ED आणि CBI या दोन स्वायत्त संस्थांना संजय राऊत यांनी कुत्र्याची उपमा का दिली? काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर!
अंमलबजावणी संचालनालय(ED) आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो(CBI) या दोन स्वायत्त संस्था असल्या तरी, गेल्या काही काळापासून या केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात,असा आरोप सातत्याने होताना पाहायला मिळतोय. खास करुन ज्या राज्यात बीजेपीची सत्ता नाही,अशा राज्यांमधील विरोधकांवर अशा कारवाया झाल्याचेही सातत्याने पाहायला मिळत असल्याने,केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर या स्वायत्त संस्था
काम करतात. अशी शंका घेण्यास नक्कीच वाव आहे. असंही विरोधकांकडून बोललं जातंय.ज्ञ
महाराष्ट्राच्या २०१९ विधानसभा निवडणूक काळात देखील शरद पवार यांच्यावरील झालेल्या ED च्या कारवाईमुळे त्यांना खूप मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आली असल्याचं त्यावेळी म्हटलं गेलं. शिखर बँक प्रकरणात शरद पवार यांचा काहीही संबंध नसताना, या प्रकरणात शरद पवारांची चौकशी होणे म्हणजे निव्वळ सूडबुद्धी आहे. असा आरोप केंद्र सरकार राज्य सरकार यांच्यावर विरोधकांनी केला होता. पवारांना मिळणारा प्रतिसाद पाहून EDने भविष्यात देखील शरद पवार यांच्या चौकशीची गरज पडणार नाही,असा यू-टर्न त्यावेळी घेतला होता.
शरद पवारांच्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात EDची एंट्री झाली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी मंगळवारी EDने छापा टाकला. या कारवाईनंतर महाविकास आघाडी नेत्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ही सत्ताधाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करून,महाराष्ट्रमध्ये येणाऱ्या काळात सत्ता बदल करण्यासाठीची आहे. अशी टीका करण्यात आली.
महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे,आणि शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी ED आणि CBI या दोन स्वायत्त संस्थांना थेट कुत्र्याची उपमा देत या प्रकारात उडी घेतली आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्यंगचित्र पोस्ट केलं आहे. यामध्ये एका कुत्र्याच्या वरती सीबीआय तर दुसऱ्या कुत्र्याच्यावर ईडी असं लिहिलं आहे. आणि पुढे महाराष्ट्राचं स्टेशन दाखवलं आहे. या व्यंगचित्रात एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याला म्हणतो,’थांब! कोणाच्या घरी जायचे अजून ठरलेलं नाही’ असं दाखवण्यात आलेलं आहे. संजय राऊत यांच्या या ट्वीटची खूपच चर्चा झाली असून येणाऱ्या काळात हे प्रकरण आता तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संजय राऊत हे फक्त ट्विटवरच राहिले नाही तर, माध्यमांनी या ट्वीटविषयी विचारले असता, त्यांनी स्पष्टीकरणही दिले. संजय राऊत म्हणाले, जर कोणी दबावतंत्राचा वापर करत असेल, एखाद्याला पैशाने विकत घेत असेल, एखाद्याचा स्वाभीमान पैशाने विकत घेत असेल, तर ते ईस्ट इंडिया कंपनी करत होती. ये पब्लिक है सब जानती है! असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी विरोधकांना लगावला. जर कोणी अशा प्रकारचे राजकारण करत असेल तर त्यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात स्वागतच आहे असा खोचक टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये येणार आहेत. याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले,ते देशाचे पंतप्रधान आहेत. आमचे त्यांच्यावर प्रेम आहे. आम्ही त्यांचा आदर करतो,असंही ते म्हणायला विसरले नाहीत.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम