या तारखेला खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार?
गेले अनेक दिवस चर्चेत असणारा विषय म्हणजे एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी मधील प्रवेश. खडसे काही दिवसापूर्वी मुंबईला चार ते पाच दिवसांसाठी गेले होते. ते मुक्ताईनगर ला पुन्हा आल्यानंतर त्यांना विचारलेल्या प्रश्नाला खडसे यांनी उत्तर देण्यास नकार दिला होता. गेले अनेक दिवस देवेंद्र फडणवीस व एकनाथ खडसे यांच्यामधील शीतयुद्ध विकोपाला गेले होते. एकनाथ खडसे यांचा असा आरोप होता की त्यांचं मंत्रीपद व पक्ष कार्यकारणी मधून बाजूला ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत.
एकेकाळी भाजपचा महाराष्ट्रातला महत्त्वाचा चेहरा व भाजपची सूत्रे सांभाळणारे व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथ खडसे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्या पक्षाला उभारी देण्यासाठी खडसे यांनी इतके वर्ष संघर्ष केला, त्याच पक्षात खडसे यांची गळचेपी होऊ लागली. त्याच पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस खडसे हे भाजपाला रामराम ठोकण्याच्या तयारीत होते. काल झालेल्या एका रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस जळगावला आले असताना एकनाथ खडसे मात्र या कार्यक्रमाला गैरहजर होते. त्याच वेळी त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत निश्चीतता दिसून आली होती. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा खडसे योग्य निर्णय घेतील असे सूचक विधान केले होते.
आज एकनाथ खडसे यांचे समर्थक उदयसिंग पाडवी यांनी खडसे हे 17 तारखेला घटस्थापना दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे विधान केले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले मी नाथाभाऊ यांना भेटण्यासाठी मुक्ताईनगर ला गेलो होतो, तेव्हा त्यांना विचारले मुंबईवरून आनंदाची बातमी आणलीत का? तेव्हां नाथा भाऊंनी पवार साहेबांसोबत पॉझिटिव्ह चर्चा झाल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाऊ आपले स्वागत आहे असे स्टेटस टाकायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत तर भाजपाने महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचा चेहरा गमावला असेल. आता पुढे काय घडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम