तळेगाव ढमढेरेची पोरं हुशार; राज्यस्तरीय शिष्यवृत्तीत पहिल्या दहामध्ये नऊ विद्यार्थी,संभाजी भुजबळ पतसंस्थेतर्फे विद्यार्थ्यांचा सन्मान

0

तळेगाव ढमढेरे – महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा (दि.३) रोजी सावतामाळी मंगल कार्यालयामध्ये पार पडला. २०२१ च्या राज्य शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पहिल्या दहामधील ९ विद्यार्थी हे तळेगावातील असल्यामुळे संभाजी भुजबळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ह.भ.प दादाभाऊ (महाराज) भुजबळ यांनी प्रास्ताविक सादर करताना संस्थेच्या वाटचालीचा आतापर्यंतचा प्रवास सांगितला. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तनिष्का गायकवाड,निर्मयी गोसावी आणि कृष्णाली गडाख या विद्यार्थिनींनी राज्यात अनुक्रमे पहिला,दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. संस्थेच्या वतीने या तीनही विद्याथिनिंसह परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकूण १६ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राजाराम शिंदे हे होते. कोरोनाकाळातही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. यामध्ये सीमा गवारी, सुनीता जाधव आणि जयश्री विश्वास या शिक्षिकेंचा समावेश होता. सन्मान प्राप्त विद्यार्थिनींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना कोरोनाकाळातही मेहनत घेणाऱ्या आपल्या गुरुजनांचे आभार मानले.

संस्थेचे मार्गदर्शक अरुण भुजबळ यांनी यानिमित्ताने संभाजी आण्णा भुजबळ यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. रमेश भुजबळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मुसळे सर, गायकवाड सर यांच्यासह जयसिंगराव ढमढेरे प्रशालेतील शिक्षक, संभाजी भुजबळ पतसंस्थेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.