दुसऱ्या दिवसाच्या खेळाकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष;भारत मजबूत स्थितीत!

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळविण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या भागीदारीमुळे भारत मजबूत स्थितीत असून आज होणाऱ्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाकडे संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली, हे प्रमुख तीन फलंदाज अवघ्या ८७ धावांवर बाद झाल्यानंतर,उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि सलामीवीर रोहित शर्मा यांनी १६२ धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीतले सातवे शतक झळकावत १६१ धावांची आकर्षक खेळी केली. तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ६७ धावांची खेळी केली.

फिरकीपटूना कमालीची साथ देणारी ही खेळपट्टी असून फलंदाजी करणे या मैदानावर खूपच आव्हानात्मक आहे. जस-जसा खेळ पुढे जाईल तस-तशी ही खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देणार असल्याचं एक्सपर्ट कडून बोललं जातंय. पहिल्या दिवसअखेर भारताने सहा विकेट गमावून ३०० धावा केल्या असून ऋषभ पंत ३३ तर अक्षर पटेल ५ धावांवर खेळत आहेत. भारतीय संघाने या तीनशे धावांमध्ये आणखी साठ-सत्तर धावांची भर घातली, तरीदेखील ही धावसंख्या इंग्लंडसाठी खूप आव्हानात्मक असल्याचं बोललं जातंय.

आपल्या ताबडतोब फलंदाजीसाठी ओळखला जाणाऱ्या ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्याकडून क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा असणार आहेत. या दोघांनी मिळून जर 70 80 धावांची भागीदारी केली तर इंग्लंडसाठी ही कसोटी वाचवणं खूप आव्हानात्मक असणार आहे.

राहिलेल्या तीन कसोटी सामन्यात भारत दोन विजय आणि एक कसोटी अनिर्णित राखू शकला तरच भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करू शकणार आहे.‌

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.