अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या शाखेचे उद्घाटन जल्लोषात; तरुणांचा मोठा प्रतिसाद

अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या शाखेचे उद्घाटन एक जानेवारीला माळशिरस तालुक्यातील पिंपरी या गावामध्ये करण्यात आले. या गावात मोठ्या प्रमाणात लोणारी आणि धनगर समाज वास्तव्यास असल्याने येणाऱ्या काळात त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी या शाखेची स्थापना झाली असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष ‘श्रीकांत राणे’ यांनी दिली.

अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे तालुका अध्यक्ष भिमराव कर्चे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत राणे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष ‘भागवत जाणकर’ माण तालुकाध्यक्ष ‘आबासो शिंदे’ यांनी शाखेच्या उद्घाटन सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला असल्याचं, तालुका अध्यक्ष भिमराव कर्चे म्हणाले.

अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या पिंपरी शाखेच्या शाखा अध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्या ‘तानाजी कर्चे’ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी येणाऱ्या काळात आम्ही या संघटनेच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या अडचणी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष ‘भागवत जाणकर’ यांनी या संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष ‘भिमराव कर्चे’ यांचे विशेष कौतुक केले.

आपले मनोगत व्यक्त करताना जानकर म्हणाले, भीमराव जरी साधा मेंढपाळ असला तरी, त्याला कमी लेखता येणार नाही. दळणवळणासाठी इंग्रजांना डोंगरातून रस्ता कसा काढायचा? याचा मार्ग सापडत नसताना, शिंगरोबा धनगराने इंग्रजांना रस्ता दाखवण्याचं काम केलं होतं. त्याचप्रमाणे भीमराव देखील तालुक्यातील ओबीसी समाजाला विचारांचा मार्ग दाखवतील, यात शंका नाही. कमी काळात त्याने आपल्या कामाची चुणूक दाखवली असल्याने, नक्कीच भिमराव ओबीसी समाजाच्या अडचणी येणाऱ्या काळात सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील.

अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ या सामाजिक संघटनेच्या दुसऱ्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी पिंपरी गावातील तरूण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पिंपरी गावचे जेष्ठ समाजसेवक मारुती राणे,अविनाश कर्चे, पोलीस पाटील नानासो कर्चे, पिंपरी गावचे उपसरपंच मारुती कर्चे, ग्रामपंचायत सदस्य गणेश गेंड, बापूराव कर्चे हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी केले, तर आभार ग्रामपंचायत सदस्य गणेश गेंड यांनी मानले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.