पिंपरी ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यासाठी ‘या’ गटासमोर खूप मोठे आव्हान

माळशिरस तालुक्यातील पिंपरी ग्रामपंचायत सत्ता स्थापनेबाबत विचार केला तर,गेल्या काही दिवसांपासून अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. एकनाथ कर्चे आणि राजेश कर्चे यांचा गट पिंपरी ग्रामपंचायतीवर सहज सत्ता स्थापन करेल असं वाटत असताना,मारुती राणे गटाने त्यांच्या दाव्याला सुरुंग लावत आपणही सत्तास्थापनेचे हकदार असल्याचं सांगत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

एकनाथ कर्चे यांच्या वार्ड क्रमांक चारचे 3 आणि राजेश कर्चे यांच्या वार्ड क्रमांक दोनचे 3 सदस्य असे या गटाकडे एकूण सहा ग्रामपंचायत सदस्य झाले आहेत. तर मारुती राणे गटाकडे एकूण पाच ग्रामपंचायत सदस्य आहेत. मात्र एकनाथ कर्चे आणि राजेश कर्चे यांच्या गटातील दोन सदस्य ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास पात्र नसतानाही त्यांनी निवडणूक लढवल्याने, मारुती राणे यांच्या गटाने,या दोन्ही सदस्यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करत यांच्या सदस्यत्वाला आव्हान दिले.

मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची ऑर्डर देत हे प्रकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवत 18 फेब्रुवारीपर्यंत या प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पंधरा तारखेला वादी आणि प्रतिवादी या दोघांना जिल्हाअधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

एकनाथ कर्चे यांच्या गटातील दोन सदस्यांच्या विरोधात भक्कम पुरावे वादींकडे असल्यामुळे या प्रकरणाचा निकाल हा ‘राणे’ आणि हिराप्पा कर्चे गटांच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर असं झालं तर,एकनाथ कर्चे यांच्या गटाकडे एकूण चार सदस्य राहतील. आणि ‘राणे’ गटाकडे एकूण पाच सदस्य होतील.

एकूण नऊ सदस्यांमध्ये सरपंच निवडण्याची प्रक्रिया पार पडली तर,राणे गट 5-4 असे बहुमत सिद्ध करून पिंपरी ग्रामपंचायतीवर आपला दावा ठोकेल. परंतु हे सगळं सोपं वाटत असलं तरी एकनाथ कर्चे आणि राजेश कर्चे यांचा गट हे सगळं पाहत राहतील,असं अजिबात म्हणता येणार नाही. सत्ता स्थापनेबाबत यांच्या अनेक हालचाली सुरू असू शकतात. असे स्थानिकांनी आवर्जून सांगितलं. या दोघांच्या काय हालचाली असू शकतात? या प्रश्नाचे उत्तर देताना स्थानिक म्हणाले, ‘राणे’ गटातील एक सदस्य,फोडण्याची त्यांची दाट शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

एकनाथ कर्चे आणि राजेश कर्चे यांचा गट ‘राणे’ गटातील एक सदस्य फोडण्याची शक्यता असून,अशा चर्चा देखील गावात रंगू लागल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. स्थानिक पुढे म्हणाले, फक्त चर्चाच नाही तर, उपसरपंच आणि निवडणुकीत झालेला सगळा खर्च देण्याची ‘ऑफर’ या गटाने राणे गटातील एका सदस्याला दिल्याची चर्चा गावात रंगू लागली आहे. असं स्थानिकांनी सांगितलं. परंतु तो सदस्य त्यांच्यासोबत जाण्यासाठी अनुकूल नाही,असंही नागरिक सांगण्यास विसरले नाहीत.

तो सदस्य त्यांच्यासोबत जाण्यासाठी का अनुकूल नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना स्थानिक म्हणाले, राणे गट हा तत्त्वाशी एकनिष्ठ आहे‌. त्याचबरोबर हा गट,दिलेला शब्द पाळतो. अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. आणि म्हणून या गटातील सदस्यांचा योग्य तो सन्मान होईल. एवढंच नाही तर आज ना उद्या सदस्यांना पदाचा लाभ देखील मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून राणे गटातला सदस्य फुटणे खूप अवघड वाटत असल्याचंही स्थानिकांकडून सांगण्यात आलं.

एकनाथ कर्चे आणि राजेश कर्चे यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय गेला तर, या दोघांचा गट, विरोधकांच्या गटातला एक सदस्य फोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील,यात कसलीही शंका नसली तरी, त्यांच्यासाठी हे आव्हान सोप्प अजिबात नसणार असल्याचं देखील स्थानिकांनी शेवटी सांगितलं.

पिंपरी ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता येणार? हे पाहणे येणाऱ्या काळात खूप औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.