शिवसेनेऐवजी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला असता तर…” : शिवसेना मंत्री
अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून २०१९मध्ये शिवसेना पक्षात पक्षांतर केले. अब्दुल सत्तार हे नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत येत असतात. २०१९च्या अखेरीस शिवसेना,राष्ट्रवादी, व काँग्रेस या पक्षांनी काही तडजोडी करत एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अब्दुल सत्तार यांना महसूल राज्यमंत्रीपद दिले गेले.
या मंत्रिपदावर सत्तार हे खुश नसल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. परंतु त्यानंतर त्यांची शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी भेट झाली. त्या दोघांमध्ये काय समझोता झाला आणि सत्त्तार यांनी शिवसेनेसोबतच वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. याच मुद्द्यावर बोलताना अब्दुल सत्तार यांनी महत्त्वपूर्ण विधान केले.
2019 मध्ये अब्दुल सत्तार हे काँग्रेस पक्षाला राजीनामा देऊन इतर पक्षात जाण्याच्या तयारीत होते. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला त्यावेळी सत्तार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सर्वत्र बोलले जात होते. परंतु त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला. याबाबत बोलत असताना सत्तार म्हणाले, जर मी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला असता तर ती माझी राजकीय आत्महत्याच ठरली असती, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
“मी भाजपामध्ये प्रवेश केला असता, तर माझी राजकीय कारकिर्द संपुष्टात आली असती. मी शिवसेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय योग्यच होता. भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो असतो तर ती माझी राजकीय आत्महत्या ठरली असती. राजकारण करत असताना काही वेळा निर्णय चुकत असतात. माझा देखील तो निर्णय चुकला असता, तर कदाचित माझी कारकिर्द संपली असती”, असे वक्तव्य राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
याअगोदर अब्दुल सत्तार हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केल्यामुळे चर्चेत आले होते. कोल्हापूर मधून मी पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार आहे. जर मी पराभूत झालो तर मी राजकारण सोडून देईल व हिमालयात जाईन, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते .
त्यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले “चंद्रकांतदादा हिमालयात गेल्यास आम्ही तिकडे त्यांची व्यवस्था करू. मोदी साहेबांना हिमालयाची खूप माहिती आहे. त्यामुळे आता चंद्रकांतदादांनी खरंच हिमालयात जायला हवे”, असा टोला चंद्रकांत पाटील यांना सत्तार यांनी लावला.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.