतील तर माहिती देण्यास प्रशासन का टाळाटाळ करत आहे?” असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच नगरपंचायतीच्या कारभारात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप असून माहिती रोखली जात असल्याची शंका देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, माहितीचा अधिकार कायद्यानुसार सार्वजनिक प्राधिकरणांनी नागरिकांना निर्धारित कालावधीत माहिती देणे बंधनकारक आहे. त्यामुळे या प्रकरणात माहिती का देण्यात आली नाही, हा सवाल उपस्थित होत आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.