दोनच दिवसात लोकल बॉयने उडवला ‘साहेबांचा’ धुव्वा

अहमदाबादच्या ऐतिहासिक नरेंद्र मोदी,क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये खेळला गेलेला तिसरा कसोटी सामना दुसऱ्याच दिवशी भारताने दहा विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेत,वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मधील आपली दावेदारी भक्कम केली.

मोटेरा क्रिकेट स्टेडियम या नावाने परिचित असणाऱ्या या मैदानाचं राष्ट्रपतींच्या हस्ते सामना सुरू होण्याच्या अगोदर नरेंद्र मोदी स्टेडियम असं नामकरण करण्यात आलं. दोन्हीं संघांच्या कर्णधारांनी आपापल्या संघाच्या खेळाडूंची राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शहा यांना ओळख करून दिली. जलदगती गोलंदाज इशांत शर्माचा हा १०० वा कसोटी सामना असल्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला.

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिरकीपटूंना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर साहेबांच्या फलंदाजांचा शिरकाव लागला नाही. लोकल बॉय अक्षर पटेलने होम ग्राउंडचा पुरेपूर फायदा उचलत दोन्हीं डावात मिळून इंग्लंडच्या तब्बल अकरा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. चेन्नईमध्ये खेळल्या गेलेला दुसऱ्या कसोटीचा हिरो रविचंद्रन आश्विनने देखील सात विकेट घेऊन अक्षराला चांगली साथ दिली.

या दोघांनी मिळून इंग्लंडच्या फलंदाजांना दोन्हीं डावात आपल्या तालावर नाचवलं. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ अवघ्या 112 धावांत गारद झाला. चांगल्या सुरुवातीनंतर भारताचा पहिला डाव देखील गडगडला. भारताने 45 धावांत शेवटचे तब्बल सात फलंदाज गमावले. भारताने पहिल्या डावात 145 धावा केल्या. पहिल्या डावात भारताला 33 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. 33 ही धावसंख्या मोठी नसली तरी,टर्निंग स्पीचवर ही धावसंख्या नक्कीच कमी नव्हती. हे भारतीय तसेच इंग्लंडच्या संघाला देखील माहिती होतं. दुसऱ्या डावात इंग्लंडने अवघ्या 81 धावांत गाशा गुंडाळल्यामुळे विजयासाठी भारतासमोर अवघ्या 49 धावांचे आव्हान उभे राहिले. हे आव्हान भारतीय सलामीवीरांनी यशस्वीरित्या पार करत,भारतीय संघाला 10 विकेट्सने विजय मिळवून दिला.

या विजयाबरोबरच भारतीय संघाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेत मालिका विजयाची दावेदारी भक्कम केला आहे. 4 मार्चला शेवटचा कसोटी सामना याच मैदानावर खेळवण्यात येणार असून,या सामन्यात भारतीय संघाला विजय किंवा सामना ड्रॉ राखण्यात यश आलं तर, भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.