‘युवराज सिंग’चा रणजी ट्रॉफीत धमाका; कर्नाटकच्या तब्बल पाच फलंदाजांना केले आउट

0

कालपासून रणजी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. रेल्वे आणि कर्नाटक या संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रेल्वे संघाच्या युवराज सिंगने गोलंदाजीत आपली चुणूक दाखवली आहे. या सामन्यात पाच बळी घेत कर्नाटकच्या निम्मा संघाला युवराज सिंगने पवेलियनचा रस्ता दाखवला. कर्नाटक संघाचे तब्बल पाच खेळाडू त्याने आपल्या जाळ्यात अडकवले असले तरी कर्नाटक संघाने धावांचा डोंगर उभा केला आहे.

टॉस जिंकून कर्नाटक संघाने प्रथम फलंदाजी करत रेल्वे संघासमोर धावांचा डोंगर उभा केला. मनीष पांडे आणि कृष्णमूर्ती सिद्धार्थ या दोघांनी डॅडी हंड्रेड करत कर्नाटक संघाला तब्बल 481 धावांचा डोंगर उभा करून दिला. खेळात सातत्य नसल्याने भारतीय संघातून डच्चू मिळालेल्या मनीष पांडेने या कसोटी सामन्यात जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत 156 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर दुसरीकडे कृष्णमूर्ती सिद्धार्थ याने देखील १४६ धावांची खेळी केली.

मनिष पांडेला 156 धावांच्या खेळीमुळे जेवढा आनंद त्याला झाला नाही, त्याच्याहून अधिक आनंद केएल राहुलला झाला असल्याचं, बोललं जात आहे. त्याचे कारण म्हणजे मनीष पांडेला लखनऊ संघाने आयपीएलच्या लिलावात खरेदी केलं आहे. लखनऊ संघाचा कर्णधार के एल राहुल असल्याने त्यांची मिडल ऑर्डरची चिंता मिटणार आहे. २०२२च्या आयपीएल मेघा लिलावानंतर इतर संघाच्या तुलनेत लखनऊ संघ हा अधिक बलशाली झाला असल्याचं, अनेक क्रिकेट विश्लेषकांनी म्हटलं आहे.

त्यातच आता मनीष पांडे देखील लईत आल्याने हा संघ दिवसेंदिवस बलशालीच होत चालल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक संघाने रेल्वे संघासमोर 481 धावांचा डोंगर उभारला, मात्र रेल्वे संघाची सुरुवात देखील ठीक ठाक झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रेल्वेच्या संघाने दोन विकेट गमावून, १३३ धावा केल्या आहेत. तत्पूर्वी ‘रेल्वे’संघाकडू युवराज सिंगने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.

रेल्वे संघाकडून खेळणार्‍या युवराज सिंगचा जन्म हा बरेली, उत्तर प्रदेशमध्ये झाला आहे. तो एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली भूमिका पार पाडतो. युवराज सिंग जलदगती गोलंदाजी करत असून, तो उत्तम फलंदाजी देखील करतो. पहिल्याच सामन्यात त्याने केलेली ही कामगिरी अनेकांचे लक्ष वेधून घेत असून, येणाऱ्या काळात युवराज सिंग आपल्या संघासाठी एक्स फॅक्टर ठरणार असल्याचं रेल्वे संघाच्या कोचने देखील म्हटले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.