Marathwada flood:मोठा भाऊ म्हणत होता नोकरी कर,शेतात फक्त शेतकऱ्यांचं मरण असतं,भावाचं ऐकलं नाही आणि होत्याचं नव्हतं झालं…! शेतकऱ्याची व्यथा ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

लोकशाही ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात सतत मुसळधार पाऊस पडल्याने तेथील शेतकरी अक्षरशा हवालदिल झाला आहे. सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पिकांबरोबर शेतीचं देखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

अद्याप सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस अशी मदत जाहीर झालेली नसल्यामुळे,शेतकरी प्रचंड अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळते.

महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे जीवनमान विस्कळीत झाले असून,शेतकरी आता मायबाप सरकारकडे मदतीची आशा लावून बसलाय. सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत असलं तरी,त्यांना प्रत्यक्षात ठोस मदत कधी मिळणार? हा प्रश्न सर्वांनाच पडलाय.(Marathwada flood)

कोरोणाने सगळ्यांच्याच डोक्यावरचे छत काढून घेतले आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांची चांगल्या पगाराची नोकरी गेली. नोकरी गेल्यामुळे अनेक तरुण शेतीकडे वळला. गावाकडे राहून त्याने विविध प्रकारच्या अनेक पिकात बऱ्यापैकी उत्पन्न देखील काढलं. मात्र काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडल्याने हातातोंडाशी आलेला घास त्याच्या तोंडातून पावसाने हिरावून घेतला. आणि होत्याचं नव्हतं होऊन बसलं.

शेतकऱ्यांचे हे नुकसान जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात झाल्याचं पाहायला मिळतं.

अशाच एका जालना जिल्ह्यातील ‘दैठणा’ गावांमधील ‘श्रीनिवास थेटे’ या तरुण शेतकऱ्याचं देखील पावसामुळे कधी ‘न’ भरून निघणारं नुकसान झालंय.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या ‘दैठणा’ गावचे शेतकरी ‘श्रीनिवास थेटे’ यांनी अनेक माध्यमांशी संवाद साधताना आपली व्यथा मांडली.

मोठा ‘भाऊ’ म्हणायचा, नोकरी कर, शेतीत फक्त शेतकऱ्यांचं मरण आहे. मोठ्या भावाचं ऐकत शेतीकडे वळलो. शेती करण्यासाठी मी घरच्यांचे दागिने गहाण ठेवले. जवळपास चार लाखापर्यंत बँकेच कर्जही घेतलं.

मोसंबीची जवळपास साडे सहाशे झाडं जगवली. 50 टनापेक्षा जास्त माल निघणारच होता. मात्र अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसल्याचं ‘श्रीनिवास थेटे’ सांगतात.

‘मोसंबी’तून विक्रमी उत्पन्न मिळवण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस कष्ट घेतलं होतं. फळांची उत्तम प्रकारे निगा राखत,श्रीनिवास थेटे यांनी जवळपास पंचवीस ते तीस फवारण्या देखील केला होत्या.

मात्र या पावसाने सगळं हिरावून घेतलं. अचानक झालेल्या पावसामुळे फक्त माझ्या फळबागेचेच नाही,तर शेतीबरोबर शेततळ्याचं देखील फार मोठे नुकसान झाल्याचं,श्रीनिवास थेटे सांगतात.

शेतीसाठी पाणी कमी पडू नये म्हणून,मी एक शेततळं देखील बांधलं होतं. मात्र नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की,शेजारी असणाऱ्या शेततळ्यात या नदीचे पाणी घुसलं,आणि क्षणात शेततळं भुईसपाट झालं‌.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी नागरिकांना प्रशासनाने सर्वतोपरी मदत करावी. असे आदेश देण्यात आले असले तरी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी?आणि किती मिळणार? याविषयी शेतकरी संभ्रमात आहेतच.

शासन आणि प्रशासन फक्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी करतंय. मात्र ठोस अशी कोणतीही मदत अजूनही जाहीर केलेली नाही. सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर जरी केली तरी,ती किती असेल? याविषयी अनेक प्रश्न आहेतच. पोटच्या पोराप्रमाणे जपलेली पीकं डोळ्यादेखत माती मोल तर झालीच आहेत. मात्र शेतातली एक दीड फूट माती देखील वाहून गेली आहे. शेताला भेगा पडल्यात. शेती करण्यासाठी पाणी कमी पडू नये,म्हणून बांधलेलं शेततळंही भुईसपाट झालंय. हे नुकसान सरकारच्या तुटपुंज्या मदतीने भरून निघणार आहे का? असा संतप्त सवाल श्रीनिवास थेटे केला आहे.

‘श्रीनिवास थेटे’ सारखे महाराष्ट्रातील अनेक शेतकरी या अतिवृष्टीचे बळी ठरलेत. उभ्या जगाचा पोशिंदा अशी ओळख असणारा शेतकरी प्रत्येक वर्षी संकटात सापडतो. मात्र यावर्षी त्याचं अधिक मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सरकार नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना किती मदत करते? हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.