Ram Satpute: मोहीते-पाटलांच्या बालेकिल्ल्यावर आमदार राम सातपुते यांचे वर्चस्व

0

१९५१ साली माळशिरस विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून या मतदार संघात मोहिते-पाटलांचं वर्चस्व राहिला आहे. मात्र आता बीजेपीचे आमदार राम सातपुते(ram satpute)यांनी या तालुक्यात आपला खूप मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. तरुणांमध्ये आमदार राम सातपुते यांची खूप मोठी क्रेझ असल्याचे दिसून येते. राम सातपुते यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मोहिते-पाटील यांचं तालुक्यालं अस्तित्व हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. (MLA Ram Satpute seems to have a big craze.)

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हा मोहिते-पाटलांचा बालेकिल्ला समजला जातो. १९५१ साली हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून या मतदार संघात मोहिते-पाटील घराच वर्चस्व असल्याचे पाहायला मिळते. १९५१साली या तालुक्याला सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या रूपात पहिला आमदार मिळाला. १९५१ पासून आज पर्यंत या तालुक्यात मोहिते-पाटील यांच्या शिवाय राजकारणाचं पान देखील हालत नसल्याचं अजून पर्यंत तरी पाहिला मिळालं आहे.

शंकरराव मोहिते पाटील या तालुक्यातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. दोन टर्म त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. असे सलग चार वेळा ते आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेवर गेले. शंकरराव मोहिते-पाटील यांच्यानंतर त्यांचे जेष्ठ पुत्र विजयसिंह मोहिते-पाटील यांनी या मतदारसंघाचे तब्बल सहा वेळा प्रतिनिधित्व करत या तालुक्याचे राजकारण आपल्या अवतीभवती फिरत असल्याचे दाखवून दिले. १९८० ते २००४ पर्यंत माळशिरस मतदार संघातून ते महाराष्ट्राच्या विधानसभेवर गेले. सुशिलकुमार शिंदे मंत्रिमंडळात 2003 साली राज्याचे सहावे उपमुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं.

सलग सहा वेळा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करताना विजयसिंह मोहिते पाटील यांनी, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम,पर्यटन आणि ग्राम विकास अशा महत्वाच्या पदावर मंत्री म्हणून काम पाहिले. २००९ला हा मतदार संघ राखीव झाल्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हनुमंतराव डोळस’ या मतदारसंघातून निवडून आले. २००९ आणि २०१४ला सलग दोन वेळा विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर निवडून येत, या मतदारसंघाचे आमदार म्हणून हनुमंतराव डोळस यांनी नेतृत्व केले.

२००९ला माळशिरस मतदार संघ राखीव झाल्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवली. मात्र अपक्ष उमेदवार ‘भारत भालके’ यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मोहिते-पाटील घराण्याला पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्यासाठी हा जोरदार धक्का मानला गेला. या पराभवापाठीमागे राष्ट्रवादीचाच हात असल्याचं देखील त्यावेळी बोललं गेलं. मात्र राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यामुळे यात काही तथ्य असेल, असं वाटत नाही. असं अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं.

२०१४पूर्वी काँग्रेसवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. देशभरातून अनेक आंदोलने केली केली. निर्भया बलात्कार प्रकरणामुळे काँग्रेस काही प्रमाणात बॅकफूटवर गेल्याचे चित्र देशभर उभा राहिलं. जंतर-मंतर मैदानावर लोकपाल बिलासाठी ‘अण्णा हजारेंचं उपोषण हेडलाईन बनलं. काँग्रेसवर देशभरातून नाराजी असल्याचे दिसून आले. त्यातच भारतीय जनता पार्टीकडून गुजरात मॉडेलचे चित्र देशभरात उभं करण्यात आलं. त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यात आलं. संपूर्ण देशभरात मोदी लाट आली आणि या लाटेत अनेक दिग्गज निवडणुकीत पराभूत झाले.

२०१४ला मोदी लाट असताना देखील माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील विजयी झाले. आणि पुन्हा एकदा मोहिते-पाटील यांची जादू कायम असल्याचे पाहायला मिळाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अवघ्या चार जागा आल्या होत्या. त्यात मोहिते-पाटील यांचाही विजय झाल्याने हा विजय खूप मोठा मानला जातो.

कृष्णा भिमा स्थिरिकरण योजनेचे कारण देत लोकसभा निवडणुकीपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी अजूनही ऑफिशियली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला नसला,तरी अकलूजमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींसोबत त्यांना स्टेजवर पाहिलं गेलं होतं.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देखील माळशिरस हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे,या मतदारसंघातून ‘राम सातपुते’ यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं. ‘राम सातपुते’ यांच्यावर बाहेरचा उमेदवार म्हणून मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. मात्र माळशिरस मतदारसंघ हा मोहिते-पाटलांचा बालेकिल्ला राहिला असल्यामुळे, या मतदारसंघातून राम सातपुते सहज विजयी होतील असं चित्र होतं. मात्र राम सातपुते यांना स्थानिक उमेदवार आणि धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी कडवी झुंज दिली. मात्र त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला.

राम सातपुते यांनी राष्ट्रवादीच्या उत्तमराव जानकर यांचा २७०२ मतांनी पराभव करत, या तालुक्यात पहिल्यांदाच कमळ फुलवलं. राम सातपुते यांचा जरी विजय झाला असला तरी, राष्ट्रवादीचा उमेदवार आणि त्यांच्यात अवघ्या २७०२ मतांचा फरक असल्यामुळे, या मतदारसंघात मोहिते-पाटील यांची जादू कमी झाली की काय? असा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला आहे.

या मतदारसंघात धनगर समाजाचा खूप मोठा वर्ग आहे. उत्तमराव जानकर हे देखील धनगर समाजाचे नेते असल्यामुळे स्थानिकांनी कदाचित त्यांना पसंती दर्शविली असं म्हणता येईल. तालुका मोहिते-पाटलांचा बालेकिल्ला असल्यामुळे या तालुक्यात मोहिते-पाटील ठरवतील तोच उमेदवार सहज जिंकेल असं अनेक राजकीय विश्लेषकांचे मत होतं,मात्र सातपुते हे बाहेरचे उमेदवार असल्याने त्यांना याचा फटका बसला ही शक्यता नाकारता येत नाही.

राम सातपुते, माळशिरस मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांचा लोकांशी कमालीचा जनसंपर्क असल्याचे पाहायला मिळते. लोकांच्या छोट्या-मोठ्या व्यवसायाचे उद्घाटन करण्यासाठी ते आवर्जून जात असतात. प्रत्येक गावातल्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होताना अनेक वेळा दिसून येतं. मतदार संघातील कुठल्याही सामान्य माणसाने त्यांना फोन केला तर,ते लगेच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. असं चित्र सध्या तालुक्यात उभं राहिल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे मोहिते-पाटलांचे एकेकाळी तालुक्यात वर्चस्व होतं. मात्र आता तालुक्‍यातील जनतेशी त्यांचा पाहिजे तेवढा जनसंपर्क राहिला नाही. मोहिते-पाटलांना तालुक्यात पर्याय नेते तयार झाले. सत्तेतून बाहेर राहिल्याने, त्यांना विकासकामे देखील करता आली नाहीत. आणि आता नवनिर्वाचित आमदार राम सातपुते यांचा जनतेशी असणारा जनसंपर्क पाहता, मोहिते पाटलांचं या तालुक्यातलं अस्तित्व हळूहळू कमी होताना पाहायला मिळत आहे. तालुक्यातील जनताही आपल्या अडचणी, विकास कामासंदर्भात काही तक्रारी असतील तर,भाजपचे आमदार राम सातपुते यांनाच संपर्क करत असल्याचे पाहायला मिळते.

माळशिरस मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून म्हणजेच १९५१ पासून या माळशिरस तालुक्यात मोहिते-पाटील यांचाच बोलबाला राहिला आहे. मात्र आता आगामी काळात मोहिते-पाटील यांच्या हातून माळशिरस तालुका जाण्याची दाट शक्यता असल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी काळात राम सातपुते यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

हेही वाचा- बाळासाहेब हे वाक्य बोलले नसते तर आज नरेंद्र मोदी पंतप्रधान सोडा, राजकारणातही कुठे दिसले नसते..

 अजित पवार यांना डावलून रोहित पवार होणार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.