अमोल कोल्हेंची हकालपट्टी; ‘नथूराम गोडसे’मुळे राष्ट्रवादीत फूट

0

छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारल्यामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोचणारे शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे (amol kohle) आता चांगलेच अडचणीत आले आहेत. Why I killed Gandhi या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेेची (Nathuram godse) भूमिका साकारल्याने सोशल मीडिया तसेच राष्ट्रवादी पक्षातल्या देखील काही नेते मंडळींकडून खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे.

नथूराम गोडसे याचं उदात्तीकरण दाखवणरा हा चित्रपट 30 जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारणारे खासदार अमोल कोल्हे हे देखील या चित्रपटाबरोबर स्वतःही चांगलेच अडचणीत आले आहेत. मी खासदार होण्याच्या अगोदर 2017 ला या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असल्याचं, अमोल कोल्हे यांच्या कडून सांगण्यात आलं असलं तरी, लोकप्रतिनिधी म्हणून या चित्रपटातील गोडसेंच्या भूमिकेचे समर्थन केलं जाऊ शकत नसल्याचं बोललं जात आहे.

अमोल कोल्हे यांनी 2019 लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. शिवसेनेने डच्चू दिल्यानंतर अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे तिकीट राष्ट्रवादीकडून मिळवत शिवसेनेच्याच आढळराव (adhalraopatil) पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले. लोकसभा निवडणूक लढण्यापूर्वी अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आणि महाराष्ट्राच्या घराघरात पोहचत कमालीची लोकप्रियताही मिळवली.

छत्रपती संभाजी महाराज साकारल्यानंतर अमोल कोल्हे यांना कमालीची लोकप्रियता मिळाली, आणि त्याच्याच जोरावर राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिरूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडूनही आले. असा आरोप अमोल कोल्हे यांच्यावर सातत्याने होत आला आहे. जर अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून खासदार होऊ शकतात, तर नथुराम गोडसे साकारून त्याचे समाजावर नक्कीच परिणाम पडणार असल्याचं देखील बोललं जात आहे.

एकीकडे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीकडून(ncp) अमोल कोल्हे यांचं समर्थन केलं गेलं असलं तरी, दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीत या प्रकरणामुळे नाराजी पसरल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांनी साकारलेली भूमिका ही अभिनेता म्हणून साकारलेली आहे. 2017 मध्ये आमच्या पक्षात नव्हते त्यापूर्वी ते अभिनेता म्हणून काम करत होते. त्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता असं शरद पवार म्हणाले आहेत.

एकीकडे शरद पवार यांनी अमोल कोल्हेंचं समर्थन केलं असलं तरी, दुसरीकडे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एखाद्या पात्राची भूमिका साकारत असताना त्या पात्राचे विचार आत्मसात करावे लागतात, कोल्हे यांनी साकारलेल्या भूमिकेत नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण होत असल्याचं जाणवतं, त्यामुळे कोल्हे यांनी अभिनेता म्हणून जरी व्यक्तिरेखा साकारली असली तरी, त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. अशी जहरी टीका आव्हाड यांनी केली आहे.

शरद पवार आणि आव्हाड यांनी मांडलेल्या वेगवेगळ्या विचारांमुळे आता राष्ट्रवादीत फूट पडली, असल्याचं सोशल मीडियावर बोललं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचे कदापिही समर्थन केलं जाऊ शकत नसल्याचा मोठा वर्ग राष्ट्रवादीत देखील पाहायला मिळत आहे. अशा चर्चा आता सोशल मीडियावर देखील रंगताना पहायला मिळत आहेत. त्याचबरोबर शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचं समर्थन केलं असल्यामुळे, पवारांवर देखील मोठ्या प्रमाणात टिकेची झोड सोशल मीडियातून उठल्याचे दिसून येत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.