कौतुकास्पद..! अखिल भारतीय ओबीसी सेवासंघाच्या तालुका अध्यक्षपदी ‘मेंढपाळ’ची निवड; सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव

0

राज्यभरात समाजाच्या हिताचे काम करणाऱ्या अनेक संघटना पाहायला मिळतात. मात्र अनेक संघटनांचे पदाधिकारी निवडताना बऱ्याच गोष्टीचा विचार केला जातो. आणि नंतरच पदं दिली जातात. हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र नव्याने स्थापन झालेल्या अखिल भारतीय ओबीसी सेवासंघ महाराष्ट्र राज्याच्या या सेवा संघाने एक वेगळा आदर्श घालून दिल्याचे पाहायला मिळत आहे.

अखिल भारतीय ओबीसी सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष ‘हनुमंत सुतार’ यांच्या अध्यक्षतेखाली सध्या या सेवा संघाची संघटनात्मक बांधणी सुरू आहे. जिल्हा, तालुका पातळीवर अध्यक्ष, उपाध्यक्ष विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे काम जोमाने सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय ओबीसी सेवासंघाची माळशिरस तालुक्याच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली.

अखिल भारतीय ओबीसी सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत राणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या माळशिरस तालुका अध्यक्ष निवडीचे चर्चा आता राज्यभर होताना पाहायला मिळत असून, या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक देखील होत आहे. ‘भिमराव मारुती कर्चे’ असं या कार्यकर्त्यांचं नाव असून या कार्यकर्त्याची अखिल भारतीय ओबीसी सेवासंघाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

आता अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल, यात विशेष असं काय आहे? तर कोणताही राजकीय वारसा याच्याकडे नाही. एका सामान्य कुटुंबातून आलेला हा तरुण एक साधा ‘मेंढपाळ’ आहे, आणि म्हणून त्याची निवड विशेष असल्याचं बोललं जातं आहे‌. भिमराव कर्चे यांच्या अध्यक्ष निवडीची चर्चा सध्या जोरदार होत असून, विविध स्तरांतून या निवडीचे कौतुक देखील होत आहे. हा तरूण मेंढपाळ असला तरी सामाजिक कार्यात त्याला आवड आहे.

लोकांच्या अडचणींची जाणीव या तरूणाला आहे. सामाजिक कार्यात फक्त आवडच नाही तर, ओबीसी बांधवांच्या प्रश्नाविषयी असणारी तळमळ देखील भिमराव कर्चे यांच्यात प्रकर्षाने जाणवली असल्याचे, अखिल भारतीय ओबीसी सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार यांनी तालुका अध्यक्ष निवडताना बोलल्याचे समजते.

सामान्य कुटुंबातील माणसालाच सामान्यांच्या अडचणी माहीत असतात, समजत असतात. मी एक ‘मेंढपाळ’ असलो तरी, माझ्या ओबीसी बांधवांच्या अनेक समस्या मला माहिती आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळात प्रामाणिक काम करत माझ्या बांधवांना न्याय देण्याचं काम मी पोटतिडकीने करणार असल्याचं भिमराव कर्चे यांनी अध्यक्ष निवड झाल्यानंतर सांगितले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.