Ajit pawar vs Amol kolhe: ..म्हणून अजित पवारांना फुल कॉन्फिडन्स; काय आहे शिरूर लोकसभेचे गणित? खरचं कोल्हे पडतील?
Ajit pawar vs Amol kolhe: अजित पवारांना राजकारणातला दादा म्हंटले जाते. राजकारनामध्ये त्यांची दादागिरी शरद पवारांमुळे चालते, असेही बोललं जातं होतं. मात्र अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाल्याने, राजकारणात त्यांचा दबदबा कायम राहतो का? हाही महत्वाचा मुद्दा आहे. विरोधकही अजित पवारांवर टीका करताना अनेकदा विचार करतात.
“मी कुणाच्या नादी लागत नाही. अन् माझ्या कुणी नादी लागला, तर त्याला मी असा तसा सोडत नाही” हा डायलॉग तुम्ही अजित दादांच्या तोंडून अनेकदा ऐकला असेल. एखाद्याला आव्हान दिलं, तर अजित पवार निवडणुकीत त्याचा करेक्ट कार्यक्रम करतातच. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही विजय शिवतारेंना दिलेलं आव्हान अजित पवारांनी खरं करून दाखवलं होतं. आता यावेळी अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हे विरोधात आपले दंड थोपटलेत.
दोन दिवसापूर्वी अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर सरकून टीका केली. पाच वर्ष जी व्यक्ती मतदारसंघात फिरकली नाही, त्यांना आता चांगलाच जोर आलाय. कुणाला संघर्ष यात्रा सुचतेय कुणाला पद यात्रा सुचतेय. असं विधान अजित पवार यांनी केलं. या विधानाला पार्श्वभूमी होती शेतकरी आक्रोश मोर्चा या आंदोलनाची.
अमोल कोल्हे यांना उमेदवारी मी दिली होती. त्यांना निवडून आणण्यासाठी जिवाचं रान मी आणि दिलीप वळसे पटलांनी केलं. पाच वर्ष मतदार संघात लक्ष दिलं असतं, तर अशा यात्रा करायची गरज पडली नसती. निवडणुका जवळ आल्यामुळे यांना असलं सुचाय लागलंय. यंदा शिरूरमध्ये उमेदवार देणार आणि निवडूनच आणून दाखवणार. असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हे विरोधात दंड थोपटलेत.
अमोल कोल्हे विरोधात मी उमेदवार देऊन, तो निवडूनच आणणार, अजित पवारांच्या या विधानामुळे शिरूर लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आलाय. शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची ताकद अधिक आहे, हे समजून घेण्यासाठी या मतदारसंघात येणारे सहा विधानसभा मतदार संघ जाणून घेणे आवश्यक आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, हडपसर, शिरूर, भोसरी, असे सहा विधानसभा मतदार संघ येतात. सहा पैकी पाच मतदार संघ राष्ट्रवादीकडे आणि भोसरीचा एक भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे अमोल कोल्हेसाठी ही निवडणूक सोपी असणार नाही. राष्ट्रवादीच्या फुटीमुळे शिरूरमध्ये येणाऱ्या आणि राष्ट्रवादीकडे असणाऱ्या पाच विधानसभा मतदार संघाची ताकदही विभागली गेलीय, त्यामुळे याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.
2019 मध्ये अमोल कोल्हे 58000 मताधिक्याने निवडून आले होते. त्यापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील दोन वेळा खासदार राहिलेत. 2014 ला शिवाजीराव आढळराव पाटील तब्बल तीन लाख मतांनी निवडून आले होते. त्यामुळे त्यांचीही ताकद या मतदारसंघात आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा अजित पवार की शिंदे गट लढवणार? हाही मुद्दा उपस्थित होणार आहे. सीटिंग खासदार या फॉर्मुल्यासह जागावाटप ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार हेच शिरूर लोकसभा मतदारसंघ लढू शकतात.
जर शिरूर लोकसभा मतदारसंघ अजित पवारांकडे गेला, तर अमोल कोल्हे विरोधात अजित पवार दिलीप वळसे पटलांना रिंगणात उतरवू शकतात. आंबेगाव मतदार संघ दिलीप वळसे पाटील आपल्या मुलीला सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभा लढवण्यासाठी दिलीप वळसे पाटील तयारही असतील. दिलीप वळसे पाटलानंतर अजित पवारांकडे विलास लांडे हाही पर्याय आहे.
अमोल कोल्हे विरोधात जर दिलीप वळसे पाटील यांनी दंड थोपटले,तर अमोल कोल्हेसाठी हे आव्हान सोपं नसणार आहे. शिरूर मतदारसंघात मराठा मतांची संख्या अधिक आहे. दिलीप वळसे पाटीलही याच समाजातून येत असल्याने त्यांना याचा फायदा होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेमुळे अमोल कोल्हे घराघरात पोहोचले होते. छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा अमोल कोल्हेंनी साकारली होती. ही व्यक्तिरेखा लोकांना प्रचंड भावलीही होती. साहजिकच त्यावेळी अमोल कोल्हेंच्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना निवडणुकीच्या रिंगणात झाला हे उघड आहे.
आता मात्र अमोल कोल्हेना वेगळं अस्त्र घेऊन मैदानात उतरावं लागणार आहे. मतदार संघातील विकास कामे, हा मोठा फॅक्टर असेलच. याशिवाय उद्धव ठाकरे, शरद पवारा यांची सहानुभूती, सोबतीला भाजप विरोधात लोकांचा असणारा असंतोष या सगळ्यांची सांगड अमोल कोल्हेसाठी जमेची बाजू असणार आहे. असं असलं तरी अजित पवारांची पाच विधानसभा मतदार संघात असणारी ताकद आणि सोबतीला भाजपचे Perception यावर शिरूर लोकसभेचा निकाल ठरणार आहे.
आतापर्यंत अजित पवार शरद पवारांच्या सावलीत वाढत होते. आता त्यांनी आपली वेगळी चूल मांडलीय. त्यामुळे अजित पवारांसोबत जरी अधिक आमदार असले तरी निवडणुकीच्या रिंगणात मतदार अजित पवारांना किती गंभीर्याने घेतात, यावही निकालाचे गणित अवलंबून असेल.
हे देखील वाचा Rohit Sharma ची संपत्ती तुम्हाला माहिती आहे का? आकडे पाहिल्यानंतर तुमचीही उडेल झोप..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम