डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस का दिला राजीनामा?

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील  राष्ट्रवादीला रामराम ठोकून काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. भविष्यात माळशिरस तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोहिते पाटील यांना आपल्या तंबूत सामील करून घेण्यासाठी काँग्रेसने हात पुढे केले आहेत.  धवलसिंह मोहिते पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशासाठी स्वतः बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.

महविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस यांनी एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते न फोडण्याचे वचन दिले असले तरी ते काही पाळले जात नाही.  त्यामुळेच काँग्रेसने सुध्दा धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या तगड्या नेत्याला आपल्या सोबत घेण्याचा निर्णय घेतला.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत असणारे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला चांगलीच साथ दिली होती.  त्यांनी स्वतः  आपल्याला विधानपरिषदेवर घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्यांना संधी मिळाली नाही. त्यांच्या मागणीला न्याय मिळाला नाही परंतु पक्ष संघटनेमध्ये सुध्दा त्यांना कुठेही स्थान देण्यात आले नाही. 

विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व त्यावेळी राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. उत्तम जानकर यांना विधानसभा निवडणुकीमध्ये धवलसिंह मोहिते पाटील यांनी मोलाची साथ दिली होती. त्यामुळे जानकर यांनी विजयसिंह मोहिते पाटील गटाला चांगलीच टक्कर दिली होती.

याबाबत राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांना विचारले असता ते म्हणाले काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेण्याआधी धवलसिंह मोहिते पाटील यांनी माझ्याशी व संजयमामा शिंदे यांच्याशी चर्चा केली होती.  काँग्रेस पक्षामध्ये त्यांना योग्य संधी मिळू शकते. योग्य तो सन्मान त्यांना तिथे मिळेल. त्यामुळेच ते काँग्रेस मध्ये गेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांना याबाबत अधिक विचारले असता ते म्हणाले,  धवल सिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये काम करावे अशी माझी इच्छा होती परंतु पक्षाने त्यांना काम करण्याची संधी दिली नाही. जर पक्षाने त्यांना संधी दिली असती तर त्यांनी त्या संधीचे सोने केले असते. धवलसिंह मोहिते पाटील  यांच्यात काम करण्याची धमक आहे.

आमदार संजय मामा शिंदे यांना विचारले असता त्यांनी मात्र सावध पवित्रा घेतला ते म्हणाले कोणी कुठल्या पक्षात जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांचा व माझा वाद नव्हता. याबाबत धवल सिंह मोहिते पाटील यांना विचारले तर बरं होईल असे सांजयमामा शिंदे म्हणाले.
 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.