२४ पोते कांद्यांची पट्टी केवळ १३ रुपये; या १३ रुपयांत काय शेतकऱ्याने सरकारचा ‘तेरावा’ घालायचा का..

शेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ हा फारच भयानक असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. एकीकडे शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावाने विकला जातोय, तर दुसरीकडे निसर्ग देखील शेतकऱ्यांवर कोपला आहे. हिवाळा पावसाळा आणि उन्हाळ्यानंतर देशात आता हिवसाळा असाही एक नवीन ऋतू अस्तित्वात आल्याचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत. भर हिवाळ्यात पावसाने एक तारखेपासून जोरदार बॅटिंग केल्याने शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खासकरून कांदा उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचे चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे.

महत्त्वाचे नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहिलं जातं. डिसेंबर जानेवारीत शेतकरी लाल कांदा काढायला सुरुवात करतो. मात्र यावेळी निसर्गाने शेतकऱ्याचा सगळा अंदाज चुकवला, आणि सगळं होत्याचं नव्हतं करून टाकल. ऐन भरात आलेले पीक अचानकपणे झालेल्या अवकाळी पावसामुळे नाहीसं झालं. आणि शेतकऱ्यांच्या आशेवर क्षणात पाणी फिरल्याचे चित्र राज्यभर दिसून आले. शेतकऱ्यांच्या सर्वच पिकाला या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला, मात्र सर्वात जास्त फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

दोन दिवसापूर्वी बापू कावडे या शेतकऱ्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २४ पोते कांदा विकला. रुद्रेश पाटील या व्यापाऱ्याला विकलेल्या कांद्याचे वजन जवळपास बाराशे किलो होते. मात्र 24 पोते विकलेल्या कांद्याची पट्टी केवळ केवळ 13 रुपये आली. बापू कावड्या शेतकऱ्याच्या हातात अवघे १३ रुपये आल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. १३ रुपये आलेल्या पट्टीची दखल शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे.

कांद्याला सरासरी बाजार भाव हा अठराशे ते 2000 रुपये होता. मात्र शेतकऱ्यांना कांद्याचे भाव वाढण्याची आशा होती, म्हणून अनेकांनी कांदा स्टॉक करून ठेवला. मात्र अचानक पणे झालेल्या अवकाळी पावसात कांद्याचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले, स्टॉक करून ठेवलेला कांद्याला कोम आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत हा कांदा एक रुपये ते दोन रुपये किलो या दराप्रमाणे विकला गेल्याने, शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठवणारे, शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील बापू कावडे या शेतकऱ्यांची 24 कांद्याच्या पोत्यांची पट्टी १३ रुपये आल्याने संताप व्यक्त करत, सरकारवर जोरदार टीका केली आहे. राजू शेट्टी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून बापू कावडे शेतकऱ्याला 13 रुपये आलेली पट्टी शेअर करत, या १३ रुपये आलेल्या पट्टीत सरकारचा काय तेरावा घालायचा का? असा संताप व्यक्त केला आहे.

बापू कावडे या शेतकऱ्याने 24 पोते कांदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत रुद्रेश पाटील या व्यापाऱ्याला विकला.२४ पोत्याचे वजन ११२३ भरले. ११२३ किलोचे १६६५ रुपये मिळाले, मात्र हमाली, तोलाई, मोटारभाडे जाऊन या शेतकऱ्याच्या हातात अवघे १३ रूपये आलल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला आहे. बापू कावडे यांनी विकलेल्या २४ पोते कांद्याची पट्टी शोशल मिडीयावर तुफान व्हायरलही झाली आहे. सोशल मीडियावर या प्रकाराचा संताप अनेकांकडून व्यक्त करण्यात येत असून, सरकारवर देखील जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.