स्वतः विधानपरिषद सभापती, एक भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष, एक भाऊ बाजार समिती सभापती तर आता पुतण्याला केले पंचायत समिती सभापती

0

नुकतीच फलटण पंचायत समिती सभापतीपदी विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली. तर उपसभापती संजय सोडमिसे पाटील यांची वर्णी लागली आहे. विश्वजीतराजे नाईक निंबाळकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुतणे आहेत. शिवरुपराजे खर्डेकर व सौ. रेखा खरात यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर संजय सोडमिसे यांची उपसभापती तर विश्वजीतराजे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.

“रामराजे नाईक निंबाळकर स्वतः विधानपरिषद अध्यक्ष आहेत, संजीवराजे यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केले आहे आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे बाजार समिती सभापती आहेत. त्यांना दुसऱ्यांना काही द्यावं वाटत नाही.” अशा शब्दांत एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांने नाव न घेण्याच्या अटीवर नाराजी व्यक्त केली आहे. उगाच कुणालातरी पुढे करून विश्वजीतराजेंना सभापती करा अशा मागण्या करायला लावत असल्याचे देखील ते म्हणाले.

सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आहेत. तर बाजार समिती सभापती रघुनाथराजे हे देखील रामराजे यांचे बंधू आहेत. तर आता पंचायत समिती सभापती पदी निवड झालेले विश्वजीतराजे नाईक निंबाळकर हे रामराजे यांचे पुतणे आहेत. तर आता रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव हे देखील फलटण नगर परिषद निवडणुकीत उतरून राजकारणात सक्रिय होणार असल्याचे वृत्त आहे.

या अगोदर सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून रामराजे यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर हे प्रतिनिधीत्व करत होते. २०१७ मध्ये निवडणूक झाल्यापासून ते जानेवारी २०२० पर्यंत संजिवराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केले. त्यानंतर रामराजे यांनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची मुदतवाढ करण्यासाठी दोनवेळा बैठका घेतल्या होत्या.

परंतु ऐनवेळी शरद पवार व उपमख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधनास मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील गटाचे जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले यांना जिल्हा परिषद अध्यक्ष तर शशिकांत शिंदे गटाचे प्रदीप विधाते यांची जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून निवड केली होती. त्यामुळे संजीवराजे नाईक निंबाळकर यांना मुदतवाढ होऊ शकली नाही.

तर रामराजे हे देखील विधान परिषद सभापती आहेत. त्यामूळे सर्वसामान्य कार्यकर्ते आम्हाला काय? हा सवाल उपस्थित करत आहेत. नुकतीच रामराजे नाईक निंबाळकर यांची जिल्हा बँक निवडणुकीत संचालक म्हणून निवड झाली आहे. त्यांनी आपल्या राजकारणाला नगराध्यक्ष पदापासून सुरुवात केली आहे. त्यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर देखील नगरपालिका निवडणुकीत उतरणार असल्याचे वृत्त आहे.

रामराजे हे फलटणच्या निंबाळकर घराण्याचे 29वे वंशज आहेत. आधी फलटणचे नगराध्यक्ष नंतर 1995 मध्ये अपक्ष आमदार म्हणून निवड झाली. शिवसेना भाजप युतीच्या काळात कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी रामराजे उपाध्यक्ष झाले. त्यानंतरच्या काळात रामराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून जलसंपदा मंत्री म्हणून कामकाज केले.

2004 साली रामराजे कॅबिनेट मंत्री झाले व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. 2013 साली ते राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष झाले. त्यानंतरच्या काळात फलटण विधानसभा मतदारसंघ आरक्षित झाला. मग रामराजे यांना विधान परिषद सभापती म्हणून संधी मिळाली.

हेही वाचा: संजय भगवान सोडमिसे पाटील यांची फलटण पंचायत समिती उपसभापतीपदी निवड

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.