मोहिते-पाटलांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा शिरकाव?

0

मोहिते-पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांची राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत वर्णी लागण्याची शक्यता आहे.

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून शिफारस करण्यात येणार असून यामध्ये मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे उत्तमराव जानकर यांचेही नाव येण्याची शक्यता आहे.

माळशिरस तालुका हा मोहिते-पाटलांचा बालेकिल्ला समजला जातो. मोहिते-पाटील यांनी बीजेपीत प्रवेश केल्यामुळे उत्तमराव जानकर यांच्यापुढे मोठा राजकीय पेच निर्माण झाला होता. त्यात भाजपकडून विधानसभेची उमेदवारी आपल्याला मिळणार नाही असं जाणवल्यावर उत्तमराव जानकर यांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश करून मोहिते-पाटील यांना तालुक्यात पुन्हा आव्हान दिले. लोकसभेत मोहिते-पाटील यांची हवा स्पष्ट दिसली. विधानसभेतही मोहिते-पाटील सहज बाजी मारतील असं चित्र होतं. मात्र उत्तमराव जानकर यांनी नवख्या राम सातपुते त्यांना कडवी झुंज दिली. माळशिरस तालुका मोहिते-पाटलांचा बालेकिल्ला असूनही राम सातपुते हे अवघ्या 2702 मतांनी विजय झाले.

माळशिरस तालुका मोहिते-पाटील यांचा बालेकिल्ला असला तरी उत्तमराव जानकर यांनी दिलेली कडवी झुंज पाहता मोहिते-पाटलांसमोर माळशिरसमध्ये उत्तमराव जानकर हे येणाऱ्या काळात खूप प्रभावी ठरतील. आणि तालुक्याचे नेतृत्व म्हणून ते पुढे येतील. असा विश्वास राष्ट्रवादीला देखील वाटला असेल. आणि म्हणूनच राष्ट्रवादी राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेसाठी उत्तमराव जानकर यांच्या नावाचा विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोहिते-पाटील हे अनेक काळ राष्ट्रवादीबरोबर राहिले असले तरी पवार साहेबांचे आणि त्यांचे संबंध फारसे चांगले नव्हतेच. परंतु तालुक्यात मोहिते-पाटील यांना दुसरा पर्याय नव्हता. आपल्याला कोणी विरोध होऊ नये याची खबरदारी ही त्याकाळी मोहिते पाटलांनी पुरेपूर घेतली. पंढरपूर मधून मोहिते-पाटलांचा पराभव झाल्यानंतर मोहिते-पाटलांची ताकद हळूहळू कमी होत गेली. आणि त्यांना तालुक्यात पर्यायही तयार होऊ लागले.

मोहिते-पाटील यांच्या विरोधात उत्तमराव जानकर हा भक्कम पर्याय राष्ट्रवादीला आता मिळाला आहे. तालुक्यात धनगर समाजाची संख्या जास्त असल्यामुळे आणि उत्तमराव जानकर हे धनगर समाजाचे असल्यामुळे उत्तमराव जानकर यांचे तालुक्यात वजन राहणार. हे राष्ट्रवादीने आता चांगलं ओळखलं आहे. आणि म्हणूनच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत त्यांच्या नावाचा विचार केला जात आहे.

उत्तमराव जानकर यांना जर राज्यपालांच्या कोट्यातून राष्ट्रवादीची विधान परिषदेची आमदारकी मिळाली तर, माळशिरस तालुक्याला तब्बल तीन आमदार मिळतील. माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी आपली ताकद वाढवण्याची कोणतीही संधी सोडणार नाही. कारण लोकसभेचं देखील निर्णायक मतदान या तालुक्यामधूनच होतं. येणाऱ्या काळात माळशिरस तालुक्याचे राजकारण हे खूप चर्चित राहणार आहे एवढं नक्की!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.