अजब….! 19 इनिंग्स आणि 170 चेंडू खेळल्यानंतर लगावला षटकार!

जगभरात सर्वात लोकप्रिय असणाऱ्या क्रिकेट स्पर्धेला काल ९ एप्रिलपासून सुरुवात झाली असून,प्रेक्षकांना काल चेन्नईच्या चपॉक मैदानावर एक धमाकेदार सामना पहिला मिळाला. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगलोरने मुंबई इंडियन्सला दोन विकेट्सने पराभूत करत आयपीएल सीजन 14 मध्ये विजयी सलामी देत या स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली आहे.

विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. संघाची 24 धावसंख्या झाली असताना रोहित शर्मा धावबाद झाला. मात्र ख्रिस लीन आणि सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सच्या डावाला आकार दिला. अकराव्या षटकात 94 धावा फलकावर लागल्या असताना सुर्यकुमार आउट झाला.

मजबूत सुरुवातीनंतरही मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा गोलंदाज हर्षल पटेलने आपल्या चार षटकांत 27 धावा देत मुंबईच्या पाच प्रमुख फलंदाजांना बाद करत बेंगलोरला या सामन्यावर पकड निर्माण करून दिली.

160 धावांचे आव्हान बेंगलोर सहज पूर्ण करेल असं वाटत होते, मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी कसून गोलंदाजी करत बेंगलोर फलंदाजांच्या तोंडाला फेस आणला. मिस्टर थ्री सिक्सटी डिग्री एबी डिव्हिलियर्सने 27 चेंडूत 48 धावांची झंझावाती खेळी करत बेंगलोरला विजय मिळवून दिला.

ग्लेन मॅक्सवेलला रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाने 14 कोटीला खरेदी केल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. वीरेंद्र सेहवागने या निर्णयावर कडाडून टीकाही केली होती.

मॅक्सवेलने या सामन्यात 28 चेंडूत 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र त्याच्या या खेळीपेक्षा त्याच्या नावावर असणाऱ्या एक अजब रेकॉर्ड मोडित निघाल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली असल्याचे दिसून येत आहे.

 

ग्लेन मॅक्सवेलने तब्बल 19 इनिंग्स आणि 170 चेंडू खेळल्यानंतर षटकार लगावला आहे. 2018 पासून ग्लेन मॅक्सवेल एकही षटकार लगावला नव्हता. क्रिकेट आणि त्याच्या चाहत्यांसाठी हे खूपच निराशाजनक असून आता या रेकॉर्डची सगळीकडेच चर्चा रंगू लागली आहे.

आयपीएल 14व्या सीजनमध्ये मॅक्सवेलची सुरुवात सधानकारक झाली असली तरी,उर्वरित सामन्यांमध्ये त्याच्या कामगिरीकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.