ढगफुटी म्हणजे नक्की काय? ढगफुटी कशी होते?; जगातील सर्वात मोठी ढगफुटी भारतामध्ये कधी व कुठे झाली?

मुंबई, कोकणासह  राज्याच्या विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली  असून, गेले १ २ दिवस  पावसाने कोकणामध्ये रौद्ररुप  धारण केले आहे. बुधवारी रात्रीपासून कोकणात जोरदार  पाऊस होत असून, तेथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे.  पावसामुळे चिपळूनमध्ये दाणादाण उडाली आहे. पावसाचा कहर सुरू असून, चिपळूण  तालुक्यामध्ये भीषण परिस्थिती पावसाने  निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव या दोन्ही  नदीला पुर आला असल्याने  चिपळूण शहराला पुराच्या पाण्याने  वेढा दिला आहे.

चिपळूण  शहराच्या अनेक भागामध्ये पाणी शिरलं असून, शहरातील अंतर्गत मार्गदेखील  बंद झाले आहेत.  चिपळूनमध्ये पुन्हा २००५ ची पुनरावृत्ती होते की काय  अशी नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे . शहरातील बाजारपेठा पाण्याखाली आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता  एनडीआरएफची टीम  पुण्याहून चिपळुणमध्ये  दाखल झाली आहे.  मुसळधार पडणाऱ्या  पावसामुळे ढगफुटीच्या चर्चांना  उधाण आले आहे.

ढगफुटी झाल्याच्या बातम्या व्हायरल केल्या जात आहे. परंतु किनारपट्टी भागामध्ये ढगफुटी होत नाही.  उंच प्रदेशात ढगफुटीची शक्यता अधिक असते आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये ढगफुटी होण्यासंदर्भातील बातम्या या शास्त्रीय दृष्ट्या  अयोग्य ठरतात.

ढगफुटीच्या प्रक्रिया आपण जाणून घेऊ:

ढगफुटीमध्ये गडगडाटी, वादळी पावसाला घेऊन येणारे ढगच  असतात.  थोडक्यात झपाटय़ाने एकत्र होत जाणारे पावसाळी ढग ही ढगफुटीची सुरुवात असते. गरम हवा व आद्रता या दोन्ही घटकांमुळे  ढगांमधील पाण्याचे प्रमाण वाढते. पाण्याचे प्रचंड थेंब या ढगांमध्ये पसरले जातात. मग यामुळेच  जोरदार पाऊस पडतो. परंतु कधीकधी या ढगांमध्ये वेगाने वर चढणारा हवेचा स्तंभ तयार  होतो.  पाण्याच्या थेंबाना सोबत  घेऊन तो वरवर जात असतो . या स्तंभाबरोबर वेगाने वर जात असताना पाण्याचे थेंब चांगले गरगरीत होऊ लागतात. कधीकधी तर या थेंबांचा आकार ३.५ मिमीपेक्षा (3mm) होतो.

बऱ्याचदा या वर चढणाऱ्या  हवेच्या स्तंभामध्ये अतिशय गतिशील  वारे निर्माण होतात. ढगातच छोटी छोटी वादळे निर्माण होतात. या वादळामध्ये पाण्याचे थेंब सापडतात. वादळामध्ये वेगाने गिरक्या घेत असताना हे पाण्याचे थेंब एकमेकांवर आदळले जातात आणि यामुळेच पाण्याचे थेंब एकमेकांमध्ये मिसळून अजून मोठे मोठे होतात.  हवेचा तयार झालेला  स्तंभ आता पाण्याच्या मोठमोठय़ा थेंबाना घेऊन वरवर झेपावू  लागतो.

हवेच्या निर्माण स्तंभाची जेवढी  ताकद असेल तेवढाच तो वर चढतो आणि मग जत्रेतील पाळण्याप्रमाने  हा हवेचा स्तंभ एवढ्या प्रंचड वेगाने खाली येऊ लागत की  या स्तंभाने तोलून धरलेले पाण्याचे मोठे थेंब त्या पाळण्याप्रमाणेच   खाली झेपावतात.  सुसाट वेगाने ते जमिनीकडे येतात. हवेचा स्तंभ आता जमिनीचा दिशेने तयार होतो. वरून येणाऱ्या  थेंबाचा वेग सुरुवातीला  ताशी १२ किमी च्या आसपास असतो. तो बघता बघता ताशी ८० ते ९० किमी एवढा प्रचंड होतो.

ढग जरी मोठा असला तरी ढगाचा विस्तार जास्त नसतो. यामुळेच जमिनीवरील लहानशा भागामध्ये पाण्याचा जणू स्तंभ कोसळतो. मोठमोठे थेंब व तीव्र वेग यामुळे जमीन झोडपून निघते. झाडे-झुडपे, लहान प्राणी, कच्च्या इमारती यांच्यासाठी पावसाचा वेग  धोकादायक असतो.  जमिनीची पाणी शोषून घेण्याची वेगवेगळ्या भागातील क्षमता ही वेगवेगळी असते व पाणी शोषण्यासाठी वेळदेखील लागत असतो. त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी पडल्यामुळे शोषून घेण्याचे जमिनीचे कामच थांबते  आणि सर्वत्र पुरासारखी स्थिती निर्माण होते. ढगफुटी डोंगरावर झाली तर पाण्याबरोबर माती देखील मोठय़ा प्रमाणात माती पायथ्याकडे ढकलली जाते.

वरती चढणारा स्तंभ व खाली येणारा स्तंभ यांच्यामुळे  ढगफुटी होत असते.  हवेचा हा स्तंभ ज्यावेळी वेगाने जमिनीवर आदळतो तेव्हा  पाण्याबरोबर चारी दिशेने वाऱ्याची वावटळ निर्माण होते. हे वारे कधी कधी ताशी दीडशे ते दोनशे किमी  वेग घेतात. या वावटळीमुळे लहान लहान झाडे एका रेषेमध्ये मोडून पडतात. विमानांसाठी हवेचे हे स्तंभ  अत्यंत धोकादायक असतात. जर विमान अशा स्तंभामध्ये  सापडले तर हमखास कोसळते. जगात आत्तापर्यंत झालेल्या अनेक विमान अपघातांना हवेचे हे स्तंभ धोकादायक ठरले आहेत. विमानांच्या  अपघातांमुळेच या हवेच्या स्तंभांचा अभ्यास सुरू झाला.

.

जगातील  सर्वात मोठी ढगफुटी भारतात लेहमध्ये ६ ऑगस्ट २०१० रोजी झालेली ढगफुटी ही जगातील सर्वात मोठी ढगफुटी मानली जाते. अगदी थोडय़ा काळामध्ये एवढ्या मोठय़ा प्रमाणात जगात आजपर्यंत कुठेही पाऊस पडलेला नाही. केवळ एका मिनिटामध्ये दोन इंच पाऊस.. ढगफुटी या शब्दातच या घटनेचा अर्थ स्पष्टपणे कळतो. भल्या मोठ्या पाण्याने भरलेल्या टाकीचा तळ अचानक बाजूला केला की  जेवढं पाणी पडेल एवढा पाऊस.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.