हार्दिक पांड्याची गरज नाही, त्याच्या जागेवर ‘वेंकटेश अय्यर’ चांगला विकल्प; आणखी काय म्हणाला रोहित, ऐका
काल कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर झालेल्या पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताने वेस्ट इंडीज संघाचा सहा गडी राखून पराभव केला. अणि तीन सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली. लेगस्पिनर रवी बिष्णोईची कामगिरी या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. पदार्पणातच रवी बिष्णोईने कमाल केली. आपल्या चार षटकात अवघ्या सतरा धावा देत, त्याने दोन गड्यांना बाद केले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.
‘टॉस’ जिंकून कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलदाजांनी देखील रोहितचा हा निर्णय सार्थ ठरवत वेस्ट इंडिज संघाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. रवी बिश्नोईच्या तिखट माऱ्यापुढे वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजांना सामनाही करता आला नाही. रवि बिश्नोईला भारताच्या इतर गोलंदाजांनी देखील चांगली साथ दिली. वेस्ट इंडिज संघाला फलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर २० षटकात अवघ्या १५७ धावा करता आल्या.
१५८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघाला रोहीत शर्माने चांगली सुरुवात करून दिली. रोहितने दोनशेहून अधिक स्ट्राइकरेटने ४० धावांची वादळी खेळी केली. मात्र रोहीत बाद झाल्यानंतर ठरावीक अंतराने गडी बाद होत गेल्याने, भारताचा आता पराभव होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर या दोघांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. आणि भारताला विजय मिळवून दिला.
या दोघांनी पाचव्या विकेटसाठी २६ चेंडूत नाबाद ४८ धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला. सूर्यकुमार यादवने जवळपास दोनशेच्या स्ट्राइकरेटने १८ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. त्याला वेंकटेश अय्यरने देखील उत्तम साथ दिली. वेंकटेश अय्यरने १३ चेंडूत नाबाद २४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. विजयासाठी दोन धावांची आवश्यता असताना आय्यरने उत्तुंग षटकार लगावत भारताला विजय मिळवून दिला .
वेंकटेश अय्यरने केलेल्या या खेळीचे अनेकांकडून कौतुक होताना पाहायला मिळत असून, तो हार्दिक पांड्याला उत्तम पर्याय असल्याच्याही चर्चा आता रंगू लागल्या आहेत. गेल्या जवळपास दोन वर्षापासून हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नसल्याने, त्याच्या जागी आता भारताला अष्टपैलू खेळाडूची गरज आहे. अणि तो पर्याय आता वेंकटेश अय्यरच्या रुपात भारताला मिळाला असल्याचं, अनेकांकडून सोशल मीडियावर बोललं जात आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम