पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे अटकेच्या भीतीने फरार झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

गजानन मारणे हा अटकेच्या भीतीने फरार झाल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. एक प्रसिद्धीपत्रक काढुन पुणे पोलिसांनी याची माहिती दिली आहे. सोमवारी तळोजा कारागृहामधून सुटका झाल्यानंतर गजानन मारणेची त्याच्या समर्थकांनी तळोजा ते पुणे अशी जंगी मिरवणूक काढली होती. पुढे व मागे शेकडो वाहनांचा ताफा या मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता.

हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडाची अशी जंगी मिरवणूक निघाल्यामुळे पोलिस काय करतायत असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जाऊ लागला होता. त्यानंतर पोलिसांनी गजानन मारणे आणि त्याच्या समर्थकांविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमधे गुन्हे नोंद करण्याचे सत्र सुरू केले होते. कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक देखील करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी  गजानन मारणे याची न्यायालयाकडून जामिनावर सुटका करण्यात आली होती.

त्यानंतर गजानन मारणे याला नोटीस पाठवून इतर पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं. मात्र, जामिनावर सुटका होताच गजानन मारणे पुन्हा फरार झाला आणि त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेची अनेक पथकं तैनात करण्यात आल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. गजानन मारणे याच्यावर तळेगाव, हिंजवडी, वारजे, कोथरुड अशा वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमधे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

गजानन मारणे हा कोण आहे?
मागील अनेक दशकांपासून गजानन मारणे हे नाव पुण्यातीमधील  गुन्हेगारी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, बेकायदा शस्त्रं बाळगणं अशा प्रकारचे अनेक गुन्हे मारणेवर दाखल  आहेत. 2014 साली मारणे विरोधी टोळीतील पप्पू गावडे आणि अमोल बधे यांच्या हत्येच्या आरोपाखाली मारणे व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती.  अमोल बधेचा खून तर पुण्यातीमधील नवी पेठेत पाठलाग करून धारदार शस्त्रांच्या साहाय्याने करण्यात आला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या थरारक घटनेमुळे पुण्यामध्ये खळबळ उडाली होती.

गजानन मारणेच्या स्वागतासाठी जमलेल्या त्याच्या समर्थकांमध्ये तरुणाईत नुकत्याच प्रवेश केलेल्या युवकांचे  प्रमाण जास्त  आहे. गुन्हेगार आणि गुन्हेगारीचं अशाप्रकारे होणारं उदात्तीकरण या तरुणांची पावले गुन्हेगारी विश्वाकडे वळण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे या उद्दात्तीकरणाला जर वेळीच आळा घातला नाही, तर त्यामधून  असे अनेक गजानन मारणे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर  तसं झाले तर त्याला जबाबदार पोलिसच असणार आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.