पिंपरी ग्रामपंचायतीवर येणार राष्ट्रवादीची सत्ता? दत्ता मामाच्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण

सोलापूर जिल्ह्यातील 558 ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम आठ किंवा नऊ फेब्रुवारीला होणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्ट केल्यानंतर अनेकांनी सरपंच आणि उपसरपंच निवडीसाठी आपापल्या परीने कंबर कसण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.

माळशिरस तालुक्यामधील पिंपरी ग्रामपंचायतमध्ये देखील सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडीसाठी दोन्हीं गट आपापल्या परीने कंबर कसताना दिसून येत आहेत. निकाल लागल्यानंतर दोन दिवसांनी माळशिरस तालुक्याचे भाजपचे आमदार राम सातपुते यांनी पिंपरी गावाला भेट देऊन नूतन सदस्यांचा सत्कार केला होता. त्याच बरोबर नवीन विकास कामासंदर्भात चर्चा करत येणार्‍या काळात विकास कामे मार्गी लावू असे आश्वासनही दिले होते. आमदार राम सातपुते यांनी पिंपरी गावाला दिलेल्या भेटीमुळे ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता येणार आहे,हे जवळपास स्पष्ट झाले होते. मात्र पिंपरी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक चार आणि दोनचे पॅनल प्रमुख एकनाथ रायबा कर्चे,राजेश उमाजी कर्चे या दोघांनी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांची भेट घेतल्याने पिंपरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची तर सत्ता येणार नाही ना? असा प्रश्न सामान्यांच्या मनात येऊ लागला आहे.

पिंपरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आली तर भाजपचे आमदार राम सातपुते यांचा हा खूप मोठा अपमान असेल असं गावातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी म्हटलं आहे. त्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच आमदार सातपुते यांनी गावात येऊन नूतन सदस्यांचे अभिनंदन करत गावातील रखडलेली अनेक विकासकामे मार्गी लावूयात,असं म्हटलं होतं. एकनाथ कर्चे आणि राजेश कर्चे यांच्याच गटात भाजपचे दोन कट्टर कार्यकर्ते आहेत. आणि म्हणूनच एकनाथ कर्चे,राजेश कर्चे आणि दत्तामामा भरणे यांच्यामध्ये झालेल्या भेटीला खूप महत्त्व असल्याचं बोललं जातंय.

नूतन सदस्या संगीता हनुमान शिंदे या भाजपा महिला तालुका अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर हनुमंत श्रीरंग कर्चे हे भाजपचे सांगोला तालुका विस्तारक आहेत. त्यांच्या पत्नी रुक्मिणी हनुमंत कर्चे यांची ग्रामपंचायत सदस्या म्हणून निवड झाली आहे. हे दोन्ही कार्यकर्ते भाजपाचे खूप जुने आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. या दोघांच्याही पॅनल प्रमुखांची आणि पालकमंत्र्यांची सत्ता स्थापनेविषयीच भेट झाली असेल तर,भाजपचे हे दोन्ही कट्टर कार्यकर्ते राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार का? की राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर हे दोन्हीं भाजपचे कट्टर कार्यकर्ते नाचणार? हा मोठा प्रश्न गावातील भाजपच्या अनेक कट्टर कार्यकर्त्यांना पडला असल्याचं दिसून येतंय.

पिंपरी ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता येणार? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागला आहे. राम सातपुते आणि दत्तामामा भरणे या दोघांमुळे पिंपरी ग्रामपंचायत सरपंच निवडणूक खूपच प्रतिष्ठेची बनली असून पिंपरी ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता येणार? हे पाहणे खूप औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.