T20 World Cup 2021: सव्याज परतफेड..! ‘इंग्लंड’च्या तोंडातला घास ‘या’ दोन बहाद्दरांनी काढून घेतला;न्यूझीलंड पहिल्यांदाच फायनलमध्ये

0

दुबईमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकातला आज पहिला सेमी फायनल सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये(NZvENG) खेळविण्यात आला. १६७ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ गडगडला. मात्र जिम्मी निशम आणि डॅरिल मिशेल या दोघांनी शेवटच्या तीन षटकात 57 धावा काढत टी-20 विश्वचषक २०२१च्या फायनलमध्ये धडक मारली. (New Zealand reach T20 World Cup final)या सामन्यात अनेक क्रिकेट दिग्गजांनी इंग्लंडचा संघ अधिक फेवरेट असून न्यूझीलंडला सहज पराभूत करेल असं म्हटलं होतं. मात्र सगळ्यांचा अंदाज चूकीचा ठरवत, न्यूझीलंडच्या संघाने टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला आहे.

टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसने घेतला. And won the toss and elected to field first) न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली, मात्र शेवटच्या काही षटकात मोईन अली(५१धावा) आणि लिविंगस्टन(१७) या दोघांनी फटकेबाजी करत इंग्लंड संघाला १६६ धावांपर्यत मजल मारून दिली. इंग्लंडच्या संघाने १६६ ही आव्हानात्मक धावसंख्या उभारली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवात देखील मजबूत करून दिली. ख्रिस वोक्सने आपल्या पहिल्या आणि तिसऱ्या षटकात अनुक्रमे गुप्तील आणि विल्यमसनला बाद करत इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. हा सामना इंग्लंडचा संघ सहज जिंकेल असं वाटत असताना, एका बाजूने सलामीवीर डॅरिल मिशेल आणि जिम्मी नीशम या दोघांनी इंग्लंडच्या आशेवर पाणी फिरवलं.

२०१९ च्या विश्‍वचषकाप्रमाणेच आजच्या सामन्यात देखील चढ-उतार प्रेक्षकांना पाहायला मिळाले. २०१९च्या विश्वचषकात नशिब इंग्लंडच्या बाजूने होतं, तर या वेळेस न्यूझीलंडच्या बाजूने असल्याचे पाहायला मिळाले. २०१९च्या विश्‍वचषकामध्ये ‘बेन स्टोक’ने मारलेला फटका सीमारेषेजवळ ट्रेंट बोल्टला व्यवस्थित पकडता आला नाही, झेल पकडताना त्याचा पाय सीमारेषेला चिकटला आणि तो षटकार दिला गेला. या सामन्यात देखील याची पुनरावृत्ती झाली, मात्र यावेळेस इंग्लंडच्या बेसस्टोला सीमारेषेजवळ झेल पकडता आला नाही.

त्याचं झालं असं क्रिस जॉर्डन आपल्या संघासाठी १७वे षटक घेऊन आला. या षटकात जिमी निशमने तब्बल २३ धावा कुटल्या. आणि सामना आपल्या बाजूने फिरवला. मात्र या ओव्हरमध्ये जिमी निशमने क्रिस जॉर्डनच्या एका चेंडूवर जोरदार फटका मारला. चेंडू सीमारेषेजवळ गेला. झेल पकडण्यासाठी बेसस्टो पुढे आला. बेसस्टोने झेल पकडला देखील, मात्र त्याचा पाय सीमारेषेला चिकटल्याने हा षटकार देण्यात आला. एकूणच काय तर २०१९च्या विश्वचषकामध्ये जशी घटना न्यूझीलंड खेळाडूंच्या बाबतीत घडली, तशीच घटना आज इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये देखील घडल्याचे पाहायला मिळाले.

१६७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या न्‍यूझीलंड संघाची सुरुवात फारच निराशाजनक झाली. सलामीवीर मार्टिन गुप्टिल आणि न्यूझीलंड संघाच्या फलंदाजीचा कणा समजला जाणारा केन विल्यमसन हे दोघेही २.४ षटकात संघाची धावसंख्या केवळ १३ असताना हे दोघेही बाद झाले. आणि इंग्लंडच्या संघाने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली. मात्र एका बाजूने सलामीवीर ‘डॅरिल मिशेल’ आणि मधल्या फळीतला फलंदाज ‘डेव्हॉन कॉन्वे’ या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली.

या दोघांनी ८२ धावांची भागीदारी करत न्यूझीलंड संघाच्या फायनलमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र तरीदेखील हा सामना न्यूझीलंडचा संघ जिंकेल असे कुठेही वाटत नव्हतं, कारण जिमी निशम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा, त्यांच्या संघाला विजयासाठी 29 चेंडूत तब्बल 60 धावांची आवश्यकता होती. मात्र नीशम येताच, हातातून निसटलेला सामना न्यूझीलंडने एकहाती खेचून आणला. निशम ११चेंडूत २७ धावांची झुंजार खेळी केली.

‘निशम’ बाद झाल्यानंतर, सामना पुन्हा इंग्लंडच्या बाजूने झुकला असं वाटू लागलं. मात्र सलामीपासून मैदानात तग धरून उभ्या राहणाऱ्या ‘डॅरिल मिशेल’ने सामन्याची सगळी सुत्रे आपल्या हातात घेत ख्रिस वोक्सच्या षटकात सलग दोन षटकार आणि त्यानंतर एक चौकार ठोकत न्यूझीलंड संघाला या विश्वचषकाच्या फायनलचे तिकीट मिळवून दिले. त्याने नाबाद ४७ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने चार चौकार तर तितकेच गगनचुंबी षटकार लगावले. त्याने केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.