पिंपरी ग्रामपंचायत निवडणूक;’शिंदे’ यांची भूमिका ठरणार निर्णायक

माळशिरस तालुक्यातील पिंपरी ग्रामपंचायत सरपंच निवडणूक आता खूपच ऐतिहासिक वळणावर येऊन ठेपली आहे. निकाल लागल्यानंतर सुरुवातीला एकनाथ कर्चे यांचाच गट पिंपरी ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करेल असं वाटत होतं. मात्र हळूहळू चित्रं बदलत गेली,आणि दोन्हीं ‘गटांसमोर’ अनेक खडतर आव्हानं उभी राहिली.

सुरुवातीला एकनाथ कर्चे यांच्या गटाकडे एकूण सहा सदस्य होते. मात्र त्यांच्या दोन सदस्यांच्या सदस्यत्वाविरोधात राणबादेव लोणारबाबा भोजलिंग ग्रामविकास विकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत या प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिल्यानंतर पिंपरीकरांची,पिंपरी ग्रामपंचायत सत्ता स्थापनेबाबतची उत्सुकता आणखीनच वाढल्याचे दिसून आले.

कोर्टाच्या आदेशानुसार पंधरा तारखेला जिल्हाधिकाऱ्यांसमोर वादी आणि प्रतिवादी हे दोघेही हजर राहिले. दोन दिवस सुनावणी झाल्यानंतर १८ तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल दिला.

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा निकाल देताना म्हटले,दोन्हीं प्रतिवादींना 12 सप्टेंबर 2001 नंतर एक-एक अपत्य जन्मले असून प्रतिवादी यांची एकूण अपत्ये दोन पेक्षा अधिक होत असल्याचे स्पष्ट होत आहे. आणि म्हणून विवाद अर्ज मंजूर करण्यात येत असून,महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४(१) चे पोटकलम (ज-१)अन्वये नाना यशवंत कर्चे आणि रुक्मिणी हनुमंत कर्चे या दोन्ही सदस्यांना या आदेशाच्या दिनांकापासून पिंपरी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून चालू राहण्यास ‘निरर्ह’ ठरवण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात प्रतिवादींना 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील करता येणार असून,ते या निर्णयाविरुद्ध काय भूमिका घेणार? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर एकनाथ कर्चे यांच्या गटाचे २ सदस्य अपात्र ठरल्यामुळे,उद्या पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदाची होणारी निवडणुकी ही एकूण नऊ सदस्यांमध्ये पार पडणार असल्याचे स्पष्ट आहे. त्याचबरोबर दोन्हीं गटाकडे प्रत्येकी चार-चार सदस्य असल्यामुळे पिंपरी ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता येणार? हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

वार्ड क्रमांक 3 मधून निवडून आलेल्या संगीता हनुमंत शिंदे या सदस्याची भूमिका,’पिंपरी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडीत’ निर्णायक भूमिका ठरणार असल्याचं स्पष्ट झाले असून,त्या कोणाला मतदान करणार आहेत? हे पिंपरीकरांना आज दुपारपर्यंत पाहायला मिळणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.