राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्याला ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याचा कट उघड; मुंबई पोलिसांची कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या गाडीमध्ये ड्रग्ज ठेवून त्याला ड्रग्स प्रकरणात अडकवण्याचा कट आखणाऱ्या पाच जणांना मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाकडून  अटक केली आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव विजय कोळी यांनी एका स्थानिक बांधकामाला विरोध केला होता . पोलीस आणि महापालिकेकडे तक्रार केली होती. याच गोष्टीचा  राग मनात धरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात  हा कट आखण्यात आला होता.

“अब्दुल अजीज शेख उर्फ अज्जू हा या कटाचा मुख्य सूत्रधार आहे. ताडदेवमधील अनधिकृत झोपडपट्ट्यांना अधिकृत करण्यासाठी  अज्जू प्रयत्न करत होता आणि विजय कोळी यांनी याविरोधात तक्रार केली होती. याच गोष्टीचा  अब्दुल यांच्या मनात राग होता. राष्ट्रवादीचे नेते विजय कोळी यांना ड्रग्ज प्रकरणामध्ये  अडकवण्यासाठी अब्दुलने इतर आरोपींना पैसे पुरवले होते. अब्दुल आणि विजय कोळी यांचे राजकीय वैमनस्यदेखील आहे,” अशी माहिती पोलीस उपायुक्त  दत्ता नलवडे यांनी दिली आहे.

पोलिसांनी या कटातील आरोपी  अय्याज याला ९ जानेवारी रोजी अटक केले होते त्यानंतर हा सर्व  प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्याकडे १५० ग्रॅम मेफेड्रोन (MD) ड्रग्ज देखील सापडले होते. “ कसून चौकशी केल्यानंतर अय्याज याने आपल्याला विजय कोळी यांच्या कारमध्ये ड्रग्ज ठेवण्याची आणि नंतर पोलिसांना फोन करुन माहिती देण्याची सुपारी मिळाली असल्याची कबुली दिली,” अशी माहिती पोलीस उपायुक्त  दत्ता नलवडे यांनी दिली आहे. पोलिसांनी  आसिफ सरदार, नबी शेख आणि जाफर शेख यांना देखील अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आसिफ सरदार  ड्रग्जविरोधी संस्थेचा संचालक आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.