भावाला मतदान करायला आलेल्या माय-लेकरांवर काळाचा घाला; स्थानिक तरुणांनी २०० फुट दरीतून बाहेर काढले मृतदेह

चालकाचा ताबा सुटल्याने झाला भीषण अपघात

0

नोकरीनिमित्त आपल्या कुटुंबासह नाशिकला वास्तव्यास असणाऱ्या आणि भावाला मतदान करण्यासाठी माण तालुक्यातील थदाळे या गावी आलेल्या गजानन सर्जेराव वावरे आणि त्यांची आई या दोघांचा नातेपुते शिंगणापूर रोड घाटातील एका दरीत गाडी कोसळून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे. शर्तीचे प्रयत्न करून माळशिरस तालुक्यातील पिंपरी गावामधील तरुणांनी या दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.

माणसाचे आयुष्य किती क्षणभंगुर आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. गजानन सर्जेराव वावरे आणि त्यांची आई हे दोघे यशवंत वावरे, यांना मतदान करण्यासाठी नाशिकहून आले होते. थदाळे गावच्या सोसायटी निवडणुकीत त्यांचे चुलत भाऊ यशवंत वावरे, यांनी निवडणूक अर्ज भरला होता. सोसायटीचे सभासद असल्याने मतदान करण्यासाठी माय-लेकरं ‘थदाळे’ला काल मुक्कामी आले होते. रात्री मुक्काम करून दोघेही नाशिकलाकडे निघाले.

गजानन सर्जेराव वावरे हे आपल्या कुटुंबासह नाशिकमध्ये स्थायिक झालेले आहेत. वर्षातून एकदाच दिवाळीला ते आपल्या मूळ गावी येतात. मात्र यावेळी सोसायटी निवडणुका लागल्या असल्याने मतदान करण्यासाठी ते आपल्या गावी आले. आपला चुलत भाव निवडणूक लढवत असल्याने न बोलताही आपल्या आईसह मतदान करण्यासाठी काल थदाळे गावात पोहोचले. सर्व भावंडांनी मिळून एकत्र रात्री जेवण केले. रात्री मुक्काम करून सकाळी साधारण नऊ वाजता ते नाशिककडे रवाना झालते, अशी माहिती गजानन सर्जेराव वावरे यांचे चुलत भाऊ ‘छगन वावरे’ यांनी दिली.

शिंगणापूर नातेपुते रोड वरून जात असताना शिंगणापूर घाटातील एका दरीत गाडी कोसळून हा दुर्दैवी उपघात झाला आहे. साधारण २०० फुट लांब दरीत गाडी कोसळल्याने गाडीचा अक्षरशः चुरा झाला होता. गाडीतून मृतदेह बाहेर काढून ‘दोनशेफूट’ वरती मृतदेह आणणं ही मोठी कसरत होती. मात्र स्थानिकांनी हाताची साखळी करत मोठ्या कसरतीने दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवलं.

‘आबा शिंगाडे’ हे या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी होते, अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली आहे. मी शिंगणापूरला जात असताना एक व्यक्ती शिंगणापूर घाट उतरून खाली येत होता. तो प्रचंड घाबरला होता, तो मला म्हणाला, लवकर चला, दरीत अपघात झाला आहे. चार चाकी गाडी हवेत उडून दरीत कोसळली आहे. आम्ही दोघेही लगेच घटनास्थळी पोहोचलो. दरीत खाली उतरत असताना अपघात झालेल्या व्यक्तीचा, वाचवा वाचवा असा आवाज ऐकू येत होता. मात्र आम्हाला खाली जाईस्तोवर त्याचा मृत्यू झाला, अशी माहीती शिंगाडे यांनी दिली.

गजानन सर्जेराव वावरे यांची टाटा टिगोर MH 15GL9040 कार ज्या दरीमध्ये कोसळली त्या दरीत अनेक अपघात झाल्याची माहिती मिळतेय. या दरीत अनेक फोर व्हिलर गाड्या, यापूर्वी कोसळल्या असल्याची माहिती स्थानिकांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना दिली. रस्त्याच्या कडेला पन्नास-साठ फूट जो सपाट भाग आहे, या भागाच्या कडेला येऊन नागरिक, तसेच पर्यटक डोंगर दरी पाहण्याचा आनंद घेतात.

मात्र या भागाच्या कडेला संरक्षण भिंत नसल्याने कधीकधी चालकाचा ताबा सुटून कार थेट दरीत कोसळल्याच्या वारंवार दूर्दैवी घटना घडत असल्याचे स्थानिक सांगतात. अनेक दुर्दैवी घटना घडून देखील, संबंधित प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नसून, वारंवार तक्रार करून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना व्यक्त केली.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.