आता डोक फोडून घ्यायचं का?; … भरसभेत अजित पवार संतापले 

करोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे,  परंतु तरी धोका टळलेला नाही. जगामध्ये आणि देशातील विविध राज्यांमध्ये करोनाचा प्रसार टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहे. महाराष्ट्र सरकारकडूनही जनजीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.  त्याचबरोबर शासनाकडून  करोनाच्या  धोक्याबाबत काळजी घेतली जात आहे. मात्र, तरीदेखील अनेक ठिकाणी नागरिक नियम मोडत  असल्याचं दिसत आहे. याच अनुषंगाने  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर येथे  झालेल्या एका सभेत करोनाचा विसर पडलेल्यांना सुनावले.

उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार शनिवारी अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. वांबोरी तालुका राहुरी   येथे अजित पवार यांच्या हस्ते मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलत असताना अजित पवारांनी करोनाचा विसर पडलेल्या व नियमांची पायमल्ली करणाऱ्या नागरिकांची खरडपट्टी काढली.

या कार्यक्रमाला  अनेक नागरिक मास्क न लावता आले होते. तसेच अनेक लोक कार्यक्रमाच्या ठिकाणी विनामास्क फिरत होते. ही गोष्ट  लक्षात आल्यानंतर अजित पवार यांनी भाषण करताना करोनाची आठवण करून देत सुनावलं. व्यासपीठावरून बोलत असताना मास्क घातलेल्या नागरिकांकडे  निर्देश करत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. “हे बघा पठ्ठे विनामास्क लावता आले आहेत. इकडे तिकडे फिरत आहेत. आता यांच्यापुढे काय डोक फोडून घ्यायचं का?, असं म्हणत अजित पवारांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांबद्दल नाराजी व्यक्त केली. ब्रिटनमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आव्हान  उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांनी यावेळी केलं.

लॉकडाउन आणि आर्थिक विकासदर या दोन  मुद्द्यांवरून अजित पवार यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं. “करोनाच्या काळामध्ये सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे येणं कमी झालं.  केंद्राकडून राज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी रुपये येणं बाकी आहे.परंतु तरीदेखील राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीत उपलब्ध असलेल्या पैशांतून कामं सुरू ठेवली आहेत,” असं अजित पवार म्हणाले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.