अवघ्या ३३ लाखासाठी ‘गड्यानं’ आरोग्य विभागाचा पेपर फोडल्याचं उघड; टोपेंचं मंत्रीपद जाणार हे निश्चित

0

गेल्या काही महिन्यांपासून ‘आरोग्य विभाग’ परीक्षेचा गोंधळ सुरु असून अद्यापही तो सुटताना दिसत नाही. ‘न्यासा’ कंपनी घेत असलेल्या या परीक्षेवर परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आक्षेप घेत असताना देखील, आरोग्य विभाग याकडे का दुर्लक्ष करत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील जवळपास सहा हजाराहून अधिक जागांसाठी २४ आणि ३१ आक्टोंबरला झालेला आरोग्य भरती परीक्षेचा पेपरच फुटल्याचे पुणे सायबर पोलीसांच्या तपासात सिद्ध झालं आहे. मात्र धक्कादायक प्रकार म्हणजे, या प्रकरणाशी राजेश टोपे(Rajesh tope) यांचा संबंध असल्याने राजकारण चांगलेच तापले आहे.

आरोग्य भरती परीक्षा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. सुरुवातीला २५ आणि २६ सप्टेंबरला आरोग्य भरती परीक्षेची तारीख जाहीर झाली होती. विद्यार्थ्यांनी परीक्षेची जोरदार तयारी देखील केली. मात्र अचानक आरोग्य भरती विभागाने २६ सप्टेंबरला होणारी आरोग्य भरती परीक्षा रद्द होणार असल्याचं, २५ तारखेच्या रात्रीच जाहीर केल्याचा अजब प्रकार देखील विद्यार्थ्यांसह राज्याला पाहिला मिळाला. चारशे-चारशे किलोमीटरचं अंतर विद्यार्थी पार करून परीक्षा केंद्रावर आदल्या दिवशी पोहचले होते. कोरोनाच्या काळात अनेक विद्यार्थ्यांनी उसने पैसे घेऊन, आरोग्य विभागाची परीक्षा देण्यासाठी आटापिटा केला. मात्र अचानक आरोग्य विभागाने २५ तारखेच्या रात्री २६ तारखेला होणारी परीक्षा रद्द केल्याचा गलथान कारभार आपण सर्वांनीच पाहिला.

आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षांच्या नवीन तारखा आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आल्या. २४ आणि ३१ ऑक्टोंबर रोजी आरोग्य विभागाची परीक्षा होणार असल्याचं विभागाने जाहीर केल्यानंतर यामध्ये देखील अनेक त्रुटी विद्यार्थ्यांनी समोर आणल्याचे पुन्हा पाहायला मिळाले. एकाच विद्यार्थ्याला दोन वेगवेगळी परीक्षा केंद्रे मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. एवढंच नाहीतर क्लर्क या पदासाठी फॉर्म भरलेल्या एका विद्यार्थिनीला नर्सचा पेपर आल्याचा देखील अजब प्रकार समोर आला होता.

सुरुवातीला ज्यावेळी आरोग्य विभागाने २५आणि २६ सप्टेंबरला आयोजित केलेली परीक्षा अनेक गोंधळामुळे रद्द झाली. त्यावेळी राजेश टोपे यांनी या परीक्षेचं सगळं खापर ‘न्यासा’ नावाच्या कंपनीवर फोडले. मात्र त्यानंतर २४ आणि ३१ ऑक्टोबरला आरोग्य विभागाची परीक्षा झाली त्या परीक्षा देखील ‘न्यासा’ कंपनीनेच घेतल्याने राजेश टोपे यांच्यावर अनेकांकडून सडकून टीकाही झाली. आता तर आरोग्य विभागाचा पेपरचा फुटल्याचे पुणे पोलिसांच्या अहवालात स्पष्ट झाल्याने, राजेश टोपे यांच्या राजीनाम्याचीही मागणी सुरू झाली आहे.

३१ आक्टोंबरला गट ‘ड’ विभागाचा झालेला पेपर फुटला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. दुपारी दोन वाजता झालेल्या पेपरच्या दिवशी सकाळी दहा वाजता सोशल मीडियावर या पेपरची प्रश्नपत्रिका उत्तरासहित व्हायरल झाली होती. दुपारी दोन वाजता झालेल्या पेपरमध्ये व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका जशीच्या-तशी विद्यार्थ्यांना मिळाल्याचा आरोप, परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेतील जवळपास ९२ प्रश्न विद्यार्थ्यांना मिळाल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं होतं.

३१ ऑक्टोबरला आरोग्य विभागाचा पेपर फुटला, याच्यापेक्षा ही धक्कादायक बाब म्हणजे, हा पेपर फोडण्यात आरोग्य विभागाचाच हात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर पुणे सायबर पोलिसांनी समोर आणला. विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाचा हा पेपर फुटला असल्याचा आरोप केल्याने प्रशासकीय अधिकारी ‘स्मिता कारेगावकर’ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार केली. आणि या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.

कसा फुटला पेपर?

आरोग्य विभागाचा पेपर फोडण्यात जो सुत्रधार होता त्याचं नाव ‘महेश बोटले’ आहे. महेश बोटले हे आरोग्य विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी आहेत. आरोग्य विभागाचे मुंबईचे ‘सहसंचालक’पदी ते कार्यरत आहेत. पेपर सेट करणाऱ्या समितीत महेश बोटले हे सदस्य होते. १९ सप्टेंबरला ज्या कम्प्युटरमध्ये आरोग्य विभागाचा पेपर सेट करण्यात आला, त्या कॅम्पुटरमधून महेश बोटले या बहाद्दराने आरोग्य विभागाचा पेपर आपल्या पर्सनल कॅम्पुटरमध्ये सेव करून घेतला.

महेश बोटले यांचं नाव कसं समोर आलं?

लातूरचे आरोग्य विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ‘प्रशांत बडगिरे’ यांनी पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात महेश बोटले यांचं नाव घेतलं आहे. आता तुम्ही म्हणाल प्रशांत बडगिरे यांचा या प्रकरणाशी काही संबंध? तर प्रशांत बडगिरे यांनी महेश बोटले यांच्याकडून आरोग्य विभागाचा पेपर मागवला. महेश बोटले यांच्याकडून हा पेपर ‘पेनड्राइव’च्या माध्यमातून प्रशांत बडगिरे यांना देण्यात आला.

पुढे प्रशांत बडगिरे यांनी आरोग्य विभागाचा हा पेपर आरोग्य विभागाचे कर्मचारी, तसेच संबंधित अनेकांना, नातेवाईकांना विकण्याचं काम केलं. यातून प्रशांत बडगिरे यांनी जवळपास ३३ लाख रुपये कमवल्याची माहीतीही पुणे पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. आता प्रश्न राहिला हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल कसा झाला? तर प्रत्येकाला उत्तरासहित हा पेपर देण्यात येत होता. परंतु प्रिंटच्या रुपात त्याला हा पेपर देण्यात येत नव्हता. तर परिक्षेला जाणाऱ्याने फक्त उत्तर पाठ करून पेपरला जायचं, हा नियम त्यांचा ठरलेला होता. मात्र यात एकाने उत्तर लिहून घेतल्याने, हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

पुणे सायबर पोलिसांच्या तपासात दोषी असणाऱ्या अकरा जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा भरती प्रक्रियावरून आता चांगलेच वादंग उठले असून, राजेश टोपे चांगलेच अडचणीत आले आहेत. विरोधकांकडून राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. एवढा मोठा गोंधळ होऊन देखील, अद्याप राजेश टोपे यांनी यावर काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे देखील सर्व स्तरातून राजेश टोपे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.