headingley test:भारताचा अवघ्या ७८ धावांत धुव्वा का उडाला? वाचा सविस्तर!

भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजासमोर भारतीय फलंदाजांनी हेडिंगली मैदानावर अक्षरशः लोटांगण घातल्याने भारतीय संघाचा अवघ्या ७८ धावांत धुव्वा उडाला आहे.

 

लॉर्ड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर ऐतिहासिक विजय मिळवला होता. या विजयात देखील भारतीय गोलंदाजांनी,फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याने भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवण्यात यश आलं होतं.

याच आत्मविश्वासाने भारतीय संघ हेडिंगलीच्या मैदानावर पोहचला होता. भारतीय संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र जेम्स अँडरसनने पहिल्याच षटकात तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या ‘के एल राहुल’ला तंबूत पाठवले. ‘फुल लेंथ’ असणाऱ्या चेंडूवर ‘कव्हर ड्राईव्ह’ मारताना ‘के एल राहुल’ आपली विकेट गमावून बसला.

के एल राहुल बाद झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ लगेच चेतेश्वर पुजाराला देखील अॅडरसनने आपल्या जाळ्यात अडकवलं. जेम्स अँडरसनच्या गळाला सर्वात मोठा मासा लागला तो विराट कोहलीच्या रुपात. सुरुवातीच्या तिन्ही प्रमुख फलंदाजांना जेम्स अँडरसनने आपल्या जाळ्यात अडकवलं. आणि भारताच्या फलंदाजीच कंबरडं मोडून काढलं.

ठराविक अंतराने भारतीय फलंदाज बाद होत गेले, आणि भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांत गडगडला. भारताकडून रोहित शर्माने १०५ चेंडूचा सामना करत थोडाफार संघर्ष केला,मात्र तोही १९ धावा काढून बाद झाला.

भारतीय संघाचा ४०.४ षटकात अवघ्या ७८ धावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी धुव्वा उडविला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला,ही गोष्ट जरी खरी असली तरी,त्याला भारतीय फलंदाजांनी देखील खराब शॉट्स खेळून तितकीच साथ दिली. हे देखील अजिबात नाकारता येणार नाही.

                मिडल ऑर्डर ठरतेय डोकेदुखी

गेल्या अनेक सामन्यांचा विचार केला तर,भारताची मधली फळी चिंतेचा विषय ठरली आहे. २०२०/२१ या वर्षात भारताचा कर्णधार विराट कोहलीने १८ डावात २३ च्या सरासरीने अवघ्या ४१४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराने २५ डावात २४ च्या सरासरीने ५८० धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेने देखील २४ डावात २५ च्या सरासरीने ६०९ धावा केल्या आहेत.

भारताच्या तीन चार आणि पाच क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या प्रमुख तीन फलंदाजांची सरासरी पाहिली तर,ती केवळ २३,२४,२५ इतकी आहे. आणि म्हणून तिघांच्या खेळावर क्रिकेट चाहते देखील आता भडकल्याचे पाहायला मिळत आहे.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडच्या संघाने बिनबाद २९ धावा केल्या होत्या. सलामीवीर हसीब हमीद १५ तर रॉरी बर्न ११ धावावर खेळत होते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.