ODI WC 2023 : चार वर्षात दोन World Cup जिंकणाऱ्या इंग्लंडची इतकी वाताहात का झाली?

0

ODI WC 2023 : विश्वचषक 2023 (world Cup 2023) मध्ये इंग्लंड संघ आता सेमी फायनलच्या रेस मधून बाहेर झाला आहे. उर्वरित चारही सामने जिंकले तरीदेखील इंग्लंड सेमी फायनलमध्ये पोहोचू शकणार नाही. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी या स्पर्धेचा इंग्लंड प्रबळ दावेदार मानला जात होता. अगदी भारतापेक्षाही अधिक जास्त संधी इंग्लंडकडे असल्याचे अनेक क्रिकेट दिगज्जांनी म्हटलं होतं. मात्र गतविजेता पाच सामन्यात सलग चार पराभव पाहणारा इतिहासात पहिलाच संघ ठरला आहे. चार वर्षात दोन आयसीसी स्पर्धा जिंकणाऱ्या इंग्लंड संघाची (England cricket team) इतकी वाताहात का झाली? याला त्यांनी 2019 पासून 2023 पर्यंत खेळलेले क्रिकेटच जबाबदार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या 2015 च्या विश्वचषकात इंग्लंड संघाला साखळीत गारद व्हावं लागलं होतं. अगदी बांगलादेश संघानेही त्यांच्या पराभव केला होता. या पराभवानंतर इंग्लंड संघाने आपल्या खेळात मोठा बदल करण्याचे ठरवलं. कॅप्टन मॉर्गनला सर्व अधिकार देण्यात आले. मॉर्गनच्या नेतृत्वात 2015 पासून 2019 मध्ये एकूण 88 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये 34 खेळाडूंना संधी दिली.

34 खेळाडू मधूनच विश्वचषकाचा संघ निवडला. 2019 च्या विश्वचषकात इंग्लंडने निवडलेल्या संघात 13 खेळाडू 88 पैकी तब्बल 40 आणि त्यापेक्षा जास्त सामने खेळलेले होते. मॉर्गनच्या नेतृत्वात याच संघाने 2015 पासून 2019 पर्यंत 20 एकदिवसीय मालिकाही खेळल्या. त्यापैकी तब्बल पंधरा एकदिवसीय मालिकांमध्ये विजय मिळवला होता.

विश्वचषक 2019 च्या विश्वचषकासाठी निवडलेला संघातील सर्व खेळाडूंना आपला रोल देण्यात आला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल 15 मालिका जिंकलेल्या संघ विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करणारच, हे साधं गणित आहे. या सगळ्यांचं फळ त्यांना 2019 मध्ये मिळालं. ते चॅम्पियनही झाले.

2015 ते 2019 या चार वर्षाच्या कालावधीमध्ये इंग्लंड संघाने तब्बल 88 एकदिवसीय सामने खेळले होते. मात्र 2019 पासून 2023 या चार वर्षांमध्ये त्यांनी केवळ 42 एकदिवसीय सामने खेळले. या 42 एकदिवसीय सामन्यात तब्बल 44 खेळाडूंना संधी देण्यात आली. इंग्लंड संघाची वाहतात होण्याचे प्रमुख कारण, म्हणजे 2023 च्या विश्वचषकातील आठ खेळाडू 42 पैकी निम्मेही सामने खेळले नाहीत.

मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्याअगोदर तुमचा गृहपाठ मजबूत असणे आवश्यक असते. इंग्लंडने बरोबर इथे मार खाल्ला. केवळ गृहपाठच नाही, तर इंग्लंड संघाला विश्वचषकात देखील आपले अंतिम 11 कोण आहेत? याचे उत्तर अद्याप मिळाले नाही. वानखेडेच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजांनी गोलंदाजांचा समाचार घेतल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाने सर्वच गोलंदाज बदलून टाकले.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला (Jos Buttler) आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन काय आहे? त्याचबरोबर टॉस जिंकल्यानंतर, क्षेत्ररक्षण की फलंदाजी करावी? याही प्रश्नाचे उत्तर अद्याप शोधता आलं नाही. वानखेडेच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बटलरने घेतला. तो अपयशी ठरल्यानंतर, श्रीलंकेच्या पुढच्या सामन्यात त्याने फलंदाजी केली. तिथेही सडकून मार खाल्ला.

हे देखील वाचा IND vs ENG WC Match : इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडिया संकटात; दुखापतीमुळे स्टार खेळाडू दोन सामन्यातून बाहेर..

ENG vs SL: इंग्लंड अधिकृतरित्या बाहेर! श्रीलंकेच्या विजयाबरोबरच स्पष्ट झाले चार सेमी फायनललिस्ट..

Chanakya quotes: विशी ओलांडल्यानंतर चुकूनही करू नका ही चूक, अन्यथा जिवंतपणी भोगाल त्या सगळ्या यातना..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.