सरपंच निवडणूक; समस्त पिंपरीकरांचे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

सोलापूर जिल्ह्यातील 558 ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम आठ किंवा नऊ फेब्रुवारीला होणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्ट केल्यानंतर अनेकांनी सरपंच आणि उपसरपंच निवडीसाठी आपापल्या परीने कंबर कसण्यास सुरुवात केली.

माळशिरस तालुक्यामधील पिंपरी ग्रामपंचायतमध्ये देखील सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडीसाठी दोन्हीं गट आपापल्या परीने कंबर कसताना दिसून येत आहेत. अशातच एकनाथ कर्चे आणि राजेश कर्चे यांच्या गटातील दोन सदस्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यात आल्याने,पिंपरी ग्रामपंचायत निवडणूक आता खूपच रंजक वळणावर येऊन ठेपल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक चार मधून सर्वसाधारण महिला या जागेवर निवडणूक लढविणाऱ्या ताई सुभाष कर्चे,यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये एकूण पाच प्रतिवादी आहेत. या पाचही प्रतिवादींना अॅड. राहुल बी खोत यांच्यामार्फत दिनांक ०५.०२.२०२१ ला नोटीस पाठवण्यात आलेली आहे.

मुख्य राज्य सचिव,महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी,सोलापूर, तहसीलदार माळशिरस, ग्रामसेवक पिंपरी, आणि रुक्मिणी हनुमंत कर्चे अशा एकूण पाच जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी आपण पात्र नसूनही आपण ग्रामपंचायत निवडणूक लढवली आहे. त्यामुळे नऊ तारखेला होणाऱ्या सरपंच उपसरपंच निवडीमध्ये रुक्मिणी हनुमंत कर्चे यांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात येऊ नये. अशी याचिका दाखल केली असून,त्यासंबंधी प्रतिवादींना नोटीसही देण्यात आल्याचे समजतं‌.

अशीच परिस्थिती वार्ड क्रमांक दोन मध्ये देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्य राज्य सचिव,महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी,सोलापूर, तहसीलदार माळशिरस, ग्रामसेवक पिंपरी,आणि उमेदवार नाना यशवंत कर्चे,अशा एकूण पाच जणांविरोधात धर्मा काशिनाथ कर्चे यांनी,मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (धर्मा काशिनाथ कर्चे हे नाना यशवंत कर्चे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे पराभूत उमेदवार आहेत) ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी नाना यशवंत कर्चे हे पात्र नसूनही त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवल्याने सरपंच उपसरपंच निवडीसाठी त्यांचा मतदान करण्याचा अधिकार काढून घेण्यात यावा. अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली असून,त्यासंबंधी या पाचही प्रतिवादींना नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

सोमवारी आठ तारखेला या प्रकरणाची सुनावणी होणार असून, समस्त पिंपरीकरांचे या प्रकरणाच्या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. नाना यशवंत कर्चे आणि रुक्मिणी हनुमंत कर्चे या दोन्हीं ग्रामपंचायत सदस्यांचा, सरपंच उपसरपंच निवडीसाठी मतदान करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला तर,मारुती राणे गटाची निर्विवाद सत्ता पिंपरी ग्रामपंचायतीवर येणार असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

पिंपरी ग्रामपंचायतीवर कोण करणार सत्ता स्थापन? सत्तास्थापनेच्या ताज्या घडामोडी वाचण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लोकशाही या न्यूज पोर्टलला सब्स्क्राइब करा.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.